दुग्धव्यवसायातून बसवली कुटुंबाची आर्थिक घडी

दुग्धव्यवसायातून बसवली कुटुंबाची आर्थिक घडी
दुग्धव्यवसायातून बसवली कुटुंबाची आर्थिक घडी

तीन एकर शेतीमध्ये तीन कुटुंबांचे पालनपोषण करणे हे तसे अवघडच. मात्र, जालना जिल्ह्यातील पानेवाडी (ता. घनसावंगी) येथील अक्रोद रामकिसन तिडके यांनी हार न मानता आपल्या तुटपुंज्या शेतीला मुक्त संचार पद्धतीने पशुपालनाची जोड दिली आहे. या दुग्धव्यवसायातून आपल्या एकत्रित कुटुंबाची आर्थिक घडी त्यांनी व्यवस्थित बसवली आहे. जालना जिल्ह्यातील पानेवाडी (ता. घनसावंगी) हे दोन हजार लोकवस्तीचे गाव. मध्यम ते काळी अशी सुपीक जमीन असूनही, गेल्या काही वर्षांमध्ये पावसामध्ये सातत्य नसल्याने शेती व्यवसायाला फटका बसत आहे. तसेच, वाढत्या कुटुंबासाठी शेतीचे क्षेत्रही कमी होत असल्याने दूध व रेशीम उत्पादन अशा पूरक व्यवसायाकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे गावातच गायी व म्हशींच्या उत्तम जातींची आवश्‍यकता कायम भासत असते. येथील अक्रोद रामकिसन तिडके हे पूर्वी गाय- म्हशी खरेदी- विक्रीचा व्यवसाय करत. जनावरांची खरेदी करून काही दिवसांनी गाभण राहिल्यानंतर त्यांची विक्री केल्याने चांगला दर मिळतो. या व्यवसायामध्ये फायद्याप्रमाणेच तोट्याचे प्रमाणही जास्त आहे. त्याचप्रमाणे काही कारणाने जनावरांची वेळेत विक्री शक्‍य होत नाही, अशा वेळी जनावरांच्या वेतानंतर दुधाचा व्यवसायही करावा लागत असे. त्यांच्याकडे केवळ तीन एकर शेती असल्याने केवळ शेतीवर प्रपंच चालवणे अवघड ठरत होते. त्यातच त्यांच्या दोन्ही मुलांची लग्ने झाल्याने कुटुंबाचा आकार वाढला. कुटुंबाच्या भरणपोषणासाठी आणखी काही पूरक व्यवसाय करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली. यातून दुधाच्या व्यवसायातून चांगला व तुलनेने शाश्‍वत फायदा मिळू शकतो, हे अक्रोद यांच्या लक्षात आले. अशा प्रकारे त्यांनी दोन वर्षांपूर्वी दुग्धव्यवसायामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. मुक्त संचार गोठा पद्धतीने व्यवस्थापन ः

  • पूर्वीच्या जनावरे खरेदी- विक्री व्यवसायामुळे जातिवंत जनावरांची अक्रोद यांना चांगली माहिती होती. नगर, जामखेड या भागातून 9 संकरित गायी, तर पंजाब व हरियाना येथून तीन गायींची खरेदी केली. बॅंकेकडून तीन लाख कर्जाऊ घेत उर्वरित रक्कम स्वतःची घातली.
  • जनावरांच्या गोठ्यासाठी तीन गुंठे क्षेत्रात 40 फूट बाय 22 फूट आकारमानाचे शेड बनविले आहे.
  • चारही बाजूंनी विशिष्ट उंचीपर्यंत बांधकाम केले असल्याने हवा खेळती राहते. तसेच, सूर्यप्रकाशही आतपर्यंत येतो.
  • त्यात दोन्ही बाजूंनी गायी बांधल्या जातात. गायींना चारा खाण्यासाठी जास्त वाकावे लागू नये यासाठी तीन फूट उंचीवर गव्हाण केली. तिथेच पिण्याच्या पाण्यासाठी 4 फूट बाय 10 फूट हौद तयार केला आहे.
  • गायी व गोठ्यातील स्वच्छता वेळेवर होण्यासाठी जनरेटरची सुविधा केली आहे. शेण आणि गोमूत्र एका ठिकाणी जमा केले जाते.
  • सकाळी दूध काढल्यानंतर जनावरांना दिवसभर या मुक्त गोठ्यात सोडले जाते, त्यामुळे गायींवरील ताण कमी होऊन दूध उत्पादनामध्ये वाढ होत असल्याचे अक्रोद तिडके यांनी सांगितले.
  • हिरव्या चाऱ्यासाठी शेतीचे उत्तम नियोजन ः

