agriculturai stories in marathi, agrowon,special article on rural trainning | Agrowon

माहिती, ज्ञान आणि शहाणपण
कांचन परुळेकर
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

शिकलेल्या माणसाकडे माहिती अन्‌ ज्ञान जरूर असते; पण अनुभवाने अन्‌ सतत कष्ट केल्याने, कृतिशील राहिल्याने, कमी शिक्षित वा अशिक्षित अशा ग्रामीण माणसाकडे शहाणपण खच्चून भरलेले असते. लोकशिक्षिका बनून जेव्हा वाडी-वस्तीवर पाऊल ठेवले, तेव्हा या गोष्टीची पदोपदी प्रचिती येऊ लागली.

शाळा-कॉलेजात जाऊन शिकता आले नाही, की माणसे स्वतःला अडाणी समजतात. वास्तविक जीवनात यशस्वी व्हायला माहिती, ज्ञान, कौशल्य, भविष्याचा वेध अन्‌ शहाणपण लागते. शिकलेल्या माणसाकडे माहिती अन्‌ ज्ञान जरूर असते; पण अनुभवाने अन्‌ कष्ट केल्याने, कृतिशील राहिल्याने, कमी शिक्षित वा अशिक्षित अशा ग्रामीण माणसाकडे शहाणपण खच्चून भरलेले असते. वंचित वस्तीतल्या शाळाबाह्य मुलांतही शहाणपण दिसून येते. लोकशिक्षिका बनून  जेव्हा वाडी-वस्तीवर पाऊल ठेवले तेव्हा या गोष्टीची पदोपदी प्रचिती येऊ लागली.
शाळाबाह्य कचरावेचक मुलांना आम्ही मेणबत्ती बनविणे शिकवित होतो. साच्यातील मेणबत्ती शिकवली अन्‌ प्रश्‍न विचारला, ‘‘तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही कोणती घरगुती साधने वापरून वेगळ्या आकाराची मेणबत्ती बनवाल?’’ वाटी, पणती, पेला, फुंकणी, मोदकपात्र अशी उत्तरे अपेक्षित होती; पण कचरावेचक मुलांनी एकदम अनपेक्षित उत्तर दिले ‘अंड्याच्या कवचात’. आम्ही चकीतच झालो. आजवर कधीही हा पर्याय आम्हाला सुचलाच नव्हता. प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी, ‘‘कवचातील पांढरा पापुद्रा हळुवारपणे काढा. मातीत वा वाळूत तोंड वर करून कवच उभे ठेवा. रंगीत पातळ मेण त्यात ओता. थंड झाल्यावर कवच काढून टाका. अंडे उलटे करून ठेवा. वरच्या निमुळत्या भागावर गरम सुई दाबून धरा. भोक पडेल. आधीच मेणात घालून घट्ट केलेला दोरा त्या भोकात सरकवा. मेणाचा एक थेंब भोकावर टाकून भोक बंद करा.’’ बोलतच होतो; पण मन म्हणत होते शाळेतच न गेलेल्या मुलांनी आम्हाला केवढा मोठा धडा दिला.

शेतमजूर महिलांना शास्त्रोक्त पद्धतीने अळे कसे घालावे याचे प्रशिक्षण देऊन दोडका बीवाटप करीत होतो. ‘अंगणात वा परड्यात खडबडीत नसणारी जागा निवडा. त्या जागी एक घमेले पालथे घाला. घमेल्याभोवती रेघ मारा. गोल तयार होईल. घमेले बाजूला काढून त्या गोल जागेत खणा. दोन पाटी माती बाहेर काढा. एक घमेले मातीचा चिखल बनवा. गोलाभोवती वरंबा तयार करा. पाणी, खत अडावे म्हणून राहिलेल्या एक घमेले मातीत एक घमेले उत्तम शेणखत मिसळा. ते मिश्रण खड्ड्यात ओता. तयार शिगेवर हात मारा. सपाट जागा मिळेल. वीतभर अंतर मोजा. दोन्ही टोकांना बोटाचे एक पेर एवढा खड्डा करा. त्यात बी आडवी टाका. एका अळ्यात दोन बिया असतात. मग खड्डे माती टाकून बुजवा. पाणी शिंपडा. खाली अळ्यात पाणी ओता. शिग ओली, खाली पाणी. केशाकर्षणाने पाणी वर खेचले जाऊन ते आधी बीला नंतर मुळांना मिळते. वेल वर आला की शेजारी काठी, वेलाला दोरी बांधून वेल काठीच्या आधारे घरावर, मांडवावर चढवा.’’ एक जण जोरात ओरडली, ‘‘अहो परडं अन्‌ अंगणच नाही तर अळं कुठं घालायचं?’’ मला काय उत्तर द्यावे ते सुचेना. तेवढ्यात एक आजी जोरात बोलल्या, ‘‘अगं परडं अंगण नसना. घराला दार तर हाय न्हवं? एक पोतं घे. त्यात माती अन्‌ शेणखत भरून बाजूनं हवा, पाणी जाया वाईक भोकं पाड. त्यात घाल आळ अन्‌ ठेव दारात.’’ जागेचा प्रश्‍न सुटला असं वाटेपर्यंत नकारनाथाला शरण गेलेली ती बाई म्हणाली, ‘‘अहो अत्यासाब, पाणी कुठं हाय? मग मात्र आजीचा पारा चढला. ‘‘अगं पदरच्या पैशानं बी घेऊन तुला शिकवाय माणसं इथवर आली. अर्धा तास तुला शिकवित्यात, अन्‌ तुझा नन्नाचा पाढा संपना. अगं रोज चूळ भरतीस का नाही? घरच्या चार माणसांनी चुळा पोत्यात टाकल्या की उगवतं की अळं’’ आम्ही फक्त माहिती अन्‌ ज्ञान दिले. आजीने मोलाचे शहाणपण दिले. शेतमजुरांनी पोत्यात अळी घालून प्रत्येकी शंभरवर दोडकी काढली, तेव्हा मी आजीच्या शहाणपणाला दंडवतच घातला.

चारसूत्री भातशेती, पाणी उपलब्ध नसताना जमिनीतील ओल व दव यांच्या साह्याने मटार उत्पादन, सामुदायिक शेती, कंत्राटी शेती, गांडूळखत निर्मिती, वैभव विळा वापर, नारळ काढण्याची शिडी असे शेती तंत्र अंतरण करताना शेतकऱ्याचा अनुभव मोलाचा ठरला; म्हणून वाटते शहरी वा शिक्षिताला सहजप्राप्त ज्ञान आणि माहिती, वंचित तसेच ग्रामिणांचे शहाणपण यांची सांगड घातली गेली, तर आमचे प्रजासत्ताक महासत्तेच्या शर्यतीत लवकरात लवकर अग्रणी ठरेल.
कांचन परुळेकर : ०२३१-२५२५१२९
(लेखिका ‘स्वयंसिद्धा’च्या संचालिका आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...