यंत्र सांगेल तुमच्या सोन्याची शुद्धता !

यंत्र सांगेल तुमच्या सोन्याची शुद्धता!
यंत्र सांगेल तुमच्या सोन्याची शुद्धता!

बॅंकेमध्ये नव्याने आलेल्.या सोन्याची शुद्धता तपासणाऱ्या यंत्रामुळे सोने तारण कर्ज सुलभता वाढण्यास मदत होणार आहे.

दौंड तालुक्यातील मलठण (जि. पुणे) येथील संग्राम लक्ष्मण निम्हण यांना शेतीकामासाठी तत्काळ पैशांची गरज होती. गळ्यातील सोन्याची साखळी बॅंकेत गहाण ठेवून तारण कर्ज मिळविण्याचा निर्णय घेतला. मात्र, आजवरच्या अनुभवातून त्यासाठी किमान दोन दिवस लागत. ते नेहमीप्रमाणे बॅंकेत जाऊन सोने तारण कर्जाचा अर्ज भरण्याची तयारी करू लागले. मात्र, बॅंकेच्या अधिकाऱ्याने त्यांना थांबवले. म्हटले की आता सोने तारण शेतीकर्ज मिळेल की नाही, किंवा किती मिळेल, यासाठी अधिकृत सोनार किंवा अधिकाऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज राहिली नाही. ते तुम्हाला सांगेल समोरचे ‘गोल्ड प्युरिटी टेस्टिंग मशिन.’

खरोखरच अर्ध्या मिनिटामध्ये त्या यंत्राने सोन्याच्या साखळीची तपासणी करून, त्यातील अस्सल सोन्याचे प्रमाण आणि भेसळ टक्केवारी सांगितली. सोन्याच्या शुद्धतेनुसार कर्ज घेण्यास पात्र की अपात्र आहे, या बाबतची पावती नोंद दोन मिनिटांत हातात मिळाली, असा अनुभव निम्हण यांनी सांगितला. तात्काळ रोख रक्कम उभारणीसाठी सोने तारण शेती कर्ज हा शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरतो. पूर्वी सोन्याच्या शुद्धतेसाठी अधिकृत सराफांवर अवलंबून राहावे लागत असल्याने मानवी चुका, त्रुटी याची शक्यता असे. त्यात वेळही जात असे. मात्र, आता सोन्याची शुद्धता तपासणारे यंत्र अनेक बॅंकांमध्ये उपलब्ध झाले आहे. बॅंक ऑफ इंडियातील कर्ज वसुली विभागाचे मुख्य व्यवस्थापक बी. व्ही. काकडे म्हणाले, की शेतकऱ्यांना आता सोने तारण कर्ज वाटपात केवळ तत्परताच नव्हे, तर पारदर्शकताही मिळणार आहे. या यंत्राद्वारे सोन्याच्या सूक्ष्म  तुकड्याचीही शुद्धता ३० सेकंदांत तपासता येते. शेतकऱ्यांच्या सोन्यातील शुद्ध सोन्याचे प्रमाण आणि मूल्यही केवळ ६० सेकंदांत मिळते. त्या आधारे मिळू शकणारी कर्ज रक्कमही काही मिनिटांत समजू शकते. यंत्राविषयी थोडक्यात...

  • यंत्राची किंमत ७५ लाख रुपये असून, ते अमेरिकेतून आयात केले जाते.
  • या यंत्रामध्ये शुद्धता तपासण्यासाठी क्ष किरणांचा वापर केला जातो. या किरणांमुळे गर्भवती महिला किंवा मानवी अवयवांना हानी पोचू शकते, त्यामुळे भारतीय अणुसंशोधन केंद्राचे प्रमाणपत्र आवश्यक असते.
  • या यंत्राचे अभ्यासक सिजो जॉर्ज म्हणाले, की सोने तारण कर्ज वाटपातील मानवी हस्तक्षेप कमी होणार असून, भविष्यात प्रत्येक बॅंक शाखेत असे यंत्र दिसू शकते.
  • अस्सलता समजते काही मिनिटांत...

  • सोन्याचे दागिने बनवताना सोन्याव्यतिरिक्त चांदी, तांबे आणि कॅडमियम मिसळलेले असते. सोन्याच्या नेमक्या प्रमाणानुसार १८, २०, २२, २४ कॅरेट असे प्रकार पडतात. त्यानुसार सोन्याचे मूल्यही ठरते.
  • या यंत्रामध्ये सोने ठेवल्यानंतर काही वेळातच त्यातील अस्सल सोने व त्यातील अन्य धातूंचे नेमके प्रमाण सांगणारा एक अहवाल त्वरित मिळतो, त्यानुसार नेमके किती कर्ज मिळणार, हेही समजू शकते.
  • शेतीसाठी सोने तारण कर्ज योजना ः

  • रिझर्व्ह बॅंकेच्या मान्यतेने राष्ट्रीयीकृत बॅंकांद्वारे शेतकऱ्यांसाठी सोनेतारण कर्ज वाटप योजना सुरू आहे. त्याद्वारे शेती व बिगरशेती व्यवसायासाठी तारण सोन्याच्या किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज मिळते.
  • कमाल कर्ज मर्यादा १५ लाख आहे.
  • त्यासाठी व्याजदर हा कृषी वापरासाठी ८.४० टक्के, तर बिगर कृषी कामासाठी ९.९० टक्के असा आहे. कृषी कर्जाची फेड मुदतीत केल्यास व त्यापासून पीक उत्पादन घेतल्याचे पुरावे दिल्यास तीन लाखांपर्यंतच्या कर्जावर सात टक्के व्याज आकारणी होते.
  • कर्जाची परतफेड पिकानुसार १२ किंवा १८ महिन्यांची असू शकते.
  • शेतजमिनीची कागदपत्रे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड सादर करावे लागते.
  • मुदतीत परतफेड दिल्यास तीन टक्के व्याज सवलत देखील मिळते.
  • गोल्ड बाँड किंवा गोल्ड कॉईन गहाण ठेवून देखील कर्ज मिळवता येते.
  • वाढतेय गोल्ड प्युरिटी टेस्टिंग यंत्रांचे प्रमाण ः भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) देशभरातील विविध शाखांमध्ये ६५० ‘गोल्ड प्युरिटी टेस्टिंग मशिन’ उपलब्ध केली आहेत. याशिवाय कार्पोरेशन बॅंक, कर्नाटक बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया यांनी देशभरात ७०० पेक्षा जास्त यंत्रे आतापर्यंत बसवली आहेत.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com