द्राक्ष सल्ला

द्राक्ष सल्ला
द्राक्ष सल्ला

येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये निरभ्र वातावरण राहण्याची शक्यता आहे. दुपारचे तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल. पुणे, नाशिक विभागामध्ये ते ३१-३१ अंशापर्यंत राहील. सांगली सोलापूर विभागामध्ये ३३ -३४ पर्यंत वाढेल. सकाळचे तापमान नाशिक- पुणे विभागामध्ये १८-१९ पर्यंत राहील. सांगली सोलापूर भागामध्ये १९-२० पर्यंत राहील.  सर्व विभागामध्ये सापेक्ष आर्द्रता वेगाने कमी होत आहे. त्यामुळे सकाळ दव पडण्याची शक्यता सर्वसाधारपणे फार कमी आहे.

खेळती हवा न राहणाऱ्या भागातील बागांत कॅनोपीच्या आतील भागामध्ये आर्द्रता राहण्याची शक्यता आहे. अशा बागेमध्ये कोणतेही रोग असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु, सध्याच्या वातावरणामध्ये डाऊनीची नवा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाही. सांगलीच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण राहिल्यास किंवा जास्त कॅनोपी असलेल्या भागामध्ये आर्द्रता वाढल्यास सध्याच्या वातावरणामध्ये भुरीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. येत्या आठवड्यामध्ये खालील उपाययोजना कराव्यात.

  • ज्या बागांमध्ये डाऊनीचा प्रादुर्भाव आहे, तिथे डाऊनीचे नियंत्रण करण्यासाठी फोसेटील एएल ३ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर किंवा डायमिथोमॉर्फ १ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर यांची फवारणी करावी.
  • नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार चीन आणि रशिया येथे निर्यात करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा रेसिड्यू अॅनालिसीस करून घेणे आवश्यक होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास फोसेटिल एएल चा वापर फुलोरानंतर करणे धोक्याचे होऊ शकते. कारण फोसेटिल एएलची एमआरएल ही युरोपच्या द्राक्षासाठी १०० पीपीएम आहे, ती चीनसाठी १० पीपीएम आहे, तर रशियासाठी ०.८ पीपीएम आहे. चीन व रशियामध्ये द्राक्ष निर्यात करणाऱ्या बागायतदारांनी फोसेटिल एएलचा वापर करण्याऐवजी फुलोऱ्यापासून फळधारणेपर्यंत डायमिथोमॉर्फचा वापर करण्यास हरकत नाही.  
  • बऱ्याच ठिकाणी अजूनही घडावरील कूज किंवा गळ दिसत आहे. ही गळ डाऊनी मिल्ड्यूमुळे नसल्याची खात्री करून घ्यावी. सर्वसाधारणपणे घड घट्ट असताना व त्यानंतर फुलोऱ्यात येताना पानावरील पाणी लवकर सुकते, मात्र घडामध्ये पाणी जास्त वेळ राहते. फुलावरील टोपी सरकत असताना टोपीच्या आतील भागात पाणी शिरते. ते लवकर सुकत नाही. यामुळे बागेमध्ये डाऊनी कार्यरत असल्यास ती घडांना त्रास देऊ शकते. घडावर डाऊनीचे कोणतेही लक्षण न दाखवता घडावर कूज किंवा गळ करू शकते. बागेमध्ये किंवा जवळपासच्या बागेमध्ये डाऊनीचा प्रादुर्भाव असल्यास अशा प्रकारची डाऊनीमुळे होणारी कुकूज किंवा गळ सध्याच्या वातावरणामध्ये शक्य आहे. अशी कूज होऊ नये, या साठी बागेमध्ये डाऊनीच्या नियंत्रणासाठी फवारणी घेणे आवश्यक आहे. कॅनोपी विरळ ठेवणे, बागेमध्ये जास्तीत जास्त सूर्यप्रकाश पोचू देणे खेळती हवा राहील व पाण्याचा ताण कमीत कमी असणे याकडे लक्ष द्यावे. त्यामुळे कूज कमी होण्यास मदत होते. नायट्रेटयुक्त नत्र जास्त झाल्यानेही कुजीचे प्रमाण वाढू शकते. यासाठी झाडांचा आंतरीक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (०-५२-३४ ) २ ते ३ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणामध्ये फवारणी करणे फायद्याचे ठरू शकते. फुलोऱ्यामध्ये सेंटिंग चांगले होण्यासाठी झिंक व बोरॉन उपयोगी असते. या दोन अन्नद्रव्यांचा योग्य वापर केल्यास गळ कमी होते.
  • फुलोरा व त्यापुढील अवस्थेतील बागांमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी फुलोऱ्यापासून फळधारणेपर्यंतच्या काळात फवारणी करण्याची आवश्यकता आहे. या अवस्थेमध्ये सर्वसाधारणपणे कॅनोपी विरळ असल्यामुळे आतील कॅनोपीपर्यंत चांगले कव्हरेज मिळते. म्हणूनच या काळात भुरीचे नियंत्रण चांगले केल्यास पुढे भुरीचे व्यवस्थापन सोपे जाते असे बोलले जाते. त्यासाठी या काळात अनेक्शर ५ मध्ये दिलेल्या सर्व बुरशीनाशकांचा वापर शक्य आहे. परंतु, येत्या हंगामामध्ये चीन, रशिया व इंडोनेशियामध्ये निर्यात करण्याचा मानस असल्यास डायफेनोकोनॅझोलचा वापर कटाक्षाने टाळावा. त्याची एमआरएल युरोपसाठी ३ पीपीएम, रशिया व चीनसाठी अर्धा पीपीएम, तर इंडोनेशियासाठी ०.१ पीपीएम आहे, याची नोंद घ्यावी. या वर्षी या तिन्ही देशांसाठी रेसिड्यू अॅनालिसीस अत्यावश्यक होण्याची शक्यता आहे.
  • निर्यातीसंदर्भात काळजी आवश्यक भारतामधील द्राक्षांची निर्यात वेगवेगळ्या देशांमध्ये होत आहे. हळूहळू सर्व द्राक्ष आयात करणाऱ्या देशांनी रेसिड्यू अहवालाची मागणी सुरू केली आहे. सर्वसाधारणपणे युरोपियन द्राक्षांसाठी बनवलेली यादी व त्यामध्ये दिलेले पीएचआय सर्व देशांसाठी उपयोगी पडतील. काही ठराविक देशांसाठी विशेष पथ्ये पाळणे आवश्यक होणार आहे. म्हणून प्रथमतः निर्यातीसाठी द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी अनेक्शर ५ मध्ये नमूद केलेल्या कीडनाशकांव्यतिरीक्त कुठल्याही रसायनांचा वापर कटाक्षाने टाळावा. भारतातील दोन ते चार हजार कंटेनर रशियामध्ये निर्यात होतात. रशियाने जाहीर केलेल्या रसायनांच्या यादीप्रमाणे मॅन्कोझेबची एमआरएल ०.१ पीपीएम आहे. (युरोपीय एमआरएल ५ पीपीएम आहे.) मॅन्कोझेबचा वापर फळधारणेनंतर झाल्यास रशियातील निर्यात अडचणीत येऊ शकेल. रशियात निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी व मॅन्कोझेबचा वापर येथून पुढे टाळावा.

      संपर्क : ०२०-२६९५६००१ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com