एकमेका करू साह्य, अवघे धरू सुपंथ

रिसोड भागातील डाळिंब उत्पादक एकत्र येऊन तंत्रविषयक चर्चा करतात व तसे पुढील नियोजन करतात.
रिसोड भागातील डाळिंब उत्पादक एकत्र येऊन तंत्रविषयक चर्चा करतात व तसे पुढील नियोजन करतात.

आजच्या काळातील शेतीतील समस्या पाहिल्या तर एकट्याने शेती करणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. त्यातही ‘मार्केटिंग’ हा तर अत्यंत कळीचा मुद्दाच झाला आहे. वाशीम जिल्ह्यात रिसोड तालुक्यातील काही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सामूहिकतेचे प्रदर्शन घडवत शेतीत विधायक चित्र निर्माण केले आहे. एकीतून असंख्य बदल घडवून अाणले. नाशिकसारख्या बाजारात वाशीमच्या डाळिंबाचे नाव तयार केले. वाशीम जिल्हा सोयाबीनचे माहेरघर म्हटला जातो. रब्बीत हरभरा हे इथले मुख्य पीक. रिसोड तालुक्यातील मोप भागातील शेतकऱ्यांचीदेखील हीच पीकपद्धती होती. दरवर्षी पावसावर अाधारित पिके घेणे हाच पायंडा पडून गेला होता. काही प्रयोगशील शेतकरी नव्या तंत्राची चाहूल घेत हळद, भाजीपाल्याची पिके घेऊ लागले. त्यात डाळिंबासारख्या पिकाची नव्याने भर पडली आहे. तालुक्यातील मोप परिसरात दत्तराव नरवाडे यांनी चार वर्षांपूर्वी डाळिंबाची लागवड करून भागात नव्या पिकाचा श्रीगणेशा केला. मोप, मोरगव्हाण, शेलूखडसे या गावांंतील शेतकऱ्यांसाठी हे पीक म्हणजे नावीन्यच होते. नरवाडे यांना डाळिंबातून किती प्रमाणात व कसे यश मिळते हे अभ्यासून मग भागातील शेतकरीही या पिकाकडे हळूहळू वळण्यास प्रेरित झाले. पारंपरिक पिकांची चाकोरी सोडून तेही डाळिंबाकडे वळाले. मिळून सारेजण डाळिंब हे तंत्रशुद्ध पद्धतीने करावयचे फळपीक मानले जाते. पिकाला ताण देण्यापासून छाटणी, फवारण्या, पाणी, खत नियोजन अशा विविध टप्प्यांवर शास्त्रीय माहिती असावी लागते. त्या पद्धतीने काम करणारे मजूरही लागतात. नरवाडे यांनी एक हेक्टरमध्ये जेव्हा सर्वप्रथम डाळिंबाची बाग उभी केली, त्या वेळी चिखली तालुक्यातील अनुभवी शेतकऱ्याचेच मार्गदर्शन घेतले. आज दिगंबर नरवाडे, भागवत नरवाडे, गुलाब नरवाडे, अशोक नरवाडे, श्रीकांत सिकची (सर्व मोप गावचे), बद्री विष्णू कोकाटे (मोरगव्हाण), संतोष कडूजी खसडे (शेलू खडसे) आदींनी साधारण एक हेक्टरमध्ये लागवड सुरू केली. प्रामुख्याने अांबीया बहराचे ते नियोजन करतात. मजुरांचे एकत्रित व्यवस्थापन बागेत काम करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथून मजूर आणले जातात. टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बागेतील छाटणी व तांत्रिक कामे ते करतात. पूर्वी जेव्हा हे शेतकरी स्वतंत्रपणे व्यवस्थापन सांभाळत, त्या वेळी प्रत्येकाला मजुरांच्या जाण्या-येण्याचा, राहण्याचा खर्च स्वतंत्र करावा लागे. अाता मजुरांचे एकत्रितरीत्या नियोजन केल्याने खर्चात बचत किंवा विभागणी झाली. एकदा सारे मजूर या भागात कामांसाठी अाले, की ते सर्वांच्या बागांमधील व्यवस्थापन पूर्ण करूनच परत आपल्या गावी जातात. यासाठी शेतकऱ्यांनाही बहर व्यवस्थापन सुसंगतपणे करावे लागते. या कुशल मजुरांनाही काम वेळेवर व अधिक प्रमाणात मिळते. सर्व निविष्ठाही शेतकरी सामूहिकरीत्या खरेदी करीत असल्याने त्यातील खर्चांत मोठी बचत होते. मार्केटिंग झाले सुलभ सुरवातीला एकेकट्याने डाळिंबाची विक्री करणे म्हणजे अडथळ्याची शर्यतच होती. व्यापारी गावात येऊन कमी दराने बागेची मागणी करायचे. अाता शेतकऱ्यांची संघटित ताकद असल्याने अापल्या मालाचे मार्केटिंग अापणच करू, असा विचार पुढे अाला. आज काढणीदेखील एकत्र होते. माल अधिक असेल तर वेगवेगळ्या वाहनांतून बाजारात माल नेला जातो. कधी नांदेडच्या तर बहुतांश मालासाठी नाशिक ही बाजारपेठ आश्वासक ठरली आहे. एकत्र येण्याने या बाबी झाल्या साध्य

