द्राक्ष सल्ला
द्राक्ष सल्ला

जुनी डाऊनी नियंत्रणासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता

द्राक्षबागेमध्ये जुनी डाऊनी शिल्लक असल्यास तिच्या नियंत्रणासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

गुरुवार-शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये वातावरण ढगाळ राहील किंवा एखाद दुसऱ्या ठिकाणी रिमझिम पाऊस होईल. हा अपवाद वगळता उर्वरित सर्व ठिकाणी येत्या आठ दिवसांमध्ये वातावरण निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सर्वत्र सकाळचे तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होईल, मात्र दुपारचे तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहील. काही दिवसांत वातावरणातील आर्द्रता कमी होत जाताना सकाळचे दव किंवा धुकेही हळूहळू कमी होईल. उपाययोजना ः

  • मागील काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे झालेला डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव आता फुलून बीजाणू दिसत आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सध्याच्या वातावरणामध्ये डाऊनीची नवीन लागण होण्याची शक्यता फार कमी आहे. डाऊनीचा जुना प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी मात्र चांगल्या नियंत्रणांसाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करणे आवश्यक आहे. म्हणून बाह्यस्पर्शी बुरशीनाशकाचा वापर काही काळासाठी थांबवून आंतरप्रवाही बुरशीनाशके काही वेळा स्वतंत्रपणे व त्यानंतर बाह्यस्पर्शी बुरशीनाशकांसोबत घेतल्यास बागेतील रोगाचे नियंत्रण शक्य होईल.
  • छाटलेल्या बागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी घडावर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल, त्या ठिकाणी प्रादुर्भावित घड व आजूबाजूची प्रादुर्भावित पाने काढून घ्यावीत. त्यानंतर फवारणी करावी. शक्यतो सीएए गटातील डायमिथोमॉर्फ १ ग्रॅम प्रतिलिटर, किंवा इप्रोव्हॅलिकार्ब  अधिक प्रोपीनेब (संयुक्त बुरशीनाशक) ३ ते ३.२५ ग्रॅम प्रतिलिटर ही बुरशीनाशके फवारणीसाठी वापरावीत.
  • मागील काही दिवसांमध्ये बुरशीनाशकांच्या अधिक वापरामुळे डाऊनी मिल्ड्यूमध्ये प्रतिकारशक्ती जास्त प्रमाणात वाढली असण्याची शक्यता आहे. वातावरणामध्ये आर्द्रता जास्त राहिल्यामुळे बुरशीनाशके आंतरप्रवाही होण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे बुरशीनाशकाचे परिणाम त्वरित दिसत नाहीत. म्हणूनच आलटून पालटून किंवा बदलून बुरशीनाशकांचा वापर न करता एकच बुरशीनाशक दोन किंवा तीन वेळा दोन दोन दिवसांच्या अंतराने पुन्हा पुन्हा वापरल्यास चांगल्या प्रकारे रोगनियंत्रण मिळू शकेल. सीएए गटातील बुरशीनाशकांच्या प्रतिकारामध्ये डाऊनीमध्ये ४० ते ५० पीपीएमपर्यंत प्रतिकारशक्ती बऱ्याच ठिकाणी आहे. त्यामुळे एकाच बुरशीनाशकाचा वापर पुन्हा पुन्हा झाल्यास पानामध्ये किंवा घडामध्ये बुरशीनाशकांची मात्रा जास्त प्रमाणात वाढून प्रतिकारशक्ती असलेली बुरशीसुद्धा नियंत्रित करणे शक्य होऊ शकते. म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये पुन्हा पुन्हा एकच बुरशीनाशक वापरणे जास्त फायदेशीर होईल असे वाटते.
  • फुलोऱ्यात आलेल्या बागांमध्ये फोसेटिल एएल किंवा पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस अॅसिड प्रत्येकी ३ ते ४ ग्रॅम प्रतिलिटर स्वतंत्रपणे किंवा मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात मिसळून वापरल्यास घड रोगापासून सुरक्षित राहील. फुलोऱ्यापासून सेटिंगपर्यंत काळामध्ये अशा प्रकारच्या दोन फवारण्या तीन ते चार दिवसांच्या अंतराने कराव्यात.
  • सर्व भागांमध्ये फुलोऱ्यामध्ये आलेल्या घडामध्ये कूज किंवा गळ वाढत आहे. ही गळ प्रामुख्याने मुळामध्ये असलेल्या जास्त पाणी व नत्राचे शोषण जास्त झालेले असल्यामुळे जास्त वेगाने होणाऱ्या वाढीमुळे होत आहे.
  • संपर्क ः डॉ. एस. डी. सावंत, 020 26956001 (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com