योग्य व्यवस्थापनाने केळी खोडवा फायदेशीर

 केळीच्या पहिल्या खोडव्यापासून अधिक दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी पहिले पीक निसवल्यानंतर दोन महिन्यांनी एक जोमदार पिल (मुनवा) सोडावे.
केळीच्या पहिल्या खोडव्यापासून अधिक दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी पहिले पीक निसवल्यानंतर दोन महिन्यांनी एक जोमदार पिल (मुनवा) सोडावे.

राज्यात केळीचा खोडवा पीक घ्यावयाची पद्धत नव्हती. मात्र ऊतीसंवर्धित रोपे व रासायनिक खताच्या वापरामुळे केळीच्या लागवड खर्चात लक्षणीय वाढ झाल्याने एक खोडवा पीक घेणे आता अपरिहार्य झालेले आहे. सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास केळीचे खोडवा पीक लागणीपेक्षा अधिक उत्पादन देऊ शकते.

केळी पिकातील खोडवा पिकाचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी योग्यवेळी पिले सोडणे महत्त्वाचे आहे. तसेच पिकाचे खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे आवश्‍यक आहे.

  • केळीची लागवड केल्यानंतर केळीच्या खोडाभोवती नवीन मुनवे फुटायला लागतात त्यांना पिले अशी संज्ञा आहे. एका केळीच्या झाडाला त्याच्या पूर्ण जीवनचक्रात जातीपरत्वे ६-८ पिले  येतात. फक्त एकच पीक घ्यावयाचे असल्यास पिले जसजशी येतील तसतशी कापून टाकावीत, अन्यथा मूळ झाडाची वाढ खुंटते व त्याचा उत्पादनावरही परिणाम होतो.
  • केळीच्या पहिल्या खोडव्यापासून अधिक दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी पहिले पीक निसवल्यानंतर दोन महिन्यांनी एक जोमदार पिल (मुनवा) सोडावे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या पहिल्या पिकाला सोडलेल्या पिलापासून काही नुकसान होत नाही.
  • खोडवा पिकास शेतकरी शिफारशीप्रमाणे खत व पाणी व्यवस्थापन करीत नाहीत. तसेच रोग व किडींचाही वेळीच बंदोबस्त केला जात नाही. उत्पादनावर त्याचा परिणाम होतो.
  • मध्यम खोल काळ्या जमिनीत मुख्य केळी पिकाचे घड कापणी केलेले खोड आहे तसेच ठेवून फक्त पाने कापून त्यांचा आच्छादन म्हणून वापर करावा. त्यामुळे मूळ खोडातील उपयुक्त अन्नद्रव्ये खोडवा पिकास मिळतात. परिणामी कमी खर्चात अधिक व दर्जेदार उत्पादन मिळते.  
  • पिल (मुनवा) सोडल्यानंतर पिलास नत्र १५० ग्रॅम, स्फुरद ४५ ग्रॅम व पालाश १५० ग्रॅम अशी खतमात्रा ठिबक सिंचन संचाच्या माध्यमातून द्यावी.
  •                   खोडवा पिकास ठिबक सिंचनातून विद्राव्य खत व्यवस्थापन

    क्र.     खत मात्रा देण्याची वेळ (आठवडे)   हजार झाडांसाठी खतमात्रा (किलो / आठवडा) हजार झाडांसाठी खतमात्रा (किलो / आठवडा) हजार झाडांसाठी खतमात्रा (किलो / आठवडा)
        युरिया   मोनोअमोनिअम फॉस्फेट  म्युरेट ऑफ पोटॅश
    १.   १ ते १६   ५.५     ४.६५    ३
    २.    १७ ते २८     १३.५    ---    ८.५
    ३.     २९ ते ४०    ५.५    ---    ७
    ४. ४१ ते ४४  ४    ---  

    पाणी व्यवस्थापन केळी पिकास एकूण १८०० ते २२०० मि.मी. पाणी लागते. पिकास सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धत उपयुक्त आहे. सिंचनासाठी सूक्ष्मनलिका पद्धतीपेक्षा (मायक्रोट्युब) ड्रिपर किंवा इनलाइन ड्रीपरचा वापर अधिक फायद्याचा ठरतो. बाष्पीभवनाचा वेग, जमिनीची प्रतवारी, पिकाच्या वाढीची अवस्था इ. बाबींवर केळीची पाण्याची गरज अवलंबून असते.

                                                  पाणी व्यवस्थापन

    क्र.    पाणी देण्याची वेळ (महिने)     पाण्याची गरज (लि/झाड/दिवस)
    १  १ ते ४     ४.५ ते ६.५
    २.   ५ ते ९  ९ ते ११
    ३.     १०   १४ ते १६
      ४.    ११     १८ ते २०
    ५.     १२     २१ ते २४

    टीप : वरील पाण्याची मात्रा मार्गदर्शक असून बाष्पीभवनाचा वेग, जमिनीचा प्रकार आणि पीकवाढीच्या अवस्था यानुसार योग्य तो बदल करावा.

    आंतरमशागत

  • लागवडीपासून ३-४ महिने बाग स्वच्छ ठेवावी. त्यासाठी आवश्‍यकतेनुसार उभी आडवी कुळवणी करावी. तीन महिन्यांपर्यंत कुळवणी करता येते. दर ३ महिन्यांच्या अंतराने बागेची बांधणी करून झाडांना मातीची भर द्यावी.
  • केळीची पिले धारदार कोयत्याने नियमित कापून टाकावीत. रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नष्ट करावीत. हिरवी पाने कापू नयेत.
  • झाड पडू नये म्हणून आवश्‍यकतेनुसार खोडाला बांबूच्या काठ्या किंवा पाॅलीप्राॅपिलीनच्या पट्ट्यांच्या साह्याने आधार द्यावा.
  • केळी खोडवा पिकाचे फायदे

  • खोडवा पद्धतीचा अवलंब केल्यास पूर्वमशागत, रोपे, नवीन लागवडीचा खर्च करावा लागत नाही.
  • मातृपिकाची सारी शोषण यंत्रणा त्याच जागी खोडवा पिकास मिळते. परिणामी, पिकाची वाढ लवकर होते. पीक लवकर तयार होते.
  • खोडवा पिकाचे उत्पादन पहिल्या पिकापेक्षा निश्‍चितपणे अधिक असते.
  • संपर्क : नाझेमोद्दिन शेख, ०२५७- २२५०९८६ (केळी संशोधन केंद्र, जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com