मॉन्सूनची ‘स्वच्छंदी खेळी’

यंदाचा मॉन्सून कोणाच्याही दबावाखाली किंवा प्रभावाखाली न राहता स्वच्छंदपणे स्वतःची खेळी खेळायला मोकळा झाला. अशा प्रकारची उदाहरणं फार कमी आहेत आणि त्यांच्यावर सखोल संशोधन व्हायला हवं.
संपादकीय
संपादकीय

यंदाचा पाऊस शेतकऱ्यांच्या अपेक्षेनुसार पडला नाही, हेही मान्य करावे लागेल. शेतीसाठी पाऊस नको असताना अतिवृष्टी आणि पाऊस गरजेचा असताना कोरडं आकाश अशी परिस्थिती अनेकदा उद्भवली. तिचा कृषी उत्पादनावर नेमका काय परिणाम झाला असावा, हे कालांतरानं स्पष्ट होईल; पण काही विपरीत चिन्हं आताच दिसू लागली आहेत. यंदाच्या खरीप हंगामाचं अन्नधान्य उत्पादन गेल्या वर्षापेक्षा २.८ टक्के कमी राहील, अशी शक्‍यता केंद्र सरकारच्या कृषी विभागानं नुकतीच व्यक्त केली आहे. खाद्यतेलाच्या बाबतीत तर ७.७ टक्के घट होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. अर्थात सप्टेंबरच्या शेवटीशेवटी पडलेला चांगला पाऊस रब्बी पिकांसाठी लाभदायक ठरणार आहे.

असमान वितरण यंदाच्या मॉन्सूनचे एकंदर पर्जन्यमान सरासरीपेक्षा केवळ पाच टक्के कमी राहिलं आणि हवामान खात्याचं दीर्घावधी पूर्वानुमान त्या बाबतीत खरं ठरलं असलं, तरी पावसाचं वितरण समसमान झालं नाही, ही एक महत्त्वाची बाब आहे. यंदाच्या मॉन्सूनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या विविध भागांत आलेले महापूर. १५ ऑगस्टला देश स्वातंत्र्यदिन उत्साहानं साजरा करत असताना बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल, आसाम, अरुणाचल, नागालॅंड, मणिपूर आणि ओडिशा अशी अनेक राज्यं पूरपरिस्थितीचा सामना करण्यात गुंतलेली होती. बिहारमध्ये तर जुलैमध्ये इतका कमी पाऊस पडला होता, की तिथं दुष्काळाची चिंता होती; पण ऑगस्टच्या मध्यावर परिस्थिती एकाएकी बदलली. अचानकपणे इतका पाऊस पडला, की लाखो लोक पूरग्रस्त झाले, त्यांना सुरक्षित जागी हलवावं लागलं आणि त्यांची मदत शिबिरांमध्ये सोय करावी लागली. बिहारच्या कोसी नदीचा नेपाळमध्ये उगम आहे. तिथं अतिवृष्टी झाली, की बिहारमध्ये महापूर येतो. यंदाही तसंच घडलं.गुजरातमध्ये अतिवृष्टी क्वचितच होते. यंदा जुलै महिन्याच्या शेवटीशेवटी मात्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर एकाच वेळी उद्भवलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळं गुजरातला पावसानं झोडपून काढलं. आसामच्या जनतेसाठी ब्रह्मपुत्रेचा महापूर ही एक नित्याची बाब आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात मात्र आसामला गेल्या तीन दशकांतल्या सर्वांत गंभीर परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. दोन लाख लोकांसाठी मदत शिबिरं उभारण्यात आली. काझिरंगा राष्ट्रीय अभयारण्याचा विस्तृत भाग पाण्याखाली आला.

कहीं खुशी कहीं गम   मॉन्सूनच्या पर्जन्यमानाच्या गणतीसाठी एक जून ते तीस सप्टेंबर हा कालावधी विचारात घेतला जातो. त्यानुसार हवामानशास्त्र विभाग आपली अधिकृत आकडेवारी लवकरच जाहीर करील; पण एक जून ते २७ सप्टेंबर २०१७दरम्यानच्या पर्जन्यमानाची आकडेवारी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. देशाच्या ६३० जिल्ह्यांपैकी निम्म्या जिल्ह्यांना सरासरीएवढं एकूण पर्जन्यमान लाभलेलं आहे, ही चांगली गोष्ट आहे; परंतु २१० म्हणजे देशातल्या एकतृतियांश जिल्ह्यांना सरासरीच्या वीस टक्‍क्‍याहून कमी पाऊस मिळाला आहे, ही बाब चिंतेची आहे. उर्वरित वर्षात ज्यांना पावसाचा तुटवडा झेलावा लागणार आहे, असे हे २१० जिल्हे पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांत आणि महाराष्ट्रात प्रामुख्यानं विदर्भात मोडतात. वीस सप्टेंबरच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसामुळं जायकवाडी घरण तुडुंब भरलं आणि नऊ वर्षांत पहिल्यांदाच त्याचे दरवाजे उघडून धरणातलं पाणी सोडावं लागलं. त्याच सुमारास खडकवासला, पानशेत, कोयना आदी धरणांचेही दरवाजे उघडावे लागले होते.

