पानवेल लागवडीपूर्वीची तयारी...

पानवेल लागवडीपूर्वीची तयारी...
पानवेल लागवडीपूर्वीची तयारी...

ज्या शेतकऱ्यांना नवीन पानमळ्याची लागवड करावयाची असेल त्यांनी सद्यःस्थितीत जमिनीची पूर्वमशागत करून घ्यावी. ऑगस्ट महिन्यात लागवड करावयाची असल्याने आत्ताच शेताची आखणी करून घ्यावी. पानवेलीला सावलीसाठी व आधारासाठी आधारवृक्षांची लागवड करून घ्यावी. पानवेल ही दीर्घकाळ शेतामध्येे राहते. त्यामुळे जमिनीच्या पूर्वमशागतीला मोठे महत्त्व आहे. जमीन चांगली भुसभुशीत करून घेणे आवश्‍यक आहे. पूर्वमशागत जमिनीच्या चांगल्या पूर्वमशागतीसाठी खरीप हंगामात हिरवळीचे पीक घ्यावे. फुले येण्यापूर्वी ते जमिनीत गाडावे. त्यानंतर जमीन ३-४ वेळा उभी आडवी खोल नांगरावी. नंतर कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन ढेकळे बारीक करावीत. काडी कचरा वेचून शेत स्वच्छ करावे. हेक्‍टरी ४० टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळावे. अशी पूर्वमशागत झाल्यानंतरच जमिनीची आखणी करावी. जमिनीची आखणी पानवेल लागवडीसाठी जमिनीची आखणी करणे महत्त्वाची बाब आहे. एक एकर क्षेत्राचे काटकोनात आडव्या जाणाऱ्या दोन मीटर रुंदीच्या पाय रस्त्याने चार समान भाग करावेत. यातील प्रत्येक भागास चौक म्हणतात. चौकाचे समान पाच उपभाग करावेत. प्रत्येक उपभागात १८ वाफ्याचे (वाफा ३ मीटर लांब व १.५ मीटर रुंद ) दोन चिरे होतात. प्रत्येक चिऱ्याच्या दोन्ही बाजूस रस्ता असतो. डाव्या बाजूस एक मोठ्ठा पाट काढावा. आडव्या व उभ्या वाफ्यातून एक मुख्य कालवा (धुरकालवा)न्यावा. धुरकालव्यातून प्रत्येक वाफ्यास बाजूने पाणी देण्यासाठी वाट (सरी) काढावी. वाफ्याच्या दुसऱ्या बाजूस पाण्याच्या निचऱ्यासाठी पाट (केडग) काढावा. सर्व सऱ्यांमधून निचरुन आलेले पाणी एका मोठ्या पाटात (धुरकेडग) काढावे. आखणी करताना स्थानिक भागातील हवामान, जमिनीच्या उंचसखलपणाचा विचार करावा.   आधारवृक्षाची लागवड पानवेल हे अत्यंत नाजूक पीक आहे. त्यासाठी सावलीची गरज असते. वेलीच्या शेंड्यांची (छाट) लागवड करण्यापूर्वी सावलीसाठी व आधारासाठी शेवरी, शेवगा या वनस्पतीची लागवड करावी. आखणी झाल्यानंतर १५ जून ते ७ जुलै यादरम्यान वाफ्याच्या लांबीच्या बाजूस वरंब्याच्या मध्यावर १५ सें.मी. अंतरावर एकानंतर एक पांगारा, शेवगा किंवा हादगा यांच्या बिया टाेकण पद्धतीने लावाव्यात. टाेकणीपूर्वी प्रतिकिलो बियास थायरम ४ किलो किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा भुकटी ५ ग्रॅम या प्रमाणात चोळावी. प्रत्येक वाफ्यात प्रत्येक बाजूस पांगाऱ्याची व शेवग्याची ५ -६ रोपे लावावीत. शेवरीची विरळणी करून वाफ्याच्या प्रत्येक बाजूस शेवरीची ८ -९ झाडे ठेवावीत. शेवगा व पांगाऱ्यामध्ये १५ सें.मी. अंतर राहिल अशी विरळणी करावी. शेवरीचे प्रमाण कमीतकमी ठेवावे म्हणजे पानमळ्यात सूत्रकृमींचे प्रमाण वाढणार नाही. शेवरीचे प्रमाण जास्त राहिल्यास २ ते ३ वर्षांनी शेवरी प्रथम सूत्रकृमी व नंतर बुरशीला बळी पडून मर रोगाने मरते. तिच्या मुळ्यात वाढलेली बुरशी व सूत्रकृमीची पानवेलीला लागण होऊन पानमळ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान हाेते. जमीन आखणीच्या पद्धती खांडटांग पद्धत : यामध्ये एक आडव्या वाफ्याची ओळ व तिला जोडून उभ्या सलग वाफ्याच्या दोन ओळी असतात. जमीन समतल (लेव्हल) केलेली असल्यास यापद्धतीचा अवलंब केला जातो. महाराष्ट्रात ही प्रचलित आहे. भेंडी पद्धत : या पद्धतीमध्ये वाफ्याची लांबी ३ मीटर x १.५ मीटर असते. या पद्धतीत एक ओळ उभ्या वाफ्याची तर दुसरी आडव्या वाफ्याची यापद्धतीप्रमाणे आखणी केली जाते. जास्त उतार असलेल्या जमिनीसाठी ही पद्धत योग्य आहे. सरळ वाफ्याची पद्धत : पश्‍चिम महाराष्ट्रात ही पद्धत प्रचलित होत आहे. यापद्धतीत वाफ्याची लांबी जमिनीच्या सपाटीवर अवलंबून असते. वाफ्याच्या लांबीच्या बाजूस एकाआड एक असे पाण्याचे सारे (पाट) दोन वाफ्याच्या मधील वरंबा फाेडून तयार करतात. वरंब्यांची रुंदी ६० ते ७० सें.मी. ठेवली जाते. वाफे सर्वच पद्धतीमध्ये दक्षिणोत्तर ठेवले जातात. काही ठिकाणी वाफ्याच्या बाजूनेच लागवड केली जाते. त्यामुळे हवा खेळती राहून प्रकाश जास्त मिळतो. परिणामी दर्जेदार पानांचे अधिक उत्पादन मिळते. वरील सर्वच पद्धतीमध्ये संपूर्ण बागेच्या सभोवती दोन मीटरचा रस्ता ठेवला जातो. या रस्त्याच्या बाहेरील बाजूस धडतास धरतात. त्‍यात पांगाऱ्याचे अंदाजे ४ मीटर उंचीचे सरळ खुंट १.५ मीटर अंतरावर जमिनीवर पहारीने खड्डा करून रोवतात. या धडतासाच्या आत प्रत्येक वाफ्यात ३ ते ४ मीटर अंतरावर खुंट लावले जाते. ही पद्धत इतर सर्वपद्धतींच्या मानाने सोपी आहे. त्यामुळे या पद्धतीचा अवलंब करावा. अलीकडे पांगाऱ्याच्या ओळीमध्ये गजराज गवताची लागवड करतात आणि चांगली वाढ झाल्यावर त्याचाच ताटी म्हणून उपयोग करतात. त्यासाठी दोन्ही बाजूंनी शेवरी किंवा बांबूच्या काठ्या वापरून बांधून घेतात. यामध्ये ताटीचा खर्च वाचतो व जिवंत हिरवी ताटी तयार होते.

