फुलांनी फुलले जाधव बंधूंचे शिवार

फुलांनी फुलले जाधव बंधूंचे शिवार
फुलांनी फुलले जाधव बंधूंचे शिवार

बोरसांजणी (जि. जालना) येथील एकेकाळी सालगडी म्हणून काम करणाऱ्या गणेश, किसन आणि नारायण या जाधव बंधूंनी पारंपरिक शेतीला फुलशेतीची जोड देत, त्यातून स्वयंपूर्णता गाठली आहे. अल्पशिक्षित असलेल्या या भावंडांनी स्वतंत्रपणे फुलबाजारात आपली पतही निर्माण केली आहे. जालना जिल्ह्यातील बोररांजणी (ता. घनसावंगी) या तीन हजार लोकवस्तीच्या गावातील सर्जेराव जाधव यांची तीन मुले- गणेश, किसन आणि नारायण हे एकेकाळी सालगडी म्हणून काम करत. मात्र, पारंपरिक शेतीला फुलशेतीची जोड दिल्याने चांगले उत्पादन मिळवले. त्यातून फुलबाजारासह समाजातही उत्तम पत निर्माण केली आहे. अठरा वर्षांपूर्वी 10 -12 वीतून शाळा सोडल्यानंतर लगेच गणेश व किसन यांनी गावातील शेतकऱ्यांकडे सालगडी म्हणून कामाला सुरवात केली. नारायण यांनी तरी त्याआधीच शाळा सोडल्याने सालगडी म्हणून कामाचा श्रीगणेशा केला होता. या शेतकऱ्यांकडे काम करतानाच फुलशेतीचे प्राथमिक धडे मिळाले. त्याच सुमाराला त्यांच्या वडिलोपार्जित शेतीच्या वाटण्या होऊन चार एकर जमीन प्रत्येकाला मिळाली. या शेतीमध्ये गणेश यांनी पारंपरिक पिकासोबतच गुलाब फुलशेतीला सुरवात केली. थोरल्या भावाला फुलशेतीतून मिळणारे यश पाहून किसन आणि नारायण यांनीही फुलशेती सुरू केली. गेल्या अठरा वर्षांपासून सातत्यपूर्ण फुलशेती आणि दर्जेदार फुलांमुळे नांदेडसह औरंगाबाद येथील फुलबाजारामध्ये चांगली पत मिळवली आहे.

सध्या जाधव बंधूंकडे किमान दोन एकर क्षेत्रामध्ये स्वतंत्रपणे गुलाब, शेवंती, निशींगध, झेंडू, अष्टर, गलांडा यांची लागवड असते. उर्वरित दोन एकर क्षेत्रामध्ये कापूस, सोयाबीन, मूग यांसारखी पिके घेतात. मोसंबीची 100 झाडेही आहेत. फुलांच्या लागवडीचा क्रम ठरलेला ः

  • हंगामाच्या सुरवातीला 10 जूनच्या आसपास शेवंतीची लागवड करतात. या वर्षी जुनी गुलाब लागवड मोडून नवीन लागवड केली आहे. त्यासोबत गलांडा, निशीगंध या फुलांची लागवड करतात. शेवंतीची फुले दसरा ते दिवाळीपर्यंत बाजारात जातात.
  • त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या बिजली फुलांची लागवड करतात. त्यापासून पाच महिन्यांनंतर फुले सुरू होऊन एक ते दीड महिन्यापर्यंत सुमारे 22 ते 25 क्विंटल फुले मिळतात. त्याला सरासरी 30 ते 40 रुपये प्रतिकिलो असा दर मिळतो. यात कीडनाशकांच्या फवारणीचा खर्च अधिक असल्याने उत्पादन खर्च 40 हजारापर्यंत जात असल्याचे गणेश जाधव यांनी सांगितले.
  • या वर्षी मोसंबी बागेत 20 गुंठे क्षेत्रामध्ये आंतरपीक झेंडू लागवड होती.
  • उत्पन्नांचा ताळमेळ ः शेवंतीपासून दीड लाख, बिजली या फुलापासून तीस हजार, गुलाब, गलांडा यापासून प्रत्येकी पन्नास हजार असे प्रत्येकी एकूण दोन लाख तीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. एकूण फुलांचा उत्पादन खर्च सुमारे एक लाख रुपयांपर्यंत येतो. वर्षाअखेरीस एक ते दीड लाख रुपये फायदा शिल्लक राहतो. विक्रीचे व्यवस्थापन

