कारल्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ
कारल्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ

कारल्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ

कारले हे कडू असले तरी आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे. कारल्याच्या रसापासून विविध पदार्थांना मागणी वाढत आहे. कारल्याचे वाळवलेले काप, भुकटी हे अधिक काळ टिकू शकतात. आरोग्यासाठी जागरूक लोकांमध्ये कारल्याच्या चहा लोकप्रिय बनत आहे.

कडूपणासाठी प्रसिद्ध असलेले कारले (शा. नाव ः Momordica charantia) आरोग्यवर्धक गुणधर्मासाठीही तितकेच प्रसिद्ध आहे. आशिया उपखंडामध्ये आहारामध्ये भाजी स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात वापरही होतो.

आरोग्यासाठी फायदे ः कारल्यातून फॉस्फरस आणि लोहासोबतच भरपूर प्रमाणात क जीवनसत्त्व, आणि काही प्रमाणात अ जीवनसत्त्व मिळते.

  1. रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी ः कारल्यामध्ये इन्सुलिनसारखे संयुग पॉलिपेप्टाईड-पी असून, नैसर्गिकरीत्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. नियमितपणे २००० मिलिग्रॅम या प्रमाणात कारले आहारात असल्यास टाइप २ प्रकारच्या मधुमेहींच्या रक्तातील शर्करेचे मात्रा कमी होण्यास मदत होते. कारल्यातील वनस्पतिजन्य इन्सुलिनचा टाइप १ मधुमेहामध्येही फायदा होतो.
  2. बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी ः कारल्यातील लोह आणि फोलिक आम्लामुळे हृदयरोग, पक्षाघात यांचा धोका कमी होतो. पोटॅशिअमचे प्रमाण भरपूर असल्याने, ते शरीरातील अतिरिक्त सोडियमचे शोषण करते. त्याचा फायदा रक्तदाब स्थिर ठेवण्यात होतो.
  3. त्वचा व केसांच्या चमकदारपणांसाठी ः त्वचेवरील वार्धक्यांच्या खुणा कमी करण्यामध्ये कारल्यातील अॅँटिऑक्सिडन्ट घटक व जीवनसत्त्व अ आणि क महत्त्वाचे ठरतात. त्वचेवरील पुरळ, एक्झिमा आणि सोरायसीसचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेवर होणारे विपरीत परिणाम कमी होतात. कारल्याचा रस डोक्यामध्ये लावल्यास केस गळण्याचे, पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते. दुहेरी केस, केसांचा रखरखीतपणा, कोंडा कमी होतो.
  4. यकृताच्या स्वच्छतेसाठी ः कारल्यातील मोमोर्डिका चॅराटिया या संयुगामुळे युकृतातील आरोग्यकारक विकरांमध्ये (एंझायम्स) वाढ होते.
  5.  वजन कमी करण्यासाठी ः कॅलरी, मेद आणि कर्बोदकांचे प्रमाण कमी असल्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारामध्ये त्यांचा समावेश केला जातो. यामुळे पोट भरल्याची भावना अधिक काळ राहते. कारल्याच्या रसामध्ये स्थौल्यत्व कमी करण्याचे गुणधर्म आहेत.
  6. प्रतिकारकता वाढवण्यासाठी ः विषाणू, जिवाणूंशी लढण्याची क्षमता असल्याने विविध अॅलर्जी रोखण्यासाठी उपयुक्त. ल्युकेमियासह विविध प्रकारच्या कर्करोगांविरुद्ध उपचारामध्ये फायदेशीर ठरू शकतात.
  7. डोळ्यांसाठी ः यातील बीटी कॅरोटिन आणि जीवनसत्त्व ‘अ’मुळे दृष्टीसंबंधी समस्यावर फायदेशीर. त्यासाठी प्रतिदिन ३० मिलि कारले रस घेण्याची शिफारस आहे.
  8. बद्धकोष्ठता रोखण्यासाठी ः कारले हा नैसर्गिक उपाय असून, त्यातील अन्य वाईट परिणाम दिसत नाहीत.

काढणी ः अपक्व अवस्थेमध्ये योग्य आकार व रंग आल्यानंतर कारल्याची काढणी केली जाते. त्याची साल घट्ट व चमकदार असावी. कारले देठासह काढावे. मोठ्या गोल आकाराच्या जातींची काढणी व हाताळणी काळजीपूर्वक करावी. अधिक पक्वता झाल्यास कारले मऊ आणि बिया मोठ्या होतात.

