शेतकऱ्यांनी स्वतः व्यापार करण्याच्या फंदात पडावे का?

गुळ उत्पादन
गुळ उत्पादन

मी गूळ तयार करून पेठेत पाठवीत असे. प्रचलित चालीरीतीप्रमाणे गूळ तयार करीत असता त्यात हैड्रॉस पावडर, फॉस्फरिक ॲसिड अशी रसायने वापरून पिवळा धमक व योग्य आकाराचा कणीदार गूळ तयार करणे हा ३०-४० वर्षांपासूनचा रिवाज होता. पिकांची उत्पादनपातळी घटल्यामुळे मागील पिकाचे अवशेष आणि तणांचे सेंद्रिय खत करण्यास सुरवात केली. या तंत्राने जमिनीची सुपीकता सुधारल्यानंतर असे लक्षात आले, की गुळाची गोडी जास्त चांगली मिळत आहे. त्यानंतर मी असा विचार केला की रसायने न वापरता शुद्ध गोड चवीचा गूळ बाजारात नेला तर तो चांगल्या दराने विकला जाईल. परंतु, बिगर रसायनाचा १०० ढेपा (१० किलो) गूळ चवीला उत्तम असूनही व्यापाऱ्यांनी ३००-४०० रुपये क्विंटल कमी दरात मागितला. मी लिलाव रद्द करण्यास लावला. बाजारात १०० व गुऱ्हाळात ३०० ढेपा होत्या. बाजारातून गूळ परत घरी आणला. इतक्‍या गुळाचे काय करायचे, हा प्रश्‍न होता. गुळाचे लहान लहान तुकडे करून खिशात ठेवले व भेटेल त्याला खाण्यास देण्याचा सपाटा लावला. उत्तम चवीमुळे बऱ्याच लोकांनी खरेदीची इच्छा दर्शविली. पुढील दोन-तीन महिन्यांत बाजारभावापेक्षा (रसायनाचा गूळ)२०० रुपये जास्त दरात विकून संपवला. व्यापाराचा अजिबात अनुभव नसताना हा व्यवहार केल्याने आत्मविश्‍वास आला. रसायनाचे पैसे, दलाली, हमाली, तोलाई, मार्केट सेस असे सर्व खर्च वाचून वर जादा दर मिळतोय या अनुभवातून पुढे ४ टनावरून १० टनापर्यंत उत्पादन वाढविले. इतर चार-पाच जिल्ह्यांत माल पाठवणे सुरू केले. साधारण नोव्हेंबर ते मार्चपर्यंत हा व्यापार चाले. मागणी नोंदवणे, पार्सल तयार करणे, पाठविणे, पोच घेणे, पावत्या-बिले पाठविणे, वसुली असे कामाचे स्वरुप असे. शेतकरी आपल्या मालाचा दर ठरवू शकत नाही, तो व्यापारी ठरवतो, असे म्हटले जाते. पण माझ्या मालाचा दर मी ठरवित असे. केवळ मालाच्या दर्जावर असे करणे शक्‍य झाले. जादा भाव, जादा पैसे यात जास्त गुंतत गेलो. एक-दोन वर्षातच असे लक्षात आले, की आपण गूळ विक्रीतून जास्त कमाई जरूर करतो. परंतु, पुढील वर्षाच्या ऊस पिकाकडे यातून आपले दुर्लक्ष होत आहे. व्यापारात मिळणाऱ्या जास्त कमाईच्या तुलनेत शेतातील उत्पादन घटल्याने होणारे नुकसान जास्त आहे. व्यापारातील लक्ष कमी करून शेतात लक्ष दिल्यास आपण यापेक्षा जास्त कमाई करू शकू, हे लक्षात आल्याने फक्त घरात खपेल व घरातील बायका व्यापार करू शकतील इतकेच उत्पादन घेणे चालू केले. व्यापारातून अंग काढून घेऊन पूर्ण वेळ शेतीत लक्ष दिल्याने परत उत्पादन चांगले मिळून निव्वळ नफ्यात चांगली वाढ झाली. मध्यस्थ बाजूला करून शेतकऱ्यांनी थेट ग्राहकाशी व्यापार करणे गरजेचे आहे, अशा चर्चा आज सर्रास सुरू असते. परंतु, यातली मेख फक्त ‘जावे त्याच्या वंशा’ तरच लक्षात येते. व्यासपीठावरून बोलणे सोपे परंतु वास्तवात उतरविणे खूप अवघड. शेती करणे व व्यापार करणे हे दोन स्वतंत्र व्यवसाय आहेत. शेतकऱ्यांनी शेती करावी व व्यापाऱ्यांनी व्यापार करावा. व्यापारी आपला माल अनेक ठिकाणी पाठवत असल्याने आपल्या मालाचा व्यापार होतो आणि आपण निश्‍चिंतपणे उत्पादन करू शकतो. पैशाच्या परताव्याची चिंता नसते. आता उत्तम दर्जामुळे ग्राहकांच्या आग्रहाखातर शक्‍य तितकाच व्यापार व पूर्ण वेळ शेती चालू आहे. तरीही मी म्हणतो, शेतकऱ्याने व्यापार स्वतः करण्याच्या फंदात पडू नये.

