द्राक्षवेलीवरील घड जिरण्याच्या समस्येवरील उपाय

द्राक्षवेलीवरील घड जिरण्याची समस्या व उपाययोजना
द्राक्षवेलीवरील घड जिरण्याची समस्या व उपाययोजना

या वर्षी सर्व द्राक्ष विभागामध्ये पाऊस झाला. त्यातही सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे पानांच्या संरक्षणासाठी फवारण्या घेण्यात अडचणी आल्या. पावसाळी हवामानामुळे नवीन फुटी येत राहिल्या. परिणामी घडनिर्मितीमध्ये अडचणी येण्यासोबतच घड जिरण्याच्या समस्या उद्‍भवण्याची शक्यता आहे. या समस्येवरील उपाययोजनांची माहिती या लेखात घेऊ. सर्वसाधारणपणे हायड्रोजन साईनामाईड लावल्यानंतर फुटी आठ ते बारा दिवसांत दिसू लागतात. स्वमुळावरील द्राक्षबागेत आठ दिवसांत, तर खुंटावरील द्राक्षबागेत १०-१२ दिवसांत फुटी निघतात. फुटी निघाल्यानंतर साधारणतः एका आठवड्याने फुटीला तीन ते पाच पाने दिसू लागतात. या वेळी काही फुटीसोबत घड निघण्याऐवजी बाळी घड अथवा बाळी निघतात. यालाच ‘घड जिरणे’ असे म्हणतात. जोम कमी असलेले, पांढऱ्या रंगाचे व कमकुवत घट जिरण्याची शक्यता अधिक असते. घड जिरण्याची कारणे पुढीलप्रमाणे ः

  • उशिरा झालेली खरड छाटणी.
  • खरड छाटणीनंतर ढगाळ हवामान.
  • फुलोरा निर्मितीतील घटकांमधील बदल.
  • सूक्ष्म घडांचे पोषण.
  • वेलीतील अन्नसाठा.
  • बोद व पांढऱ्या मुळींची संख्या.
  • ऑक्‍टोबर छाटणीतील चुका.
  • जमिनीचे व्यवस्थापन.
  • योग्य छाटणी व एकसारखी फूट.
  • सीपीपीयूचा अयोग्य वापर.
  • १. उशिरा झालेली खरड छाटणी ः उशिरा खरड छाटणी झालेल्या बागांमध्ये छाटणीनंतर अन्ननिर्मिती व अन्नसाठा होण्यासाठी आवश्यक सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. परिणामी घड जिरतात. उपाययोजना ः

  • खरड छाटणी उशिरा न घेता योग्य वेळी घ्यावी.
  • बागांची खरड छाटणी मार्चमध्ये केल्यास घड जिरण्याची समस्या शक्‍यतो येत नाही.
  • २. खरड छाटणीनंतर ढगाळ हवामान ः सुप्त अवस्थेतील घडनिर्मिती घडवून आणणे हा खरड छाटणीचा मुख्य हेतू असतो. सूक्ष्म अवस्थेतील घडनिर्मितीची प्रक्रिया चालू असताना प्रतिकूल वातावरण असल्यास पेशी विभाजनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्याचा विपरीत परिणाम घडनिर्मितीवर होतो. काही वेळा अंशतः घडनिर्मिती होते. यामुळे प्रत्यक्ष फळ छाटणीमध्ये मिळणारा घड हा जोमदार नसतो किंवा घडांची संख्या कमी राहते. उपाययोजना ः

  • खरड छाटणी योग्य वेळी घ्यावी. घडाचे योग्य पोषण होऊन जास्तीत जास्त घडनिर्मिती होते.
  • फळ छाटणी घेण्यापूर्वी द्राक्ष काडीची तपासणी करून घ्यावी. नेमकी कुठल्या डोळ्यावर घडनिर्मिती चांगली आहे, याच्या निदानानुसार पुढील नियोजन करावे.
  • ३. फुलोरा निर्मितीतील घटकांमधील बदल ः फळधारक डोळ्यांची निर्मिती तीन अवस्थांमध्ये होते. ॲनालजिनची निर्मिती, फुलांची निर्मिती यांसह फुलोऱ्याची निर्मिती खूप महत्त्वाची असते. फुलोरा निर्मितीसाठी सूर्यप्रकाश, सायटोकायनीन, आरएनए या आवश्‍यक घटकामध्ये बदल झाल्यास, त्याचा परिणाम शेंडा किंवा बाकी घडनिर्मितीवर होतो. उपाययोजना ः या वेळी योग्य सूर्यप्रकाश काडीला मिळेल याची काळजी घ्यावी. त्यामुले सायटोकायनीन व आरएनए यांचे गुणोत्तर समतोल राहण्यास मदत होईल. ४. सूक्ष्म घडांचे पोषण ः काडी तपासणी अहवालामध्ये अनेक वेळा पांढऱ्या घडांची नोंद असते. म्हणजेच सूक्ष्म घडनिर्मितीमधील पहिले दोन टप्पे व्यवस्थित पार पडलेले असतात. परंतु तिसऱ्या टप्प्यात खरड छाटणीनंतर ६१ ते ९० दिवसांच्या कालावधीमध्ये काही कारणांमुळे घडांचे पोषण होत नाही. असे घड फुटीच्या वाढीच्या अवस्थेत जिरण्याची शक्‍यता जास्त असते. पावसाळी हवा असल्यास घड जिरण्याचे प्रमाण वाढते. मात्र स्वच्छ हवामान असल्यास असे घड टिकून राहत असले तरी त्यांची समाधानकारक वाढ होत नाही. उपाययोजना ः

