संरक्षित सिंचनाचे शास्त्रीय सत्य

एक सप्टेंबर 2017 च्या ऍग्रोवनमधील "संरक्षित शेती, सुरक्षित शेतकरी' हा अग्रलेख वाचण्यात आला. त्यात जिरायती शेतीच्या समस्या मांडल्या असून, या शेतीस संरक्षित सिंचनाचे महत्त्व सांगितले आहे. जिरायती शेतीस संरक्षित सिंचनाची सोय होण्यासाठीचे शास्त्रीय सत्य या लेखाद्वारे मांडत आहे.
संपादकीय
संपादकीय

संरक्षित सिंचनाची जोड देण्यासाठी जिरायती क्षेत्राचे भूशास्त्र, भूजल अस्तित्व स्थिती, मृदा (माती) प्रकार या सर्वांचे सखोल सर्वेक्षण, अभ्यास, नियोजन व कृती केल्यास जिरायती शेती ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट साध्य करणे कसे शक्‍य आहे, याची खात्री होईल. महाराष्ट्र राज्याच्या एकूण विस्तार क्षेत्राच्या 82 टक्के विस्तार क्षेत्र लाव्हा पाषाणांचे (जमिनीवर व जमिनीखाली) थर रचनेने व्यापलेले आहे. जिरायती तसेच बागायती क्षेत्रांतर्गतच्या जमिनीत जिरलेल्या/ मुरलेल्या पर्जन्य पाण्यावरच भूजलाचे अस्तित्व अवलंबून आहे. त्यातही, शेतजमिनीचे उथळ स्तरावर व खोलवरच्या पाषाण थरांत भूजल साठवण करणाऱ्या पाषाण थरांची उपलब्धता असणे महत्त्वाचे असते.

शेतजमिनीखाली जेवढे भूजल साठवण क्षेत्र विस्तारित व मोठ्या त्रिमितीत (थ्री डायमेन्शनल) असेल त्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता होते. प्रदीर्घ विघटन, धुपणी व पर्यावरणीय प्रक्रियेमुळे झालेल्या शेतमातीचे खालच्या सलग्न पाषाण थर राशींचे नैसर्गिकपणे दोन भागांत विभाजन झाल्याचे आढळते. या नैसर्गिक विभाजनानुसार नदी-नाले, ओढे-ओहळांच्या सान्निध्यातील शेतीत ओलित करण्यासाठी काही काळ (ऑक्‍टोबर-फेब्रुवारीअखेर) भूजल उपलब्धी टिकून असते. या काळात विहिरी/ बोअरवेल्सद्वारा उपसा मिळविणे शक्‍य असते.

मात्र, शेत उताराच्या विरुद्ध चढावाच्या दिशेने असलेल्या (अथवा तत्सम प्राकृतिक/ भौगोलिक स्थितीत असलेल्या) क्षेत्रातील जिरायती शेतीत भूजल उपलब्धी असते. परंतु ही फक्त खरीप हंगामास पुरेल एवढ्याच प्रमाणात उपलब्ध असते. जिरायती क्षेत्रात सिंचनासाठी शेततळी करण्यासाठी काही मर्यादा आहेत. उदा ः जिरायती शेतीची एकूण भूप्राकृतिक रचना - उंचवट्यांची असल्याने, त्यात पर्जन्य पाण्याने शेततळी भरण्यास व टिकविण्यास अडचणी आहेत. मुख्य अडचण म्हणजे शेततळ्याच्या प्रस्तावित लोकेशन स्थळापासून प्रदीर्घ उतार क्षेत्राची कमतरता. तसेच, जिरायती क्षेत्रातील माती प्रकार व खंडित उंचवट्यांच्या उतारामुळे शेतात सूक्ष्म सिंचन व्यवस्था निर्माण करणे हे एक आव्हानच आहे.

जिरायती शेतीस खरिपात (जून ते सप्टेंबर) जसा पडणाऱ्या पावसाचा आधार, तसाच रब्बीच्या काळात (ओलितासाठी) भूजलांचा आधार निर्माण करणेही शक्‍य आहे. मात्र, या शक्‍यतेची खात्री तेथील भूशास्त्राधारित सखोल सर्वेक्षण/अभ्यासानुसार उथळ व खोलवरच्या भूजल साठवणींचा शोध घेण्यावर अवलंबून आहे. या साठवणींची उपलब्धता पडताळून पाहिल्यानंतरच त्यात भूजल भरण निर्माण करण्याची कृती व्यवस्थापन करता येते.