एल् निनो - ला निनाचा बागुलबुवा प्रशांत महासागराचा विषुववृत्तीय भाग सरासरीपेक्षा खूप तापतो, तेव्हा तिथं ‘एल्‌ निनो’ उद्भवला आहे, असं म्हटलं जातं. त्याउलट जेव्हा समुद्राचं तापमान सरासरीपेक्षा खूप कमी होते, तेव्हा ‘ला निना’ निर्माण झाल्याचं म्हटलं जातं. भारतीय मॉन्सूनचा पाऊस आणि प्रशांत महासागरीय तापमान यांच्यात खऱ्या अर्थानं एकास-एक असा सहसंबंध अजून प्रस्थापित झालेला नाही; पण ज्या वर्षी ‘एल्‌ निनो’ निर्माण होतो, त्या वर्षी भारतीय मॉन्सूनसाठी तो एक धोक्‍याचा इशारा मानला जातो आणि त्याच्या उलट ‘ला निना’ मॉन्सूनसाठी एक शुभचिन्ह समजलं जातं. गेल्या अनेक वर्षांत ‘एल्‌ निनो’ आणि ‘ला निना’ हे बहुचर्चित विषय बनले आहेत. भारतीय मॉन्सूनच्या संदर्भात जे काही बरेवाईट घडतं, त्याचं मूळ प्रशांत महासागराच्या तापमानात आहे, असं शास्त्रज्ञ सांगत आले आहेत; पण ते सर्वस्वी खरं नाही. अनेक वर्षी ‘एल्‌ निनो’ असूनही भारतात चांगला पाऊस पडल्याची उदाहरणं आहेत. तरीही ‘एल्‌ निनो’च्या आधारावर भारतात भीतीचं वातावरण तयार करणारे अनेक परदेशी शास्त्रज्ञ आहेत. भारतीय मॉन्सून जणू ‘एल्‌ निनो’चा गुलाम आहे, अशी निराधार कल्पना ते पसरत असतात. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर यंदा एक विशेष गोष्ट घडली. प्रशांत महासागराचं विषुववृत्ताजवळचं तापामान सरासरीच्या तुलनेत कमीही झालं नाही वाढलंही नाही. ते सरासरीएवढंच राहिले. म्हणून या वर्षी ‘एल्‌ निनो’ आणि ‘ला निना’ या सुप्रसिद्ध प्रक्रियांची निर्मिती झालीच नाही. त्यामुळं या वर्षीच्या मॉन्सूनवर त्यांचा प्रभाव पडण्याचा प्रश्नच नव्हता आणि हवामानशास्त्रज्ञांना त्यांचा उल्लेखही करता आला नाही. थोडक्‍यात म्हणजे यंदाचा मॉन्सून कोणाच्याही दबावाखाली किंवा प्रभावाखाली न राहता स्वच्छंदपणे स्वतःची खेळी खेळायला मोकळा झाला. अशा प्रकारची उदाहरणं फार कमी आहेत आणि त्यांच्यावर सखोल संशोधन व्हायला हवं.  

‘सामान्य मॉन्सून’ म्हणजे काय? हवामानशास्त्रज्ञ ज्याला ‘सामान्य मॉन्सून’ म्हणतात, तो कोणत्याही दृष्टीनं आदर्श मॉन्सून नसतो. ते केवळ अनेक वर्षांच्या आणि विविध प्रदेशांवरच्या पर्जन्यमानाची सरासरी काढतात आणि जो मॉन्सून सरासरीइतका पाऊस देतो, त्याला ते ‘सामान्य’ म्हणतात. रोजच्या जीवनात जेव्हा उल्लेखनीय असं काहीच नसतं, तेव्हा आपण ‘सामान्य’ असा शब्दप्रयोग करतो. एखाद्या विद्यार्थ्याची प्रगती सामान्य असली, तर तो प्रशंसापात्र ठरत नाही. सामान्य माणूस म्हणजे ज्याला जगात कोणतंच महत्त्वाचं स्थान नाही अशी व्यक्ती. सामान्य मॉन्सूनची हवामानशास्त्रीय संकल्पना अगदी अशाच प्रकारची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, अन्यथा आपला अपेक्षाभंग होण्याची शक्‍यता आहे.

‘सरासरी’नं समाधान नाही सुखांची आणि दुःखांची सरासरी काढून जीवनात समाधान मिळत नाही किंवा पाप आणि पुण्य यांची बेरीज-वजाबाकी करून मोक्षप्राप्ती होत नाही. मग अनावृष्टी आणि अतिवृष्टी यांची सरासरी काढून मॉन्सून ‘सामान्य’ असल्याचं म्हणणं कितपत बरोबर आहे? निरभ्र आकाशाची आणि ढगफुटीची सरासरी काढता येते का? अलीबागच्या आणि नगरच्या पावसाची सरासरी काढून कोणती माहिती मिळते? हवामानाचे अंदाज सबळ विज्ञानावर आधारलेले असावेत, ते अचूक ठरावेत, त्यांची भाषा सुलभ असावी, ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी हवामानशास्त्रज्ञांनी सरासरीच्या भाषेतून बाहेर पडायची आता वेळ आली आहे.

डॉ. रंजन केळकर, ९८५०१८३४७५ (लेखक हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त महासंचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com