सूर्यफूल बियांपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

सूर्यफूल बियांपासून प्रक्रियायुक्त पदार्थ
सूर्यफूल बियांपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

आपल्याकडे सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेलासाठी केला जातो. मात्र, सूर्यफुलाच्या बियांपासून व त्यातील मगजापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. अशा पदार्थाच्या निर्मिती व विक्रीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. आपल्याकडे सूर्यफूल हे तेलबिया पीक म्हणून ज्ञात आहे. या तेलाचा वापर स्वयंपाकामध्ये, सॅलट ड्रेसिंगमध्ये किंवा मार्गारीन निर्मितीसाठी होतो. त्याचप्रमाणे उद्योगामध्ये रंग आणि प्रसाधनामध्ये त्याचा वापर होतो. याच्या रोस्टेड बियांपासून कॉफीसारखे पेयही तयार केले जाते. तेल काढताना तयार झालेली पेंड ही उत्तम पशुखाद्य आहे.

  • रशियामध्ये सूर्यफुलाच्या बियांवरील आवरणापासून इथिल अल्कोहोल, प्लायवूड तयार केले जाते. त्याचप्रमाणे या आवरणाचा उपयोग यिस्ट वाढवण्यासाठी केला जातो. सूर्यफुलाच्या दांड्यांमध्ये स्फुरद आणि पालाशचे प्रमाण भरपूर असल्याने ते कुजवून त्यापासून उत्तम दर्जाचे खत बनवणे शक्य आहे.
  • चीनमध्ये सूर्यफुलाच्या दांड्यातील तंतुमय पदार्थांचा वापर कपडे आणि कागदाच्या निर्मितीसाठी केला जातो. काडीच्या आतील पांढरा भाग हा हलक्या पदार्थांपैकी एक असून, त्याचा वापर प्रयोगशाळेमध्ये विविध कारणांसाठी केला जातो. या पिकाची पाणी शोषण्याची क्षमता अधिक असून, नेदरलॅंडमध्ये सतत ओलावा राहणाऱ्या जमिनीतील पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी केला जातो.
  • मानवी आहारातील प्रथिनांचा अतिरिक्त पुरवठा करण्यासाठी सूर्यफुलातील प्रथिने फायद्याची ठरतात.
  • सूर्यफुल बियांमध्ये ९.८ ग्रॅम प्रथिने, ५२.१ ग्रॅम लिपिड, १७.९ ग्रॅम कर्बोदके, १ ग्रॅम क्रूड फायबर, ३.७ ग्रॅम खनिज द्रव्ये, २८० मिलिग्रॅम कॅल्शिअम, ५ मिलिग्रॅम लोह असून, ६२० किलोकॅलरी इतकी ऊर्जा प्रति १०० ग्रॅम बियातून मिळते. सूर्यफूल बियामध्ये २५ टक्क्यांपर्यंत तुस किंवा साल असून, त्यात फायबर आणि मेण असते. बियांच्या गर किंवा मगजामध्ये ३६ टक्के प्रथिने असून, ती कमी खर्चामध्ये वेगळी करता येतात. परिणामी आरोग्यदायी पूरक प्रथिनांच्या निर्मितीसाठी ते उपयुक्त ठरतात.
  • सूर्यफुलाच्या बियांची स्वच्छता, प्रतवारी आणि वरील आवरण वेगळे करण्यासाठी यंत्रे उपलब्ध आहे. वाळलेल्या बियापासून आवरण वेगळे करण्यासाठी सेंट्रिफ्यूज शेलर अधिक योग्य ठरतो. मिळालेल्या मगजाची प्रतवारी पूर्ण, तुटलेले या आकारानुसार वेगळे करता येते. त्याचा पुढे आकारानुसार विविध पदार्थांच्या निर्मितीसाठी उपयोग करता येतो. वरील प्रक्रियेमध्ये तुटलेले मगज एएसटीएम शेकिंग स्क्रिनवर टाकून, त्याला एकसारखा आकार दिला जातो. तुटलेले मगज १.१७ ते १.६५ मि.मी. या आकारात मिळू शकतात.
  • सूर्यफूल मगजापासून सिफेट या संस्थेने तीन प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले आहेत.