  • संध्याकाळी घरातील महिला फुलांची तोडणी करतात. त्यानंतर घरी फुलांची प्रतवारी करतात.
  • प्रतवारीनुसार फुले ओल्या कापडातून बॉक्‍समध्ये ठेवून विक्रीला नेले जाते. नांदेडसह औरंगाबाद येथे फुलांची विक्री केली जाते. हंगामानुसार फुलांना पन्नास ते सत्तर रुपये किलो दराने भाव मिळतो. गुलाबाला शेकडा 40 ते 50 रुपये दर मिळतो.
  • उन्हाळ्यामध्ये शेतीत कामे कमी असल्याने लग्नसंमारंभाच्या सजावटीची कामे घेतात. त्यातून तीन ते दहा हजार रुपयांपर्यंत रोज मिळतो. चांगला लग्नहंगाम असल्यास घरातील फुलांचा वापर होऊन, एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
  • रोजची शर्यत वेळेशी ः पहाटे चार वाजता उठून मोटारसायकलवरून 15 किमी अंतरावरील परतूर गाठतात. तिथून सकाळी सहा वाजता मुंबई-नांदेड (देवगिरी एक्‍स्प्रेस) रेल्वेने नऊ -साडेनऊ वाजेपर्यंत नांदेड येथील बाजारात फुले नेतात. कधी बाजारभाव पाहून औरंगाबाद येथेही फुले नेतात. पुन्हा 10 वाजताची रेल्वे गाठून दीड ते दोन वाजेपर्यंत गावात माघारी येतात. दोननंतर शेतातील कामांचे नियोजन त्यांची वाट पाहत असते. अलीकडे फुले बाजारात नेण्याचे काम तिघे भावंडे आलटून पालटून करत असल्याने थोडा ताण कमी होत असल्याचे गणेश यांनी सांगितले. त्यांच्याप्रमाणे गावातील 25-30 शेतकरी फुलांच्या विक्रीसाठीही धडपड करत असतात. फुलशेतीसाठी एकत्रित विहीर ः गणेश यांनी फुलांची लागवड सुरू केली तेव्हा त्यांच्याकडे स्वतःची विहीर नव्हती. दुसऱ्यांकडून पाणी विकत घेत धाडस केले. मात्र, एक वर्षातील फुलशेतीचा सगळा नफा जमा करून त्यातून विहीर खोदली. येवला लघुसिंचन तलावामुळे विहिरीला उन्हाळ्यातही चांगले पाणी असते. ही विहीर भावंडांच्या फुलशेतीसाठी संजीवनी ठरली असून, आळीपाळीने पाण्याचा वापर करतात. सिंचनामुळे पारंपरिक पिकासह फुलशेतीमध्ये शाश्‍वतता आली आहे. पाण्यामध्ये बचत करण्यासाठी शासकीय योजनेची वाट न पाहता त्यांनी ठिबक सिंचन संचही बसविला आहे. फुलशेतीतून आली समृद्धी आता प्रत्येक जण स्वतंत्र असला तरी खते, किडनाशकाची खरेदी एकत्रच करतो. त्याचप्रमाणे फुलांच्या विक्रीची व्यवस्थाही एकत्रित केली जाते. फुलशेतीने चांगला हात दिल्याने आमच्या बंधूंनी शेती खरेदी व घरांचे बांधकामही केले. आम्ही स्वतः आर्थिक परिस्थतीमुळे शिक्षण घेऊ शकलो नसलो तरी सर्वांची मुले चांगले शिकत आहेत, यातच मोठा आनंद आहे. - गणेश जाधव, संपर्क - 7350838765 बाजारात पत मिळवली अशिक्षित असल्याने सुरवातीला माझ्याकडे सालगडी म्हणून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, पुढे स्वतःच्या शेतीत फुलशेती करत तिघांही भावंडांनी स्वतंत्रपणे बाजारात चांगली पत मिळवली आहे. यातून हातात पैसा खेळता राहतो. त्यामुळे नुसतेच हंगामी शेती करण्याऐवजी फुलशेतीकडे गावातील अनेक शेतकरी वळले आहेत. - नारायण जाधव पारंपरिक पिकांबरोबर फुलशेती फायद्याची : पारंपरिक शेतीच्या जोडीला फुलशेतीने उत्पन्नांचा चांगला स्रोत मिळाला आहे. गेल्या अठरा वर्षांपासून उत्तम फूल उत्पादन घेत असल्याने परिसरामध्ये जाधव बंधूंचे चांगले नाव झाले आहे. फुलांच्या विक्रीसाठी रेल्वे वाहतूक तुलनेने स्वस्त व वेगवान ठरते. त्याचाही फायदा सर्वांना होत आहे. - किसन जाधव, संपर्क - 9421086771

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com