कारल्याचे विविध पदार्थ

  • योग्य रंग आल्यानंतर ही फळे वाळवून बिगर हंगामामध्ये वापरली जातात. त्याच प्रमाणे कारल्याचे स्ट्यू किंवा लोणचेही करतात.
  • कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी ती मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवतात. शिजवण्यापूर्वी साल खरवडून घेतली जाते. कारल्यातील पाणी काढून टाकल्यानंतर चौकोनी तुकडे किंवा गोलाकार रिंग स्वरूपामध्ये साठवले जातात. त्याचा वापर भाज्यांमध्ये, तर तपकिरी रंगाच्या कारल्याचा उपयोग चहा तयार करण्यासाठी होतो. वाळवलेल्या रिंग, तुकड्यांना देशी आणि निर्यातीच्या बाजारात चांगली मागणी आहे.
  • वाळवल्यानंतर कारली अधिक काळ टिकू शकतात. त्याचा फायदा साठवण, वाहतूक आणि पॅकेजिंगमध्ये होतो.
  • कारले वाळवणे 
  • सूर्यप्रकाशामध्ये कारल्याचे तुकडे वाळवून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करता येते. त्यासाठी स्वच्छ करून कारल्याचे काप करून ते उन्हात वाळवावेत. त्यातील पोषक घटक त्यात राहत असल्याने चांगली किंमत (३०० रुपये प्रतिकिलोपर्यंत) मिळते.
  • कारल्याचा चहा ः कारल्याच्या चहाला गोयाह चहा या नावाने ओळखले जाते. आरोग्यवर्धक चहा म्हणून याला मागणी आहे. यकृत, पचन यांच्या समस्या, इन्फ्लुएंजा रोखण्यासाठी, घशाचा दाह यामध्ये उपयुक्त असून, रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करतो.

    चहा तयार करण्याची पद्धत-

  • वाहत्या पाण्यामध्ये कारली स्वच्छ धुऊन घ्यावीत. मऊ स्पंजच्या साह्याने वरील पृष्ठभाग घासून साफ करावा.
  • लांबीच्या बाजूने दोन भाग करून, त्यातील गर व बिया चमच्याने काढून टाकाव्यात.
  • त्यानंतर कारल्याचे पातळ काप करून घ्यावेत. हे काप जितके पातळ असतील, तितक्या लवकर वाळतात आणि बारीक करणे सोपे जाते.
  • ट्रेमध्ये हे काप एका थरामध्ये ठेवून, त्यावर जाळी लावावी. म्हणजे कीटक आणि धूळ रोखली जाते.
  • हे ट्रे सूर्यप्रकाशामध्ये वाळण्यासाठी ठेवावेत. काही तासांनंतर उलट्या बाजूनेही वाळवून घ्यावेत. यासाठी वातावरणानुसार एक किंवा दोन दिवस लागू शकतात.
  • कॉफी ग्रायंडर किंवा फूड प्रोसेसरच्या साह्याने वाळवलेल्या कापांची भुकटी करून घ्यावी.
  • ही भुकटी हवाबंद डब्यामध्ये भरून थंड आणि कोरड्या जागेमध्ये साठवून ठेवावी.
  • एक चमचा कारल्याची भुकटी एक कप गरम पाण्यामध्ये टाकावी. काही मिनिटे ढवळ्यानंतर त्यात आपल्याला आवश्यक गोडी येईपर्यंत एक किंवा दोन चमचे मध टाकावा.
  • पाण्यामध्ये अधिक विद्राव्य कारले पावडर बनवण्याची पद्धत
  • कारल्यातील प्रोटिन्स, पॉलिसॉॅकराईड आणि फिनॉलिक, फ्लॅवोनॉईड, सॅपोनिन यांसारखे घटक मिळवण्यासाठी कारले फ्रिज ड्रायिंग किंवा हीटपंप ड्रायिंग पद्धतीने वाळवून बारीक करावे. या पद्धतीमध्ये अत्यंत बारीक (५० m पेक्षा कमी आकाराची) भुकटी मिळवता येते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com