    1. सूर्यफूल मगजाची कॅरॅमल ः ही साखरेची मिठाई असून, त्यात सूर्यफुलाच्या मगजाचा वापर केलेला असतात. मगजाचे आणि साखरेचे प्रमाण वेगवेगळे ठेवून विविध चवी मिळवता येतात. मात्र, साखर आणि मगजाचे गुणोत्तर ७०ः३० ठेवल्यास लोकांना हा पदार्थ आवडत असल्याचे दिसून आले आहे.
    2. सूर्यफूल - तीळ मगजाची चिक्की ः चिक्की तयार करण्यासाठी गूळ, सूर्यफूल मगज, तीळ मगज यांचे प्रमाण अनुक्रमे ५०ः३५ः१५ असे ठेवावे.  
    3. सूर्यफूल मगजाचे स्वीट मीट स्नॅक ः हा रेडी टू इट या प्रकारातील पदार्थ आहे. त्यात साखर, गूळ, सूर्यफूल मगज, द्रवरूप ग्लुकोज आणि मध यांचे प्रमाण अनुक्रमे ३२.८ः२६.२ः३०.०ः४.०ः७.० असे ठेवावे.
  • मध्यम आकाराच्या बिया भाजून चांगल्या खमंग होतात. त्या शेंगदाण्याप्रमाणे सरळ किंवा खारवून खाण्यासाठी किंवा विविध पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरता येतात. तुकडे झालेले किंवा संपूर्ण मगज भाजून किंवा न भाजता बेकरी उत्पादने, सॅलड, कॅंडी आणि अन्यपदार्थांसाठी वापरता येतात. खाद्यपदार्थांच्या सजावटीसाठी भुरभुरता येतात. मध, लोणी आणि मिठासोबत मिसळून ब्रेडवर लागण्यायोग्य स्प्रेड तयार करता येते.
  • सूर्यफुलापासून विविध पदार्थ

    नमकीन बनविण्याची कृती पॅनमध्ये योग्य प्रमाणात पामोलिन तेल गरम करावे. त्यात भरडलेला भात आणि आवरण काढलेले सूर्यफूल बिया वेगवेगळ्या तळून घ्याव्या. तळल्यानंतर भात व आवरण काढलेले सूर्यफूल टीपकागदावर ठेवून अतिरिक्त तेल कमी करावे. या मिश्रणावर कडीपत्ता, कोरडे खोबरे, मनुके, लाल मिरची पावडर व मीठ चवीप्रमाणे मिसळून प्लॅस्टिक बाटलीमध्ये साठवावे. ड्राय रोस्टेड सूर्यफूल बिया आवरण काढलेल्या सूर्यफूल बियांचे वजन करून त्यात चवीप्रमाणे मसाले मिसळून घ्यावेत. नॉन स्टिक पद्धतीच्या तव्यावर या बिया एका थरामध्ये पसरून ९० अंश सेल्सिअस तापमानावर ३० मिनिटांपर्यंत भाजाव्यात. सामान्य तापमानापर्यंत थंड झाल्यानंतर त्यावर तेल स्प्रे करावे. चवीप्रमाणे अन्य घटक मिसळून प्लॅस्टिक जारमध्ये भरावेत. बर्फी बियांचा मगज मोजून घेऊन, त्यात साखर मिसळून ब्लेंडरमध्ये चांगले एकत्र करावे. पाण्यामध्ये साखर विरघळून पाक तयार करावा. तो वरील पिठामध्ये मिसळून कणकेप्रमाणे मळून घ्यावे. ते जाडसर लाटून त्याचे चौकोनी आकाराचे काप करावेत. चांगल्या पॅकेजिंगमध्ये पॅकिंग करून हवाबंद करावे.

