पशू सल्ला

जनावरांना एका ठिकाणी पत्र्याच्या शेडखाली २४ तास बांधून न ठेवता मोकळे ठेवावे
जनावरांना एका ठिकाणी पत्र्याच्या शेडखाली २४ तास बांधून न ठेवता मोकळे ठेवावे

हवामानातील बदलानुसार जनावरांचे दूध उत्पादन, प्रजोत्पादन, आरोग्य चांगले राहण्यासाठी जनावरांच्या व्यवस्थापनात बदल करणे आवश्‍यक आहे. जनावरांचे उन्हाळ्यामध्ये पुढीलप्रमाणे व्यवस्थापन करणे फायदेशीर ठरते.

  • जनावरांना एका ठिकाणी पत्र्याच्या शेडखाली २४ तास बांधून न ठेवता मोकळे ठेवावे यामुळे शेडमधील उष्णता वाढल्यास जनावर दुसऱ्या ठिकाणी, झाडाखाली जाऊन बसते त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो.
  • मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब केल्यास जनावरांना दिवसभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. तसेच फिरते राहिल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • शेडवरती पत्रे असतील तर त्यावर पांढरा रंग/ चुना लावावा यामुळे पत्रा तापत नाही. पत्र्यावरती खराब पालापाचोळा, गवत टाकून त्यावर दिवसभरातून ५-६ वेळा अतिउन्हाच्यावेळी पाणी मारावे.
  • उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची उपलब्धता असणे आवश्‍यक आहे. त्याकरिता आताच उपलब्ध चाऱ्यापासून मुरघास बनवून हिरव्या चाऱ्याची साठवण करावी. अतिरिक्त हिरवा चारा "हे'' बनवूनही साठवता येतो.
  • गोठ्यापासून ठराविक अंतरावर झाडं असतील तर भोवती जाळीचे कुंपण करून त्यामध्ये जनावरांना मोकळे सोडावे.
  • बंदिस्त गोठ्यामध्ये जनावरांना दिवसभर पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे त्याकरिता जनावरांना केवळ दोन वेळच चारा टाकून चारा खाल्ल्यानंतर गव्हाण साफ करून दिवसभर त्यामध्ये पाणी भरून ठेवावे.
  • दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे त्यामुळे जनावरांचे शरीर तापमान नियंत्रणासाठी मदत होते.
  • चरायला सोडणाऱ्या जनावरांना सकाळी लवकर ७-१० पर्यंत आणि सायंकाळी ४-७ पर्यंत या वेळेत चरायला सोडावे. सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत जनावरांना सावलीच्या ठिकाणी ठेवावे. चरण्यासाठी पुरेसा चारा उपलब्ध असेल तरच जनावरांना चरायला सोडावे. अन्यथा गोठ्यामध्ये ठेवून चारा - पाणी द्यावे.
  • उन्हाळ्यामध्ये जनावरांना जास्त वेळ पाण्याविना ठेवू नये. पाण्याची टाकी सावलीत ठेवावी जेणेकरून पाणी जास्त गरम होणार नाही. पाण्यामधून इलेक्‍ट्रोलाईटस्‌चा पुरवठा करणे फायदेशीर ठरते.
  • गोठ्यातील तापमान नियंत्रणासाठी गोठ्यावरच्या पत्र्याची उंची जास्त ठेवावी.
  • केवळ वाळल्या चाऱ्याचा वापर न करता त्याबरोबर थोडातरी हिरवा चारा द्यावा.
  • उन्हाळ्यामध्ये जनावरांची भूक मंदावते. त्यामुळे पशुखाद्याचा वापर योग्य प्रमाणात वाढवावा. जेणेकरून पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होईल.
  • पशुखाद्यातून दररोज ५०-६० ग्रॅम क्षार मिश्रणाचा पुरवठा करावा जेणेकरून जनावरांतील चपला, तटकर, प्लॅस्टिक, अखाद्य वस्तू खाणे या समस्या टाळता येतात.
  • संपर्क : डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com