  • काडी तपासणी अहवालानंतर घड व घडांची संख्या लक्षात घेऊन छाटणी करावी.
  • तज्ज्ञांच्या साह्याने सूक्ष्म अन्नद्रव्ये, रोग व किडींचे व्यवस्थापन करावे.
  • ५. वेलीतील अन्नसाठा ः खरड छाटणीनंतर काडी पक्वतेच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव, पाने गळणे किंवा नवीन फुटींची सतत वाढ या कारणामुळे वेलीमध्ये पुरेसा अन्नसाठा होत नाही. वास्तविक सूक्ष्म घडनिर्मिती आधीच झालेली असल्याने फळ छाटणीत ही समस्या यायला नको. मात्र, फुटींच्या अमर्याद वाढीमुळे घडाचा विकास पूर्ण न झाल्याने ही अडचण निर्माण होते. उपाययोजना ः

  • वेलीतील अन्नसाठा संतुलित राहण्यासाठी वेळोवेळी टॉपिंग व पिचिंग करावे. त्यामुळे अन्नाचा ऱ्हास न होता घडाचे पोषण होईल.
  • रोग व किडी यांचे वेळोवेळी नियंत्रण करावे.
  • ६. बोद व पांढऱ्या मुळींची संख्या ः छाटणीच्या वेळी वेलीच्या वाढीसाठी पांढरी मुळी कार्यक्षम असावी लागते. आधीच वेलींमध्ये अन्नसाठा कमी, त्यात मुळी अकार्यक्षम असल्यास घड जिरण्याची समस्या निर्माण होते. उपाययोजना ः बोदामध्ये सेंद्रिय खतांच्या योग्य मात्रा देऊन, तो भुसभुशीत करावा. त्यामुळे पांढऱ्या मुळींची संख्या व कार्यक्षमता वाढते. ७. ऑक्‍टोबर छाटणीतील चुका ः फळ छाटणीतील चुकांमुळे वेलीवर घट कमी येतात. योग्य डोळ्यावर छाटणी न झाल्याने घड जिरण्याची शक्‍यता वाढते. कधी कधी हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग सर्वच डोळ्यांवर केले जाते. त्यामुळे सर्व डोळे फुटून निघतात. जास्त डोळे फुटून आल्याने वेलीमध्ये उपलब्ध अन्नसाठ्याची विभागणी होऊन घड जिरणे किंवा घड लहान येणे यांसारखे दुष्परिणाम दिसतात. उपाययोजना ः सर्वप्रथम फळछाटणी घेण्यापूर्वी द्राक्ष काडीची तपासणी करावी. नेमका कुठल्या डोळ्यावर घड आहे हे जाणून, त्यानुसार व काडीच्या जाडीनुसार हायड्रोजन सायनामाईडचा वापर करावा. जास्त डोळे न फुटता अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होईल. ८. जमिनीचे व्यवस्थापन ः

  • जमिनीचे व्यवस्थापन करताना फळ छाटणी घेण्यापूर्वी १५-२० दिवस अगोदर बोद हलकेसे मोकळे करावे. पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल.
  • या वर्षी मोठ्या प्रमाणातील पावसामुळे बऱ्याच द्राक्ष बागांमध्ये छाटणीपूर्वीच पानगळ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर फुटी निघाल्या आहेत. छाटणी घेण्यापूर्वी काडी तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरेल.
  • ९. योग्य छाटणी व एकसारखी फूट ः

  • काडी तपासणी करून योग्य डोळे ठेवून फळ छाटणी घ्यावी.
  • हायड्रोजन सायनामाईडचा वापर योग्य डोळ्यावरच योग्य प्रमाणात करावा.
  • डोळे फुटून निघाल्यानंतर साधारणपणे एक फूट घडाची व एक वांझ फूट विस्ताराच्या दृष्टीने ठेवावी. लागवडीच्या अंतरानुसार व द्राक्ष जातीनुसार संख्येमध्ये फरक पडू शकतो.
  • १०. सीपीपीयूचा वापर ः

  • सीसीसी या संजीवकाचे उर्वरित अंश शिल्लक राहत असल्याने त्याच्या वापरावर बंदीच आली आहे. त्यामुळे त्याचा वापर शक्‍य नाही. पूर्वी सीसीसीच्या सोबत ६ बी.ए या संजीवकाचा वापर केला जात असे. परंतु ६ बी.ए चे सीआयबी यांच्या नोंदणी सूचीमध्ये समावेश नाही. त्यामुळे त्याचादेखील वापर करता येत नाही. घड जिरण्याची समस्या निवारण्यासाठी सीपीपीयू या संजीवकाचा कमी प्रमाणात (०.२५ पीपीएम) फवारणीसाठी वापर केल्यास फायदा होऊ शकतो. याच्या वापरापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्‍य घ्यावा.
  • वेलीच्या वाढीचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी पाणी व नत्र यांचा वापर कमी करावा. या काळात वेलीच्या वाढीचा वेग मंदावणे गरजेचे असते. यामध्ये रसायनांचा वापर टाळावा. जोपर्यंत घड व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत नत्र व जीएचा वापर टाळावा. घडामध्ये सुधारणा झाल्यावर शिफारशीप्रमाणे जीए या संजीवकाच्या फवारण्या घ्याव्यात.
  • प्रत्येक द्राक्षबागेची रासायनिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने एकाच प्रकारची उपाययोजना उपयुक्त ठरणार नाही. समस्येचे मूळ शोधण्यासाठी बागेत केल्या जाणाऱ्या कामांची नोंद ठेवल्यास फायदा होतो. या नोंदीनुसार स्वअनुभव आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना केल्यास निश्‍चितच फायदा होईल.
  • संपर्क ः  ०२०- २६९५६०७५ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com