    चिक्की गुळामध्ये किंचित पाणी मिसळून तव्यावर ११५ ते ११८ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम करावे. या तापमानाला भाजलेले सूर्यफूल मगज तव्यावर टाकून चांगले मिसळून घ्यावे. ते तीस सेकंदापर्यंत शिजवून अर्धद्रव स्थितीपर्यंत शिजवून घ्यावे. मिश्रण गरम असतानाच तेल लावलेल्या लाकडी बोर्डवर ओतून पसरून घ्यावे. साधारण ५ मि.मी. जाडीचे लाटून घ्यावे. त्याचे चौकोनी तुकडे करून बोर्डवरून वेगळा करून सामान्य तापमानापर्यंत थंड करावा. चिक्कीचे योग्य पॅकेजिंग करून हवाबंद करावी.

    मार्झिपॅन

  • सूर्यफूल मगजामध्ये सखर मिसळून ब्लेंडरच्या साह्याने पावडर तयार करावी.
  • साखरेमध्ये पाणी मिसळून पाक तयार करावा.
  • वरील पावडरमध्ये पाक मिसळून कणकेप्रमाणे मऊसर मळून घ्यावा.
  • त्यात खाद्यरंग आणि काही प्रमाणात साखरेचे दाणे मिसळावेत.
  • यापासून विविध आकार तयार करून योग्य पॅकेजिंग घटकांद्वारे पॅकिंग करावे.
  • कुकीज

  • आवश्यक तेवढी आयसिंग शुगर सपाट पृष्ठभागावर घ्यावी. मार्गारीन, व्हॅनिला स्वाद, मैदा, सूर्यफूल मगज मिसळावे. या मिश्रणामध्ये थंड दूध घालत चांगले मळून घ्यावे.
  • हा गोळा अर्धा तास मुरू द्यावा.
  • त्याचे योग्य आकाराचे गोळे तयार करून लाटावेत. त्याच्या गोल, चौकोनी किंवा अन्य आकारामध्ये काप तयार करून २०० अंश सेल्सिअस तापमानाला १५ मिनिटांपर्यंत बेक करावेत. योग्य पॅकेजिंग करावे.
  • ब्रेड रोल

  • योग्य प्रमाणामध्ये मीठ, साखर आणि यिस्ट पाण्यामध्ये विरघळून घ्यावे. त्यात मैदा आणि मार्गारीन गाळून कणकेप्रमाणे गोळा तयार करावा. तो ३० ते ४० मिनिटे चांगला मुरू द्यावा.
  • त्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार योग्य आकार देऊन किंवा सपाट लाटून १० मिनिटे ठेवावा. त्यावर किंचित दुधाचे बोट फिरवून त्यावर सूर्यफुलाचे मगज बिया टाकाव्यात.
  • ते १८० अंश सेल्सिअस तापमानाला २० मिनिटे बेक करावे.
  • हे ब्रेड रोल खाण्यास तयार होतात.
  • पेस्टो सॉस तुळशीची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. लसून सोलून ठेवावा. चीज किसून त्यात सूर्यफुलाचे मगज मिसळावेत. या सर्व मिश्रणाची मिक्सरच्या साह्याने पेस्ट करावी. गरजेनुसार फोडणी घालता येते. ही पेस्ट काचेच्या बाटलीमध्ये साठवावी. सूप वाळवलेले टोमॅटो काप आणि आवरण काढलेल्या बियांची पावडर करून घ्यावी. त्यात लसूण, मीट, ओरेगॅनो, पार्सेली, मिरची पावडर, गरम मसाला आणि चवीपुरती साखर मिसळून घ्यावी. हे सर्व मिश्रण पाण्यामध्ये मिसळून, ते ५ ते १० मिनिटांपर्यंत उकळावे. खारवलेले सूर्यफूल दाणे पाण्यामध्ये मीठ मिसळून विरघळून घ्यावे. त्यात सूर्यफुलाचे दाणे टाकून दोन तासांपर्यंत उकळून घ्यावे. त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया बाहेर काढून बेकिंग शीटवर पसरून ठेवाव्यात. ओव्हनमध्ये तीन मिनिटांपर्यंत चांगल्या भाजून घ्याव्यात. त्यावर ऑलिव्ह तेल फवारून लसूण किंवा कांदा भुकटी व मीठ भुरभुरून मिसळून घ्यावे.

    संपर्क ः ramabhau@gmail.com

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com