  •  सर्वांना एकमेकांची सोबत मिळाली.
  •  बाहेरच्या मार्केटमध्ये जाण्याचे धाडस अाले.
  •  व्यापारी दरांबाबत अडवणूक करीत असतील, फसवणूक होण्याची शंका असेल तर एकमेकांशी चर्चा, सल्लामसलत करून विक्रीचे पुढचे पाऊल उचलले. त्यातून मार्केटिंगबाबत आत्मविश्वास मिळाला.
  •  चांगल्या दर्जाचा माल बाजारात नेला की दरही तसाच योग्य मिळतो हा अनुभव आला.
  • बाजारपेठेत झाले नाव अाज वाशीमच्या डाळिंबाची नाशिकच्या बाजारपेठेत अोळख झाली आहे. मालाचा दर्जा पाहून ‘वाशीमचे डाळिंब’ असा प्रचार आता व्यापारीच करू लागले अाहेत. या ब्रँड नेममुळे इतरांच्या तुलनेत अामच्या डाळिंबाला हमखास दोन पैसे अधिक मिळतात, असे दत्तराव नरवाडे म्हणाले. उत्पादन ते काढणीपर्यंत सर्व तंत्र शेतकऱ्यांनी अात्मसात केले अाहे. येत्या काळात पॅकिंग करून डाळिंब मार्केटमध्ये आणण्याचा या शेतकऱ्यांचा मानस आहे. उच्च प्रतीच्या डाळिंबावर भर डाळिंबाच्या वाहतुकीसाठी दत्तराव यांनी दोन गाड्या घेतल्या. पुढील काळात उच्च प्रतिचा मालच उत्पादित करायचा. अापल्यापैकी कुणी एकाने बाजारात नेऊन तो विकायचा असे ठरवले अाहे, असे श्रीकांत सिकची म्हणाले. जेव्हा चांगला माल विक्रीला नेला, त्या वेळी त्याचे अाणि दुय्यम दर्जाच्या मालाचे दर यात मोठी तफावत होती. त्यामुळे घाई न करता टप्प्याटप्प्याने परिपक्व फळेच काढू, असेही नियोजन आता झाले आहे. कृषी विज्ञान केंद्राची मदत - करडा कृषी विज्ञान केंद्राची या शेतकऱ्यांनी वेळोवेळी मदत घेतली. केंद्राच्या पुढाकाराने राबविलेल्या कृषी समृद्धी प्रकल्पातून क्रेट खरेदीसाठी अनुदान मिळाले. अाज शेतकऱ्यांकडे सुमारे २०० क्रेट अाहेत. मोप भागातील डाळिंब कल्चर - दृष्टिक्षेपात

  • डाळिंब उत्पादक - सुमारे ९
  • एकरी उत्पादकता - चार ते सात टनांपर्यंत
  • पाणी स्रोत - विहीर, बोअरवेल
  • मिळणारे दर - प्रतिकिलो ६० ते ६५ रुपये; तर ३० ते ३५ रुपये अलीकडील काळात
  •  वाण - भगवा - उतिसंवर्धित व गुटी कलम
  • दत्तराव नरवाडे - ९४२३८५१६०४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com