भाजीपाला लागवडीसाठी कमी खर्चाचे पॉलिहाउस तंत्रज्ञान

बिगरहंगामी भाजीपाला लागवडीसाठी कमी खर्चाचे पॉलिहाउस तंत्रज्ञान
बिगरहंगामी भाजीपाला लागवडीसाठी कमी खर्चाचे पॉलिहाउस तंत्रज्ञान

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अभियांत्रिकी संस्थेतील आर. के. यादल, पी. कालिया, एच. चौधरी आणि झाकीर हुसैनाद, ब्रिहमदेव यांनी भाजीपाला पिकामध्ये वापरण्यायोग्य कमी खर्चाचे पॉलिहाउस स्ट्रक्चर उभारणीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रामध्ये बिगर हंगामातही भाज्यांचे उत्पादन घेता येते. त्याचप्रमाणे रोपवाटिकेसाठीही असे तंत्रज्ञान फायद्याचे ठरत असल्याचे दिसून आले आहे. उत्तर भारतामध्ये हिवाळ्यामध्ये प्रचंड थंडी पडत असल्याने टोमॅटो, ढोबळी मिरची, काकडी, घेवडा यांसारख्या पिकांचे उत्पादन घेण्यामध्ये अडचणी येतात. त्यामुळे उत्तम दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृह तंत्रज्ञान फायद्याचे ठरू शकते. मात्र, हरितगृह उभारणीचे पारंपरिक तंत्र हे अधिक महागडे असल्याने सामान्य शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यासाठी रोपवाटिकांसाठी आणि कमी उंचीच्या पिकांसाठी कमी उंचीचे पॉलिहाउस उभारणीचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. या तंत्राच्या हरितगृहामध्ये नोव्हेंबर २०१२-१३ मध्ये संस्थेच्या भाजीपाला उत्पादन विभागामध्ये चाचण्या घेण्यात आल्या. रोपवाटिकांसाठी छोटे हरितगृह हरितगृहामध्ये हिवाळ्यात बाह्य तापमानाच्या तुलनेमध्ये आतील तापमान ६ ते १० अंशाने अधिक ठेवता येते. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात वेगाने वाहणारे थंड वारे रोखले जाते. परिणामी बियांची रुजवण व वाढ चांगली होते. काही रोपवाटिकाधारक हरितगृहाचा वापर रोपांच्या निर्मितीसाठी करत असून, त्यातून चांगला फायदाही मिळतो. अशी केली उभारणी ः

  • साध्या पी. व्ही. सी. पाइप आणि सुतळी यांच्या साह्याने कमी खर्चाचे पॉलिहाउस उभारण्यात आले. त्याचा आकार लांबी १० मीटर, रुंदी ५ मीटर बाय उंची ७ फूट इतकी ठेवली. आच्छादनासाठी ७०० गेज (२०० मायक्रॉन) जाडीच्या युव्ही स्टॅबिलाईज्ड पॉलिथीनचा वापर केला.
  • प्रो ट्रे आणि पॉलिथीन बॅग अशा दोन पद्धतीचा रोपांच्या निर्मितीसाठी वापर केला. काकडीसाठी ९ बाय ५ सेंमी आकाराच्या पिशव्या वापरल्या. त्यात सेंद्रिय खतः वाळूः माती यांचे २ः१ः१ मिश्रण वापरले. वरील आकाराच्या हरितगृहामध्ये सुमारे ८००० पिशव्या बसतात. डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये प्रत्येक पिशवीमध्ये एक बी पेरण्यात आली. शॉवरच्या साह्याने हलके पाणी दिले. सुमारे ३० ते ३५ दिवसामध्ये रोपे १० ते १२ सेमी उंचीची झाली. त्यानंतर दोन दिवस पाणी रोखून रोपांचे हार्डनिंग करून घेतले. यामुळे बाह्य स्थितीमध्ये रोपे चांगल्या प्रकारे तग धरू शकतात. या स्थितीमध्ये धुके आणि थंड वातावरण असतानाही चांगल्या प्रतीची रोपे मिळाली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये धुक्यांचा धोका कमी झाल्यानंतर बाह्य स्थितीमध्ये पुनर्लागवड केली.
  • या हरितगृहातील उभ्या जागेचा फायदा घेण्यासाठी बांबूंच्या साह्याने दोन मजले तयार करण्यात आले. त्यामध्ये प्रो ट्रे (१०० सीसी क्षमतेचे) ठेवून सुमारे ७००० रोपे बनवणे शक्य झाले.
  • ५० वर्गमीटर आकाराच्या हरितगृहाच्या उभारणीचा खर्च साधारणपणे खालीलप्रमाणे ः

      निविष्ठा  किंमत प्रति नग (रुपये)  एकूण खर्च (रुपये )
     १३ पीव्हीसी पाइप (२० फूट, १.२५ इंच)  ४००  ५२००
     १६ पीव्हीसी पाइप (२० फूट, ०.७५ इंच)  ३००  ४८००
     पॉलिथीन१०० वर्गमीटर  १९  १९००
     सुतळी १ किलो  ४००  ४००
     बांबू बेंच - ९ मी बाय १.५ फूट (३ नग)  निरंक  २०००
     मजूरी - ४ मजूर  ३००  १२००
     एकूण    १५,५००

