लसणाच्या घरगुती प्रक्रियेसाठी यंत्रे

लसणाच्या घरगुती प्रक्रियेसाठी यंत्रे
लसणाच्या घरगुती प्रक्रियेसाठी यंत्रे

लसणाच्या गड्ड्या फोडणे, पाकळ्य मोकळ्या करणे आणि साल काढणे या प्राथमिक क्रिया आहेत. मात्र, कोणत्याही लसूण प्रक्रिया उद्योगामध्ये या कामासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. ते कमी करण्यासाठी खास यंत्राची निर्मिती उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये करण्यात आली आहे. या यंत्राची माहिती घेऊ. जागतिक पातळीवरील प्रमुख लसूण उत्पादक देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. मध्य प्रदेश, गुजरात, ओडिसा, राजस्थान, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश हे महत्त्वाचे लसूण उत्पादन राज्ये आहेत. भारतामध्ये लसणाचा ताज्या स्वरूपामध्ये अधिक वापर असला तरी परदेशामध्ये प्रामुख्याने वाळवलेल्या लसणांचा वापर होताे. परिणामी प्रामुख्याने वाळवलेल्या कुड्या आणि भुकटी याला निर्यातीसाठी मागणी असते. भारतातून लसणाची निर्यात पाकिस्तान, थायलंड, अमेरिका, नेपाळ, मलेशिया आणि बांगलादेशामध्ये केली जाते. त्याच प्रमाणे लसूण ताज्या स्वरूपाप्रमाणेच वाळवून मसाल्यामध्ये वापरतात. शाकाहारी भाज्या, मांसाहारी पदार्थ, चटण्या आणि लोणच्यांमध्ये लसणाचा उपयोग होतो. खारवलेल्या मांस आणि माशांचा खराब वास कमी करण्यासाठी लसूण वापरतात. लसणाचे गुणधर्म ः लसूण हे पाचक असून, पोटफुगी दूर करते. तसेच त्यात संधीवात प्रतिबंधक गुणधर्म असून, विविध आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याचा वापर होतो. स्नायूंच्या वेदना, फुफ्फुस, आतड्याचा दाह यामध्ये प्राचीन काळापासून उपयुक्त मानले जाते. लसणांच्या प्रक्रियेसाठी सोप्या आणि स्वस्त अशा यंत्रे व तंत्रज्ञानांची निर्मिती उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये करण्यात आली आहे. प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने लसूण सोलणे, साल वेगळी करणे, प्रतवारी, गड्ड्या फोडून पाकळ्या वेगळ्या करणे, बारीक करणे, निर्जलीकरण, पॅकेजिंग, साठवण यांचा समावेश आहे. लसूण प्रतवारी यंत्र ः

