रब्बी पेरण्यांसाठी अनुकूल परिस्थिती

ज्वारी
ज्वारी

सद्यस्थितीत राज्यात पुरेसा पाऊस पडल्यामुळे रब्बी पेरण्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी पिकांच्या योग्य जातींची निवड करावी.

अधिक उत्पादनासाठी योग्यवेळी पेरणी करणे ही आवश्‍यक बाब आहे. प्राथमिक अवस्थेतील कीड -रोगांना अटकाव घालण्यासाठी बीजप्रक्रिया करुनच पेरणी करावी.

रब्बी ज्वारी

  • रब्बी ज्वारीच्या कोरडवाहू परिस्थितीत पेरणीसाठी मध्यम प्रकारच्या जमिनीत एम-३५-१(मालदांडी) या जातीची निवड करावी. कोरडवाहू व बागायती क्षेत्रासाठी मध्यम व भारी जमिनीत पेरणीसाठी परभणी मोती, परभणी ज्योती या जातींची निवड करावी.
  • पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. त्यासाठी प्रतिकिलो बियाण्यास थायरम ३ ग्रॅम, गंधक ४ ग्रॅम, स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पीएसबी) २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी. खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रति किलो बियाण्यास इमिडाक्‍लोप्रिड (७० टक्के) १० मि.लि याप्रमाणात प्रक्रिया करावी.
  • बीजप्रक्रिया करताना सुरवातीला बुरशीनाशक नंतर कीटकनाशक व शेवटी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
  • प्रतिहेक्‍टरी ८-१० किलो प्रमाणित बियाणे पेरणीसाठी वापरावे.
  • खरिपात मूग, उडीद व सोयाबीन ही पिके घेतल्यानंतर रब्बी हंगामात ज्वारीचे पीक पेरावयाचे असल्यास ज्वारी बियाण्याचे प्रमाण वाढवून (१० किलो प्रतिहेक्‍टर) पेरणी करावी.
  • पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणक्षमता तपासून पाहणे आवश्‍यक आहे.
  • पेरणी करताना प्रतिहेक्टरी ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद अशी खतमात्रा द्यावी.
  •  करडई

  •  कोरडवाहू तसेच मध्यम जमिनीत व ज्या ठिकाणी १ ते २ पाणी देण्याची सोय असेल अशा ठिकाणी भीमा, शारदा, परभणी-कुसूम व पीबीएनएस-८६ (पूर्णा) या सुधारित तसेच डीएसएफ-१२९ आणि एमकेएच-११ या संकरित जातींची निवड करावी.
  •  परभणी करडई-४० हा बिनकाटेरी वाण कोरडवाहू व बागायतीसाठी योग्य आहे. तसेच पाकळ्या गोळा करण्यासाठी सुलभ आहे.
  • पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास कार्बेन्डाझिम १.५ ग्रॅम अधिक थायरम १.५ ग्रॅम (संयुक्त बुरशीनाशक)याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूची २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
  • सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा ते ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी संपवावी.
  • पेरणीसाठी १२ किलो बियाणे प्रतिहेक्‍टर वापरावे; परंतु मूग, उडीद व सोयाबीन या पिकानंतर करडईचे दुबार पीक घ्यावयाचे असल्यास बियाणे प्रमाण वाढवून प्रतिहेक्‍टरी १५ किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.
  • खरीप मका, बाजरी किंवा ज्वारीनंतर पेरणी करावयाची असल्यास शून्य मशागत पद्धतीने पेरणी करावी. त्यासाठी खरीप हंगामातील पीक कापणीनंतर मशागत न करता खरिपामध्ये पेरलेल्या पिकाच्या दोन ओळींत करडईची एक ओळ पडेल अशाप्रकारे करडईची पेरणी करावी.
  • बागायती करडईची सोड ओळ पद्धतीने म्हणजेच तिफणीच्या चाढ्याचे मधले छिद्र बंद करून पेरणी करावी.
  • पेरणी तिफणीने करून दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. (४५ x २० सें.मी.) एवढे ठेवावे.
  •  कोरडवाहू पेरणीच्या वेळी प्रति हेक्‍टरी २० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद यांची संपूर्ण मात्रा जमिनीत पेरून द्यावी.
  •  बागायती पिकासाठी ६०ः४०ः३० अशी खतमात्रा द्यावी. पेरणीच्या वेळी ३० किलो नत्र व ४० किलो स्फुरद व ३० किलो पालाश द्यावे. नत्राची उर्वरित मात्रा एक महिन्याने द्यावी.
  •  तणनियंत्रण व अंतर मशागतीसाठी एक कोळपणी व एक खुरपणी करावी.
  •  बागायती पेरणी झाल्यावर त्वरित सारा यंत्राच्या साह्याने सारे काढून पाणी द्यावे. मात्र कोणत्याही परिस्थितीत शेतात पाणी साचू देऊ नये.
  •  सोड ओळ पद्धतीने पेरणी केल्यास सुटलेल्या ओळीमध्ये नांगराच्या साह्याने सऱ्या पाडाव्यात.
  •  ज्वारी व करडई ६ः३ ओळी तसेच हरभरा व करडई किंवा जवस व करडई ३ः१ ओळी या प्रमाणात आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
  • भुईमूग पेरणीसाठी टी.जी. २६ किंवा टी.ए.जी.-२४, टीजी-३७, टीजी-५१  या जातीचे प्रतिहेक्‍टरी १०० किलो बियाणे ३० × १० सें.मी. अंतरावर पेरावे.

    पेरणीची वेळ ः

  • कोरडवाहू ज्वारीची पेरणी सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा ते ऑक्‍टोबर महिन्याचा पहिला आठवडा या काळात संपवावी. उशिरात उशिरा १५ ऑक्‍टोबरपर्यंत पेरणी करावी.
  • बागायती ज्वारीची पेरणी ३१ ऑक्‍टोबरपर्यंत करावी. सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा ते ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी संपवावी. बागायती करडईची पेरणी ३० ऑक्‍टोबर ते जास्तीत जास्त १५ नोव्हेंबरपर्यंत संपवावी.
  • रब्बी भुईमुगाची पेरणी १५ ते २५ सप्टेंबरदरम्यान करावी.
  • टीप ः बीजप्रक्रिया करण्यापूर्वी कंपनीने केली आहे का हे पाहणे.

    संपर्क  : डॉ. यू. एन. आळसे,९४२१३९२१९३ (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com