जमिनीतील क्षारांचे व्यवस्थापन

क्षार व्यवस्थापन
क्षार व्यवस्थापन

मीठ (क्षार) यांच्या वापरामुळे होणारे दीर्घकालीन नुकसान व जमिनीच्या सुपीकतेवर दुष्परिणाम याविषयी पूर्वार्धामध्ये माहिती घेतली. आता जमिनीमध्ये असलेल्या क्षारांचे व्यवस्थापन करण्याविषयी माहिती घेऊ. विविध कारणांमुळे जमिनीमध्ये क्षार भूपृष्ठावर जमा होतात. हे कारणे नेमकी जाणून घेऊन त्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. मातीमध्ये क्षार वाढण्यासाठी जबाबदार घटक

  • खनिजांच्या नैसर्गिक विघटनानंतर तयार होणारे क्षार.
  • सिंचनासाठी क्षारयुक्त पाण्याचा वापर.
  • जमिनीची निचरा शक्ती कमी असल्यास पाण्यातील क्षार जमिनीवर जमा होतात
  • जमिनीतून उपळणारे पाणी.
  • बाहेरून क्षारयुक्त खते, मीठ मातीत टाकणे.
  • अतिबाष्पीभवन.
  • कालवा सिंचन. (स्रोत ः गर्ग आणि गुप्ता, १९९७):
  • क्षार व्यवस्थापन : १. वनस्पतीतील प्रतिकार यंत्रणा - नैसर्गिकरीत्या काही वनस्पतींमध्ये विशिष्ठ पेशीरचनेमुळे क्षारांचे दुष्परिणाम कमी करण्याची क्षमता असते. प्रत्येक वनस्पतीमध्ये ही क्षारांसाठी प्रतिकारक्षम असेलच असे नाही. अशी संवेदनशील पिके क्षारयुक्त जमिनीमध्ये घेणे टाळावे. उदा. खालील वर्गीकरणातील निकृष्ट गटातील पिके. फळ पिकांचे प्रतिकारक क्षमतेनुसार वर्गीकरण ः

  • उत्तम ः नारळ, चिंच
  • सरासरी ः अंजीर, फणस, बोर, चिकू, आंबा, लिंबू, मोसंबी
  • ठीक ः संत्रा, सीताफळ, पेरू, अननस, डाळिंब
  • निकृष्ठ ः केळी, काजू, द्राक्ष, पपई, स्ट्रॉबेरी (स्रोत ःब्राऊन, फ्लोरिडा, अमेरिका), २००१)
  • २. प्रतिकारक जातींची पैदास ः क्षारयुक्त परिस्थितीमध्ये क्षार सहनशील वाण निवडणे सर्वात महत्वाचे साधन आहे. त्यासाठी क्षार सहनशील किंवा प्रतिकारक जाती पैदास करणे आवश्यक असते. अरुंद अनुवांशिक पाया असणारे फळपीक वाण (उदा. संत्रावर्गीय फळपिके, द्राक्ष) यांचा विकास आणि प्रसार केला जातो. ३. जनुकीय अभियांत्रिकी ः जनुकांमध्ये योग्य बदल करून, आवश्यक ते बदल करता येतात. उदा. किवी, संत्रावर्गीय फळपिके. ४. माती आणि पाणी व्यवस्थापन ः अ) निचरा प्रणाली (लिचिंग) - अतिरिक्त पाणी शेतात सोडून, मातीतील क्षारांचा निचरा करून घेतला जातो. संपूर्ण शेतात पाणी सोडून देणे ही सोपी पद्धत आहे. मातीतील क्षार लिचिंगद्वारे बाहेर काढण्यासाठी लागणारे अंदाजे पाणी

    क्षार कपात (%) निचऱ्यासाठी आवश्यक पाणी
    ५० % ६ इंच
    ८० % १२ इंच
    ९० % २४ इंच
      (स्रोत : कार्डन व सहकारी, २००३)