नफ्यातील वाटा वाढवावा

  • अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे उत्पादकाला आलेला खर्च व व्यापाऱ्याने दिलेली किंमत यातून शेतकऱ्याचा नफा ठरतो. मध्यस्थ काढून टाकण्यापेक्षा ग्राहकाने दिलेल्या किमतीतील जास्तीत जास्त हिस्सा आपल्याकडे कसा वळवता येईल, याचा शेतकऱ्यांनी विचार करणे गरजेचे आहे. या विषयावर माझ्या अभ्यास आणि चिंतनातून पुढील धडे मी घेतले आहेत.
  • शेतकऱ्यांनी मालाचा दर्जा उच्चपातळीवर ठेवावा.
  • मालाची वर्गवारी व्यवस्थित करावी. एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर, बाद अशी वर्गवारी करून डाग तयार करावेत. (भाजीपाला, फळांबाबत)
  • अनुवंशिक चव, स्वाद, सुगंध उत्तम टिकविल्यास बाजारात स्वतःचा ब्रॅंड निर्माण होतो व केवळ उत्पादकाच्या नावावर जादा दर मिळतो.
  • उच्च दर्जाच्या मालामुळे व्यापाऱ्यास विक्रीतून जास्त पैसे मिळतात. लिवावात व्यापाऱ्यात स्पर्धा होऊन जास्त दराची बोली मिळू शकते.
  • तुमचा माल सातत्याने उच्च दर्जाचा असल्याचा असा विश्‍वास व्यापारीवर्गात निर्माण झाल्यास लिलावापूर्वीच आरक्षण होऊन माल उचलला जातो. लिलावात काय होईल, तो दर देण्याची व्यापाऱ्याची तयारी असते. मंदीच्या वेळी अशा विश्‍वासाचा फायदा होतो. बाजारात माल पडून राहत नाही.
  • या प्रत्येक पायरीवर खूप अभ्यास व कष्ट करणे गरजेचे असते.
  • ग्राहकाच्या गरजा बदलत असतात. त्याचा योग्य अभ्यास करून बाजारात सादर करण्याच्या मालाचे स्वरूप ठेवल्यास मालाचे मूल्यवर्धन करता येते.
  • निव्वळ नफ्यात वाढ होण्यासाठी बाजारातून जास्त पैसे मिळविण्या बरोबर उत्पादन खर्च कमी करण्याचा मार्गही शोधत राहणे गरजेचे आहे. याचा अर्थ उत्पादन घटविणे नव्हे.
  • दर्जा शेतकऱ्याला काय देऊ शकतो याची काही उदाहरणे मी वाचकापुढे ठेवू इच्छितो. दरवर्षी गणपती-गौरीपर्यंत गूळ विकावा असे ठरवितो, पण तो मार्चअखेरीलाच संपतो. यापुढे काही ग्राहकांना न मिळाल्याने त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागते. जास्त घसटीतील ग्राहक घरचे वापरासाठी ठेवलेल्या साठ्यातून भांडून उचलून घेऊन जातात. काही जण पुढील वर्षासाठी आरक्षण करून आगाऊ पैसे जमा करणेची तयारी दाखवितात. अनेक ग्राहक तुमच्याकडे आणखी काय उत्पादने आहेत याची विचारणा करतात व प्रसंगी तांदूळ, कडधान्ये डोळे झाकून घेऊन जातात. अनेकांना ग्राहक शोधावे लागतात. मला ग्राहकाला माल कोठून द्यावयाचा हा प्रश्‍न अखेरीस सतावतो. मी रासायनिक खते, कीटक, रोग, तण नाशकांचा गरजेनुसार वापर करतो. अतिरेक करत नाही. त्याचबरोबर दर्जा व सुपीकतेसाठी भू-सूक्ष्मजीवशास्त्रीय तंत्राचा अवलंब करतो. उत्पादन व दर्जा दोन्ही मिळतो. रसायनांच्या वापराने उत्पादनांचा दर्जा बिघडतो. उत्पादने विषमय होतात, याला शास्त्रीय आधार नाही. परिस्थितीनुरूप रसायनांचा वापर तडजोड म्हणून आपल्याला करावाच लागेल. परंतु, दर्जा व सुपीकतेसाठी रसायनांचे अवशेष नष्ट करणारी समांतर तंत्रेही वापरावी लागतील. या तंत्रांचा अभ्यास केल्यास शेती इतका उत्तम व्यवसाय दुसरा नाही. शेतीत दरवर्षी सतत परीक्षा परीक्षांना बसावे लागते. आमचा शेतकरी समाज इथेच मागे पडतो. इथे शास्त्र तुमच्याकडे येणार नाही. तुम्हालाच शास्त्राकडे जावे लागेल. केवळ सरकारपुढे झोळी पसरून शेतीचे प्रश्‍न संपणार नाहीत. शेतकऱ्याने व्यवसाय साक्षरता प्राप्त करणे याला पर्याय नाही.