चालू बागेचे व्यवस्थापन सिंचन  व्यवस्थापन वाफा पद्धतीने पाणी द्यावयाचे असल्यास जमिनीच्या मगदुराप्रमाणे सिंचन करावे. पावसाळ्यात शक्यतो सिंचनाची गरज भासत नाही. मात्र वाफ्यांना भरपूर पाणी देऊ नये; अन्यथा पीक मूळ कुजव्या व इतर रोगांना बळी पडून उत्पादन व दर्जात घट येते. वेलीस ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे अत्यंत फायदेशीर आहे. यात पाण्याची ५० टक्के बचत होऊन उत्पादनात ४० टक्के  वाढ होते. पानाची गुणवत्ता चांगली मिळते व मूळकुजव्या रोगाचे प्रमाण फारच कमी राहते. या पद्धतीने प्रतिमीटर क्षेत्रास महिनाभरात १७ लिटर पाणी दिले जाईल असे नियोजन करावे. वेलीची उतरण जुनवान पानमळ्यात वेलीची उतरण जून महिन्याच्या दरम्यान केली जाते. वेलीची उंची ४ ते ५ मीटर झाल्यानंतर चांगल्या गुणवत्तेची पाने मिळत नाहीत. पानांची संख्या वाढते व आकार लहान राहतो. त्यामुळे बाजारभाव चांगला मिळत नाही. म्हणून पानवेलीची उतरण करणे गरजेचे ठरते. उतरणपूर्वी ८ दिवस अगोदर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात वेलीवर फवारणी करावी. उतरण करताना वाफ्यात लांबीच्या बाजूने १५ सें.मी. रुंद व २० सें.मी. खोल चर खोदावा. मात्र, त्यामध्ये शेणखत/कंपोस्ट खत न वापरता प्रमिहेक्टरी फुले ट्रायकोडर्मा ५ किलो प्रतिकरंज पेंड किंवा निंबोळी पेंड ५०० किलो या प्रमाणात मिसळून वापर करावा. वाढलेली संपूर्ण वेल सोडवून ती इंग्रजी ८ आकारात वळवून कोणत्याही प्रकारे इजा न होऊ न देता चुंबळ वर ठेवून बाकीचा पाव भाग चरामध्ये दाबावा व लगेच पाणी द्यावे. खतव्यवस्थापन पानवेलीला सेंद्रिय व रासायनिक खते दिली जातात. रासायनिक खते उदा. युरिया दिल्यास पानाचे उत्पादन वाढते. पण पाने साठवणुकीत फार काळ टिकत नाहीत. वेलीच्या चांगल्या वाढीसाठी, पानाचे भरपूर उत्पादन मिळण्याकरिता आणि पानाचा टिकाऊपणा वाढावा म्हणून २०० किलो नत्र शेणखतातून किंवा निंबोळी पेंडीतून वर्षातून दोन वेळा द्यावा. पहिला १०० किलो नत्राचा हप्ता जूनमध्ये किंवा पावसाळ्याच्या सुरवातीस वेलीच्या चुंबळीजवळ लहानसा चर काढून द्यावा. शक्‍यतो पानमळ्यास सेंद्रिय खतांचाच वापर करावा. केवळ रासायनिक खतांचा वापर केल्यास रोगाचे प्रमाण वाढून पानमळ्याचे आयुष्य कमी होते. संपर्क : संदीप डिघुळे, ७७०९५४७३०७ (पानवेल संशोधन योजना, तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com