केळी पीक सल्ला

केळी पिकाचे करपा रोग ग्रस्त पान
केळी पिकाचे करपा रोग ग्रस्त पान

सद्यःस्थितीत मृगबाग लागवडीतील केळफूल निसवण्याच्या अवस्थेत आहे. कांदेबाग लागवड मुख्य वाढीच्या अवस्थेत आहे. थंडीमुळे या दोन्ही बहरांतील बागांवर रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात. मृगबाग लागवड :

  • बागेतील पिवळी, रोगग्रस्त पाने धारदार विळ्याने कापून बागेबाहेर त्याची विल्हेवाट लावावी.
  • झाडाभोवतालची पिले नियमित कापून बाग स्वच्छ ठेवावी.
  • बागेमध्ये ठिबक संच व्यवस्थित अंथरून घ्यावा. सर्व झाडांना पाणी तसेच खतांचा पुरवठा व्यवस्थित होतो किंवा नाही याची तपासणी करून विद्राव्य खते वेळच्या वेळी देण्यात यावीत.
  • बागेस ०:५२:३४ हे विद्राव्य खत ५० किलो व ०:०:५० हे विद्राव्य खत ५० किलो प्रतिएकरी या प्रमाणात लागवडीपासून १४७ ते २७२ या दिवसांदरम्यान टप्प्या टप्प्याने द्यावे.  
  • बागेमध्ये ठिबकची व्यवस्था नसेल तर लागवडीनंतर १६५ दिवसांनी प्रतिझाड युरिया ८२ ग्रॅम व म्युरेट ऑफ पोटॅश ८३ ग्रॅम अशी खतमात्रा द्यावी. खते झाडापासून १५ सें.मी. अंतरावर बांगडी पद्धतीने देऊन लगेच मातीआड करावीत.
  • आगामी काळामध्ये ढगाळ वातावरण तसेच आर्द्रता यांच्यात वाढ झाल्यास करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी फवारणी करताना घडासहित संपूर्ण झाडावर होईल अशा पद्धतीने साध्या फवारणी यंत्राने करावी.
  • कांदेबाग :

  • केळी सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. उभी व आडवी वखरणी करून बाग तणविरहित ठेवावी. तसेच झाडांना मातीची भर देऊन आधार द्यावा.
  • बागेमध्ये विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून
  • बागेबाहेरील खड्ड्यात टाकावीत. करपाग्रस्त व पिवळी पाने कापून नष्ट करावीत. बाग स्वच्छ ठेवावी.
  • मुख्य खोडालगत येणारी पिले धारदार विळ्याने नियमित कापावीत. त्यांची बागेबाहेर नेऊन विल्हेवाट लावावी.
  • पिकास लागवडीपासून ७५ दिवसांनी नत्राची मात्रा युरिया ८२ ग्रॅम प्रतिझाड अशी द्यावी. खतमात्रा बांगडी पद्धतीने देऊन मातीआड करावी. ठिबकद्वारे विद्राव्य खते द्यावयाची असल्यास १९:१९:१९- ७५ किलो व युरिया १५० किलो
  • प्रतिएकर या प्रमाणात ७१ ते १४६ दिवसांदरम्यान टप्प्याटप्प्याने द्यावीत.
  • बांधावरील वेलवर्गीय तणे उपटून नष्ट करावीत. त्यामुळे विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.
  • रोग नियंत्रण : करपा (सिगाटोका), जळका चिरुट फवारणी : (प्रतिलिटर पाणी) प्रोपीकोनॅझोल (२५ ई.सी.) १ मि.लि. किंवा कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू.पी.) १ ग्रॅम किंवा मॅंकोझेब (७५ डब्ल्यू.पी.) २.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट १ मि.लि.

    कीड नियंत्रण : फुलकीड : प्रौढ व बाल्यावस्थेतील फुलकिडे घडाच्या निसवणीनंतर अपरिपक्व केळी फळाची साल खरवडून बाहेर येणाऱ्या अन्नरसाचे शोषण करतात. अशा ठिकाणच्या पेशी मृत झाल्याने त्या ठिकाणी फळावर तांबूस किंवा लालसर रंगाचे चट्टे पडतात. अशा फळांना बाजारभाव कमी मिळतो. नियंत्रण : केळफूल बाहेर पडत असताना अॅसिटामिप्रीड ०.१५ ते ०.२ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट १ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी संपूर्ण घडावर होईल याची काळजी घ्यावी. 

    संपर्क : आर. व्ही. देशमुख, ९४२१५६८६७४ (केळी संशोधन केंद्र, नांदेड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com