    हरितगृहातील रोपवाटिकेचे अर्थशास्त्र हरितगृह आकार ः १० बाय ५ मीटर - ५० वर्गमीटर व उंची ७ फूट रोपे - पॉलिबॅग ८०००, प्रो ट्रेमध्ये ७००० - एकूण १५००० रोपे- किंमत २ रुपये प्रमाणे - ३०,००० रुपये हरितगृह उभारणी, पॉलिबॅग, प्रो ट्रे खर्च - १५५०० अधिक ५००० - २०,५०० रुपये

    फायदा पहिल्या वर्षी (३०,००० -२०,५००) = ९५०० रुपये दुसऱ्या वर्षी (३०००० - ५०००) = २५००० रुपये तिसऱ्या वर्षी (३०००० - ६०००) = २४००० रुपये   तात्पुरत्या कमी उंचीच्या हरितगृहाची उभारणी पारंपरिक शेतीमध्ये घेवडा, राजगिरा यांसारखी पिके हिवाळ्यामध्ये चांगली वाढत नाहीत. या पिकांचे बिगरहंगामी उत्पादन घेण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाचे हरितगृह उभारण्याची कल्पना सूचली. नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये गादीवाफ्यावर या पिकांच्या बिया पेरण्यात आल्या. त्यानंतर या गादीवाफ्यावर कमी उंचीचा हरितगृह सांगाडा तयार करून, त्यावर पॉलिथीन आच्छादन करून हवाबंद केले. त्यामुळे पिकांसाठी संरक्षित वातावरण तयार झाले. बियांची चांगली रुजवण झाल्यानंतर तापमान नियंत्रणासाठी दुपारच्या वेळी या पॉलिहाऊसच्या दोन्ही बाजू उघडून ठेवल्या जात. पुन्हा संध्याकाळी तापमान योग्य ठेवण्यासाठी झाकून ठेवले जाई. अन्य सर्व व्यवस्थापन नेहमीप्रमाणे केले. फेब्रुवारी महिन्यामध्ये बाह्य तापमान चांगले असून, धुके कमी झाल्यानंतर पॉलिथीन फिल्म व सांगाडा काढून ठेवण्यात आला. अशा प्रकारे हे पॉलिहाऊस दरवर्षी तात्पुरत्या स्वरूपामध्ये उभे करता येते आणि काढता येते. यासाठी लागणारा खर्च खालीलप्रमाणे ः

    निविष्ठा एकूण खर्च (रुपये)
    १९ पीव्हीसी पाइप, २० फूट, ०.७५ इंच, प्रति पाइप किंमत ३०० रुपये ५७००
    ४ पीव्हीसी पाइप, २० फूट, १ इंच, प्रति पाइप किंमत ४०० रु १६००
    पॉलीथीन फिल्म (७०० गेज, १२ बाय ५ मीटर, किंमत १९ रुपये प्रति वर्गमीटर ११४०
    सुतळी अर्धा किलो २००
    मजूरी (३ मजूर, ३०० रुपये प्रति दिन) ९००
    एकूण ९५४०

    (ही पॉलिहाउस संरचना तीन वर्षापर्यंत टिकते.) संरक्षित शेतीमध्ये बिगरहंगामी उत्पादनाचे तंत्र ः

  • हिवाळ्यामध्ये कमी खर्चाच्या छोट्या हरितगृहामध्ये चेरी टोमॅटो, घेरकीन, कारले, काकडी या सारख्या पिकांचे उत्पादन घेता येते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागवड केल्यास हरितगृहाच्या आतील तापमान बाह्य तापमानापेक्षा ६ ते १० अंशाने अधिक राहते. थंड वारे व हवा आत न आल्याने बियाणे चांगल्या प्रकारे रुजते व वाढते.
  • घेरकीन(लहान काकडी)ची काढणी जानेवारीच्या अखेरीला सुरू होते. त्यापासून १००० वर्गमीटर क्षेत्रातून पहिल्या वर्षी ४३५०० रुपये आणि दुसऱ्या वर्षी ५९००० रुपये फायदा मिळाल्याचे प्रयोगात दिसून आले.
  • चेरी टोमॅटोची काढणी फेब्रुवारीच्या मध्यापासून सुरू झाली. त्यापासून पहिल्या वर्षी ३३,७५० रुपये आणि दुसऱ्या वर्षी ५०००० रुपये उत्पन्न मिळाले.
  • कारले पिकातून पहिल्या वर्षी २३,७५० रुपये निव्वळ नफा मिळाला, तर दुसऱ्या वर्षी ४० हजार रुपये नफा मिळाला.
  • काकडी पिकातून पहिल्या वर्षी ३७ हजार रुपये, तर दुसऱ्या वर्षी ५२५०० रुपये नफा मिळाला.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com