    उत्पादनाचा दर्जा महत्त्वाचा सर्वसामान्य शेतकरी दर्जाबाबत विचार करताना दिसत नाही, त्यामानाने सर्वांचा उत्पादन जास्त अगर विक्रमी काढण्याकडे कल आहे. उत्पादन वाढविणे खर्चिक आहे व यातून आपण धोकेही वाढवत असतो. त्यामानाने दर्जा वाढविणे यासाठी अभ्यास महत्त्वाचा ठरतो. इथे खर्च व धोके कमी आहेत. केवळ दर्जा वाढवला आणि उत्पादन कमी आले तर पैसे मिळत नाहीत (उदा. सेंद्रिय शेती). परंतु, दर्जा उत्तम ठेऊन उत्पादनही चांगले आल्यास दोन पैसे जास्त मिळू शकतात. उत्तम दर्जा म्हणून जास्त दर लावल्यास उच्च आर्थिक वर्गातील गिऱ्हाईक मिळेल. अशा बाजाराला खूप मर्यादा असते. आपला माल दर्जेदार उत्पादन करून बाजारातील किमतीच्या जवळपास विक्री किंमत ठेवता आली तरच १०० टक्के गिऱ्हाईक मिळते आणि निर्माण करेल तितके उत्पादन खपू शकते. गरीब व मध्यमवर्गीय गिऱ्हाईकानेही समाधानाने माल खरेदी केला पाहिजे, असे धोरण ठेवणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला स्वतःच्या मालाची किंमत स्वतःला ठरविता आली पाहिजे. म्हणजे मी म्हणेल तो दर असे नसते. वरील सर्व मुद्यांचा अभ्यास करूनच दर विक्रीदर ठरवावा लागतो.

    फुकटात जमीन सुपीकता

  • आता यासाठी नेमके शेतकऱ्याने शेतात काय बदल करणे गरजेचे आहे, याचा अभ्यास करूया. चांगले उत्पादन व उत्तम दर्जा यासाठी जमिनीची सुपीकता उच्च पातळीवर राखणे याला सर्वांत जास्त महत्त्व आहे. यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे हे काम कमीत कमी खर्चात होणे महत्त्वाचे. प्रचलित मार्ग खर्चिक व दुर्लभ आहेत. त्यामुळे मी फुकटातच जमीन सुपीक करण्याचे मार्ग शोधले.
  • मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष आणि चालू पिकातील ओळीत वाढणारे तण ह्यातून चालू पिकाची सेंद्रिय खताची गरज भागविता येते.
  • बिना नांगरता शेती आणि तणनाशकाने तणे मारून जागेला कुजविणे याकामी मशागतीचा व सेंद्रिय खत व्यवस्थापनाचा खर्च शून्यवत होतो.
  • अवशेष व तणे कुजवत असता, कुजविणारी जिवाणू सृष्टी खराब झालेल्या जमिनीचे परत शुद्धिकरण करून सुपीक करते.
  • अशा जमिनीतील कोणतेही उत्पादन उच्च दर्जाचे असते. दर्जामुळे मिळणारे पैसे वेगळे.
  • सुपीकता वाढल्याने पाणी, रासायनिक खते व मनुष्य बळ खर्चात बचत होते, त्यातून मिळणारे पैसे वेगळे.
  • सेंद्रिय पदार्थ जागेलाच सतत कुजविल्यास दर्जा चांगला मिळतो. परंतु आपण शेणखत, कंपोस्ट, गांडुळखत यातच अडकून पडलो आहोत.
  • शेतीला सुरवात केल्यानंतर २० वर्षांनी उत्पादन पातळी घटू लागली. कारणांचा शोध घेतला असता असे लक्षात आले की, जमिनीची सुपीकता घटली आहे. वैज्ञानिक अर्थाने जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी घटली आहे. सुपीकता पूर्वपदावर आणण्यासाठी पारंपरिक शेणखत, कंपोस्टचा वापर करणे शक्‍य नसल्याने पर्यायी मार्गाचा शोध चालू केला. त्यातून मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष हेच पुढील पिकासाठी सेंद्रिय खत हा सोपा, स्वस्त, सुलभ पर्याय सापडला. पुढे रानात उगवलेली तणे युक्तीने वाढवून त्यांचेही सेंद्रिय खत करण्यास प्रारंभ केला. अवशेष व तणे जागेलाच कुजविल्याने सुपीकता वाढू लागली.

    संपर्क :  ८२७५४५००८८ (लेखक प्रयोगशील शेतकरी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com