  • दुग्धव्यवसायामध्ये चाऱ्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते, त्यावरच व्यवसायातील नफा अवलंबून असल्याचे जाणून तिडके यांनी तीन एकर क्षेत्राचे नियोजन केले आहे. हिरव्या चाऱ्यासाठी एक एकर क्षेत्रामध्ये मका, मेथीघास यांची नियमित लागवड करतात.
  • वाळलेल्या चाऱ्यासाठी हंगामानुसार गहू, मका, बाजरी, ज्वारी ही पिके घेतली जातात. पाण्याच्या उपलब्धतेनुसार उसाचेही पीक घेतले जाते. यातून मिळालेला गव्हाचा भुसा, वाळलेला कडबा साठविण्यात येतो.
  • मक्‍याचा भरडा, हरभऱ्याचा चुरा यापासून पशुखाद्य बनवून तीन ते साडेतीन किलो याप्रमाणे जनावरांना दिला जातो, त्यामुळे पशुखाद्यावरील खर्चात बचत होते.
  • कुट्टी यंत्राद्वारे बारीक करून चारा दिल्याने त्याचा योग्य वापर होतो.
  • सुमारे चार ते पाच वर्षांच्या अनुभवातून गायीच्या आहाराचा अंदाज त्यांना आला आहे. त्याचप्रमाणे जनावरांचे वर्तन, हालचाल, स्पर्श यावरून आरोग्याचा अंदाज घेता येतो. किरकोळ आजारावर (उदा. पोटफुगी, ताप) ते घरीच उपचार करतात. तीव्र आजाराबाबत मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला घेतला जातो.
  • दुग्धव्यवसायाचा ताळेबंद ः

  • तिडके यांच्याकडे तेरा संकरित गायी आहेत. त्या प्रतिदिन वीस ते पंचवीस लिटरपर्यंत दूध देतात. किमान सात- आठ गायी दुधावर असतील, असे नियोजन केले जाते. त्यामुळे सकाळ व संध्याकाळचे मिळून प्रतिदिन सुमारे दीडशे लिटर दूध पाच किमी अंतरावरील शेवगळ येथील दूध संकलन केंद्रावर दिले जाते.
  • दुधाला सरासरी 4.2 ते 4.5 फॅटस मिळतात. त्यानुसार 25 ते 28 रुपये प्रतिलिटर असा सरासरी दर मिळतो. दर दहा दिवसांनी दूधविक्रीची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा होते.
  • सरासरी दीडशे लिटर दूध, 25 ते 28 रुपये दर याप्रमाणे प्रतिमाह सुमारे एक लाख 12 हजार रुपये उत्पन्न हाती येते. त्यातून पशुखाद्य, चारा, वाहतूक व अन्य किरकोळ खर्च प्रतिमाह पन्नास ते साठ हजार रुपयांपर्यंत येतो. यात घरचे मनुष्यबळ व चारा यांचा खर्च धरलेला नाही.
  • गेल्या वर्षी 9 जनावरांपासून मिळालेल्या शेणखताच्या विक्रीतून एक लाख रुपये मिळाले होते. या वर्षी जनावरांची संख्या अधिक आहे.
  • संयुक्त कुटुंबात विभागले जाते काम ः

  • अक्रोद तिडके यांना सचिन व प्रकाश अशी दोन मुले आहेत. त्यांचीही लग्ने झाली असून, तीनही कुटुंबे शेतीसह दुग्धव्यवसायाचा भार पेलतात.
  • गोठा स्वच्छता, दुधाची भांडी - कॅन वगैरेची स्वच्छता ही कामे महिला करतात.
  • जनावरांच्या चाऱ्याची व दूध काढण्याची व्यवस्था मुले पाहतात. सुरवातीला तिडके यांनी दुधाची विक्री परिसरातील हॉटेल व घरोघरी रतिबाद्वारे केली. मात्र, अलीकडे सर्व दूध डेअरीला घालतात.
  • संपर्क ः अक्रोद तिडके, 8007972947.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com