    आ) रसायने ः क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी जिप्सम, गंधक व सल्फ्युरीक ॲसिड यांचा सामान्यपणे वापर होतो. आम्लाच्या वापरामुळे क्षारपड जमिनीतील विनिमययोग्य सोडियम प्रमाण (टक्के) (ईएसपी), सोडियम (एसएआर) व सामू कमी होतो. इ) स्क्रॅपिंग स्क्रॅपिंगद्वारे जमिनीवरील मिठाचा थर काढून टाकणे; विस्कळीत करणे. सपाटीकरण करणे, खोल नांगरणी करणे. यानंतर चांगल्या प्रतीचे आणि पुरेसे पाणी सोडून निचरा केले जाते. ई) हिरवळीची खते व शेणखत - शेंगावर्गीय पिकांची लागवड आणि शेणखत वापरल्यास सेंद्रिय कर्बासोबतच जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते. मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढून जमिनीची स्थिती सुधारते. उ. हेलोफाईटस - एका संशोधनानुसार, वनस्पतींच्या १५०० पेक्षा जास्त प्रजाती क्षार प्रतिकारक आहेत, त्यांना ‘हेलोफाईटस्’ या नावाने ओळखले जाते. यातील काही प्रजाती समुद्रातील पाण्यातही वाढू शकतील, इतक्या सहनशील आहेत. उदा. खजूर - गुजरात मधील कच्छ प्रदेश. ऊ) आच्छादन - दोन पाण्याच्या पाळ्या दरम्यान आणि शेतात कोणतेही पीक नसणाऱ्या काळात जमिनीतील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होते. या प्रक्रियेत क्षार मातीच्या पृष्ठभागावर येतात. जमिनीवर अाच्छादन केल्यास बाष्पीभवनाची प्रक्रिया मंदावते. क्षार जमा होण्याचे प्रमाण कमी होते. आच्छादनासाठी उपयुक्त घटक ः पॉलिथीन पेपर, भुस्सा, गवत, पेंढा, उसाचे पाचट इ. ए) क्षार प्रतिकारक खुंट, जातीचा वापर : फळपिकांचा विचार केला तर वेगवेगळ्या खुंटाची तसेच जातींची क्षार प्रतिकार क्षमता वेगवेगळी असते. फळ पिकांमध्ये क्षारांमुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी क्षार प्रतिकारक खुंटाचा किंवा जातीचा वापर करणे ही सर्वात सोपी व उपयुक्त पद्धत आहे. फळपीकनिहाय काही क्षार प्रतिकारक खुंट : संत्रावर्गीय फळपिके - रफ लेमन, रंगपूर लाईम, सोर ऑरेंज, स्वीट ऑरेंज, रिडज् एपल आंबा- कुरुक्कन अॅपल – मेर्टन - ७९३ जर्दाळू – प्याराडॉक्स द्राक्ष – साल्ट क्रीक, डॉगरिज, १६१३

    (स्रोत ः पाठक आणि पाठक (२००१), नवी दिल्ली )

    क्र. फळपीक क्षार प्रतिकारक जाती
    १. बोर गोला, सेब, उमराण, मेहरून, बनारसी
    २. डाळिंब ढोलका, कंधारी, गणेश, जोधपूर रेड
    ३. आवळा  बनारसी, एनई-७, कृष्णा, चकैया
    ४. बेल मिर्झापूर, बस्ती नं.-१
    ५. सीताफळ बालानगर, रेड सीताफळ, मामोथ
    ६. खजूर हल्वी, बरही, मेदजूल
        (स्रोत ः पाठक आणि पाठक (२००१), नवी दिल्ली )

    क्षारांचे पिकांवर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी झालेल्या संशोधनाचे निष्कर्ष ः

  • आंब्याचा ओलौर खुंट वापरल्यास झाडाची उंची, पानांची संख्या व मुळांच्या वाढीवर क्षारांचा कमी दुष्परिणाम होतो. (दयाळ व सहकारी, दिल्ली, २०१४)
  • बोराची बनारसी ही जात क्षारपड जमिनीमध्ये इतर जातींच्या तुलनेत चांगली वाढते व लवकर फुलोऱ्यात येते. तसेच डाळिंबाची मृदुला जातीची क्षारयुक्त जमिनीत लागवड केल्यास झाडाची उंची, फांद्यांची संख्या, झाडाचा विस्तार या बाबींवर क्षारांचा परिमाण होत नाही. तसेच, क्षारयुक्त जमिनीमध्ये इतर जातींपेक्षा या जातीला बहार लवकर येतो. (बालामोहन व सहकारी, त्रिची, तमिळनाडू २००१ व २००२)
  • क्षारयुक्त जमिनीमध्ये आवळा बागेला पॉलिथीन आच्छादन केल्यास झाडांची वाढ चांगली होते. (राव व पाठक, फैजापूर, उत्तर प्रदेश, १९९६)
  • आधुनिक तंत्रज्ञान ः

  • इस्राईलमध्ये चुंबकीय पाणी पद्धती व जैव-निचरा या आधुनिक पद्धतींचा वापर करून क्षारयुक्त पाणी शेतीसाठी वापरले जाते. चुंबकीय पाणी पद्धतीमध्ये चुंबकीय ऊर्जेद्वारे क्षारयुक्त पाण्याच्या रेणूचे समान सहा भाग करतात, जैव निचऱ्यासाठी निलगिरी, शिसव, सुरू सारख्या झाडांचा वापर केला जातो.
  • भारतात या पद्धतींसोबतच ‘दोरुवू’, स्किंमिंग वेल सारख्या तंत्राचाही वापर केला जातो.
  • संपर्क  : डॉ. विनायक शिंदे- पाटील, ९४२२२२११२०,

    (डॉ. शिंदे-पाटील हे या विषयातील अभ्यासक असून, डॉ. वांद्रे या  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे संशोधन सहयोगी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com