  • फिरत्या चाळणीद्वारे आकारानुसार लसणाची प्रतवारी केली जाते. या गोलाकार चाळण्या बनवण्यासाठी विद्युतरोधक (मोटारच्या वायंडिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या) शीटसचा वापर केला आहे. त्यावर आवश्यकतेनुसार योग्य आकाराची छिद्रे पाडून घेतात. त्यामध्ये प्रामुख्याने ३० मि.मी. पेक्षा कमी, ३० ते ४० मि.मी. च्या दरम्यान (१ आणि २ प्रत), ४५ मि.मी. पेक्षा अधिक आकार असलेल्या तीन चाळण्या असतात.
  • या यंत्राची प्रतवारी कार्यक्षमता ८२ टक्क्यापर्यंत आहे.
  • प्रक्रियेमध्ये अंदाजे ०.२ ते ०.८ टक्के लसूण मोकळे होऊन निसटण्याची शक्यता असते. एकूण वजनाच्या दीड टक्क्यापर्यंत हे प्रमाण राहू शकते. मात्र, नुकसान आणि पाला निघत नाही.
  • १०० किलो प्रति तास क्षमतेच्या यंत्राची किंमत मोटारसर ३५ हजार रुपयांपर्यंत आहे. या यंत्रामुळे पारंपरिक प्रतवारीच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी म्हणजेच केवळ ३० रुपये प्रति क्विंटल इतका खर्च येतो. मजुरी खर्चामध्ये २०० टक्क्यांपर्यंत बचत होते.
  • गड्ड्या फोडण्याचे यंत्र ः लसणाच्या गड्ड्या फोडून त्यापासून पाकळ्या वेगळ्या करणे विविध प्रक्रियेसाठी आवश्यक असते. त्यासाठी यंत्रामध्ये अर्धगोलाकार आकारामध्ये फिरणाऱ्या पट्ट्यांच्या घर्षणाचा वापर केला जातो. यासाठी ०.५ एचपी सिंगल फेज मोटरद्वारे उर्जा दिली आहे. यामध्ये दोन मॉडेल उपलब्ध आहेत. १) हस्तचलित - (५० किलो प्रति तास) २) विद्युतचलित - (८०० किलो प्रति तास, ०.५ एचपी सिंगल फेज मोटर) यात लसूण गड्डा फोडून पाकळ्या वेगळ्या करण्यासोबतच काडी कचरा, मुळे, साली वेगळ्या केल्या जातात. निव्वळ लसूण पाकळ्या वेगळ्या मिळतात. या प्रक्रियेतून मिळालेल्या पाकळ्यांना कोणतीही इजा होत नसल्याने त्यांचा वापर लागवडीसाठीही करता येतो. प्रतिक्विंटल २.५० रुपये इतका कमी खर्च येतो. पारंपरिक पद्धतीमध्ये त्यांच्या दहापट अधिक खर्च होतो. लसूण पाकळ्या मोकळ्या करण्यासाठी ः लसूण वेगाने वाळण्यासाठी पाकळ्या मोकळ्या करणे आवश्यक असते. ही क्रिया सावकाश करावी लागते. त्यासाठी या यंत्रामध्ये शेजार शेजारी ० ते २५ मि.मी. अंतर ठेवत दोन रोलर समांतर लावलेले असतात. त्यातून एकेक पाकळी जाऊ शकते. रोलर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरतात. त्यासाठी एक एचपी क्षमतेची सिंगल फेज मोटरने ऊर्जा दिली आहे. या रोलरमधील अंतर ५ ते १० मि.मी. आकारापर्यंत सामान्य आणि मोठ्या आकाराच्या लसणांसाठी ठेवता येतो. या यंत्राची क्षमता ४२० किलो प्रति तास असून, कार्यक्षमता ८५ टक्के आहे. या प्रक्रियेमुळे लसूण निर्जलीकरणासाठी लागणारा कालावधी निम्म्यापर्यंत कमी होतो. वाळलेल्या लसणाची साल वेगळे करण्याचे यंत्र (डिस्किनर) ः सालासह वाळवलेल्या लसणाच्या पाकळ्या हॉपरमध्ये टाकल्या जातात. त्या एका बॅरलमध्ये फिरत्या स्क्रबरच्या सान्निध्यात येताच त्यावरील साल बाजूला होते. या स्क्रबरचा वेग १६० फेरे प्रति मिनिट इतका ठेवला जातो. पुढे एका अॅस्पिरेटरच्या साह्याने वेगळ्या झालेल्या साली खेचून घेतल्या जातात. स्क्रबर आणि बॅरल यांच्यामध्ये ८ मि.मी. इतके अंतर ठेवलेले असते. त्यामुळे लसणाच्या पाकळ्या चिरडल्या जात नाहीत. काही वेळा साल व्यवस्थित निघण्यासाठी दोन वेळा यंत्रातून काढाव्या लागतात. त्यानंतर ८० ते ८५ टक्के कार्यक्षमता मिळते. या यंत्राची किंमत १७ हजार रुपये असून, ५० किलो प्रति तास इतक्या पाकळ्या सालरहित करता येतात. प्रतिक्विंटल वाळलेल्या पाकळ्यांची साल काढण्यासाठी ५३ रुपये खर्च येतो. पारंपरिक माणसांच्या साह्याने साली काढण्यासाठी प्रतिक्विंटल २०० रुपये खर्च येतो. थोडक्यात या प्रक्रियेसाठीच्या खर्चात ३०० टक्क्यांनी बचत होते. ताज्या लसणाची साल काढण्यासाठी ः लसणाची पेस्ट तयार करण्याचा उद्योग वेगाने वाढत आहे. त्यासाठी ताज्या लसणाची साल काढून पेस्ट तयार करावी लागते. साल काढण्याच्या विविध पद्धती आहे. पारंपरिक पद्धती - १) लसूण पाकळ्यांना खाद्यतेल (२ ते ३ टक्के) आणि मिठ (१ ते २ टक्के) यांचा एक थर दिला जातो. त्यानंतर ४ ते ५ पाच तास सूर्यप्रकाशामध्ये उघड्यावर ठेवल्यानंतर त्याची साल सैल होते. २) तेल लावलेल्या पाकळ्या मोठ्या भांड्यामध्ये कमी कालावधीसाठी गरम केल्या जातात. हातामध्ये मोजे घालून त्याची साल काढली जाते. या दोन्ही पद्धती चांगल्या असल्या तरी स्वच्छतेचे सर्व नियम पाळणे आवश्यक असते. आकार, संरचना आणि गंध यावर कोणत्याही विपरीत परिणाम न होता लसणाची साल काढण्यासाठी एक यंत्र तयार केले आहे. त्यामध्ये वृत्तचितीच्या आकाराच्या कक्षामध्ये एका बाजूला लसूण पाकळ्या टाकण्यासाठी हॉपर असते. तर दुसऱ्या बाजूला साल काढलेल्या लसूण पाकळ्या मिळण्यासाठी आउटलेट असते. त्यात एका वेळी ५०० ते ७५० ग्रॅम तेल लावलेल्या पाकळ्या टाकल्या जातात. त्यात प्रचंड दबावाखालील हवा ४५ ते ६० सेकंदांसाठी सोडली जाते. त्याद्वारे साल वेगळी होते. या यंत्राद्वारे प्रतितास १८ ते २२ किलो लसणाची साल काढली जाते. तसेच त्याची कार्यक्षमता ९६ ते ९८ टक्के आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com