जिरायती शेतीमधील मातींचे प्रकार लक्षात घेता, उपजावू माती थरांबरोबर मुरूमवजा मातीचे थरही आढळून येतात. पर्जन्यकाळात जिरायती क्षेत्रापासून उताराच्या दिशेने, बागायतीच्या क्षेत्राकडे भूजल वहन प्रवाहित झालेले असते.

जिरायती परिसरातील भूस्तर व पाषाण पोकळीतील भूजलाच्या संपृक्ततेनुसार (सॅच्युरेशन टक्के) बागायती शेतशिवारांतील विहीर/ बोअरवेल पाण्याचे उपसाप्रमाण अवलंबून असते. परिणामी, जिरायती शिवारातील विहिरी खरीप हंगाम संपता-संपताच कोरड्या पडतात. शिवाय ऑक्‍टोबर महिन्यातील उष्णतेमुळे जिरायती रानातील ओल संपुष्टात येते. तसेच खरिपातील पर्जन्य पाणी, वेळेच्या अभावी जिरायती क्षेत्रातील मातीथरांच्या खाली, खोलवर जिरू शकत नाही.

शेतजमिनींच्या माती थरांखालील लाव्हा पाषाण थरांत जरी विघटित, घळी असलेले व फ्रॅक्‍चर समूहमुळे योग्य ती "साठवण पोकळी' टक्केवारी असली तरी उथळ स्तरांतील भूजल साठवण जास्त दिवस टिकत नाही. त्यासाठी जिरायती शेत-शिवारात भूजल प्रदीर्घ काळापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या योजना अमलात आणणे गरजेचे आहे.

लाव्हापाषाणांचे भूशास्त्रीय इतिहासाच्या आधारे जिरायती तसेच ओलिताखालील बागायती क्षेत्रात सर्वदूर समपातळीतील (हॉरिझॉन्टल) लाव्हा पाषाणांचे एकावर एक (असे नैसर्गिकपणे) रचलेले थर, जिरायती परिसराचे भूपृष्ठापासून विशिष्ट खोलीवरचे लाव्हा पाषाण "भूजलधारक' असतात. या प्रकारच्या खोलवरच्या संरक्षित भूजलसाठवणींचा शोध घेऊन त्यात भूजलाचे साठे (जिरायतीच्या सिंचनासाठी) संरक्षित ठेवणे शक्‍य झालेले आहे.

बागायती - ओलिताखालील क्षेत्रातील विहीर/ बोअरवेलमध्ये जसे नैसर्गिक व कृत्रिमपणे पुनर्भरण करणे शक्‍य असते; तसेच जिरायतीत खोलवरच्या पाषाणांच्या साठवण (स्टोअरेज) पोकळीतील भूजलाचे पुनर्भरण करणे व ते टिकविणे जरी कठीण व आव्हानात्मक असले तरी अधुनिक तंत्रशास्त्रानुसार शक्‍य आहे.

जिरायती परिसर सिंचनाखाली आणण्यासाठी जिरायत क्षेत्र ते उताराकडील नदी-नाले, ओढे दरम्यानच्या बागायती क्षेत्रातील भूजल साठवणींचेही संरक्षण/ संवर्धन करणे गरजेचे आहे. या कामासाठी काही अपारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अनिवार्य आहे. तसेच, जिरायतीतील पाणीसाठे भरून ठेवण्यासाठी खरिपात-पावसाळ्यात स्वयंभूपणे भूजल साठवणींत भरणा करणाऱ्या बोअरवेल तंत्राचा वापर करणे अनिवार्य ठरते. महाराष्ट्र राज्याचे 82 टक्के जिरायती क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली-ओलिताखाली आणण्यासाठी संबंधित क्षेत्राचा टोपोग्राफिक इतिहास, तसेच पाषाणांचा भूशास्त्रीय इतिहासांचा अभ्यास, भूजलशास्त्राचा वापर हे या योजनेतील महत्त्वाचे टप्पे आहेत.

जलयुक्त शिवार योजनेतील काही अशास्त्रीय पद्धतींमुळेही नैसर्गिकपणे होणाऱ्या भूजलाचा भरणा (रिचार्ज) - साठवण (स्टोअरेज) व निचरा (डिसचार्ज) या प्रकारच्या चक्रांकित जलसाखळी उद्‌ध्वस्त होतात व कालांतराने त्या क्षेत्राचे वाळवंटीकरण होते, हे लक्षात घेतले पाहिजे. बी. जी. ढोकरीकर, 020-24352909 (लेखक महाराष्ट्र भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे माजी संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com