पानवेल व्यवस्थापन सल्ला

पानवेलीची बांधणी व उतरण कुशल मजुरांकरवीच करुन घ्यावी.
पानवेलीची बांधणी व उतरण कुशल मजुरांकरवीच करुन घ्यावी.

सद्यःस्थितीत पानवेलीच्या शेतात आंतरमशागत, वेलीची बांधणी, माती घालणे, सिंचन व्यवस्थापन आदी कामे महत्त्वाची आहेत. आवश्‍यकता वाटल्यास वेलीची योग्य पद्धतीने उतरण करून घ्यावी. योग्य पद्धतीने पानांची काढणी, प्रतवारी व पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठवून द्यावीत. आंतरमशागत : नवीन लागण केलेल्या पानवेलीच्या शेतात खुरपणी करावी. खुरपणीनंतर वाफ्यातील माती वेलीच्या बुंध्याला लावावी. त्यामुळे पाणी सारखे मिळते. वेलीची बांधणी : नवीन लागवड केलेल्या बागेत वेलीची जसजशी वाढ होत जाईल, तसतसे तिची शेवगा, शेवरी किंवा पांगाऱ्याच्या खोडाला लव्हाळ्याने सैल बांधणी करावी. बांधणी कुशल मजुरांकडूनच करून घ्यावी. वेळीच बांधणी न केल्यास वेल पडून वाकून मोडतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान होते. माती घालणे : जमिनीचा पोत टिकून चांगल्या प्रतीची पाने मिळण्यासाठी लागवडविरहित माळरानाची तांबडी माती (हेक्टरी ४० टन) वाफ्यात टाकावी. माती घालण्यासाठी काळी किंवा नदी काठाची पोयट्याची माती वापरू नये. डोंगराच्या पायथ्याशी असणारी माळरान जमिनीतील माती सर्वोत्तम ठरते. सिंचन व्यवस्थापन वाफा पद्धत : वाफे पद्धतीने पाणी देताना जमिनीच्या मगदुराप्रमाणे उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. मात्र अतिरिक्त पाणी दिले जाणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा पीक मूळकुजव्या यासारख्या रोगांना बळी पडण्याची शक्यता असते. . ठिबक सिंचन पद्धत : वेलीस पाणी देण्यासाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर आहे. यात पाण्याची ५० टक्के बचत होऊन उत्पादनात ४० टक्के वाढ होते. पानांची गुणवत्ताही चांगली मिळते; तसेच मुळकुजव्यासारख्या रोगांचे प्रमाण फारच कमी राहते. ठिबक सिंचन पद्धतीने मार्च महिन्यात प्रतिमीटर क्षेत्रास २६ लिटर इतके, तर एप्रिल महिन्यात प्रतिमीटर क्षेत्रास २९ लिटर इतके पाणी द्यावे.    वेलीची उतरण वेलीची उंची ४ ते ५ मीटर झाल्यानंतर चांगल्या गुणवत्तेची पाने मिळत नाहीत. पानांची संख्या वाढते व आकार लहान राहतो. त्यामुळे बाजारभाव चांगला मिळत नाही. म्हणून पानवेलीची उतरण करणे गरजेचे ठरते. पश्‍चिम महाराष्ट्रात जानेवारी ते मेदरम्यान एकदाच उतरण केली जाते. ती केली नसल्यास करून घ्यावी. उतरणपूर्वी ८ दिवस अगोदर वेलीच्या तळाशी प्रतिबंधात्मक म्हणून कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात द्रावणाची आळवणी करावी. उतरण करताना वाफ्यात लांबीच्या बाजूने १५ सें.मी. रुंद व २० सें.मी. खोल चर खोदावा. त्यामध्ये प्रतिवेल निंबोळी पेंड (तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अंदाजे १० ग्रॅम) अधिक ट्रायकोडर्मा प्लस ५ ग्रॅम हे मिश्रण टाकावे. वाढलेली संपूर्ण वेल सोडवून ती इंग्रजी ८ आकारात वळवून कोणत्याही प्रकारे इजा होऊ न देता जमिनीत गाडावी. गाडताना जमिनीत वेलीचा ७५ टक्के भाग दाबून केवळ २५ टक्के भाग जमिनीवर राहील असे पाहावे. त्यानंतर लगेच पाणी द्यावे. काही दिवसांनी जमिनीवर असलेल्या वेलीला फुटवे येऊन त्यांची वाढ सुरू होते.   पानांची काढणी वेलीवरील पानांची काढणी योग्य वेळी करावी. वेलीवर नवीन पाने फुटल्यावर ३५ ते ४० दिवसांनी काढणीस तयार होतात. पण ती तशीच पुढे ठेवून ६० ते ९० दिवसांनी काढावीत. कारण अशी पाने जास्त काळ टिकतात व त्यांना दरही चांगला मिळतो. पानांची काढणी दर १५ दिवसांनी करावी. हे करताना योग्य आकाराची, जाडीची तसेच योग्य प्रमाणात देठ ठेवून काढणी करावी.    पानांच्या काढणीनंतर पाने बांधण्यासाठी केळीच्या ओलसर पानांचा वापर करावा. अशा पद्धतीत बांधलेले डाग विक्रीस पाठवल्याने वाहतुकीदरम्यान पाने जास्त काळ सुस्थितीत राहतात. तसेच पानाचे आयुष्यमान वाढावे यासाठी ओलसर काढाच्या आच्छादनाचा वापर करून ती बांबूच्या करंड्यांमध्ये बांधावीत. फापडा आणि कळी अशा दोन प्रकारच्या पानांची वेगळी काढणी करून पॅकिंग करावी.

संपर्क : संदीप डिघुळे, ७७०९५४७३०७ (पानवेल संशोधन योजना, जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com