ओळखा लाळ्या खुरकुताचा प्रादुर्भाव

लाळ्या खुरकूत रोगग्रस्त जनावर
लाळ्या खुरकूत रोगग्रस्त जनावर

सद्यस्थितीत जनवारांना लाळ्या व खुरकुत हा आजार होण्याची शक्यता आहे. त्याच्या नियंत्रणासाठी लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजना कराव्यात.

लक्षणे :

  • जनावरांच्या तोंडामध्ये तसेच दोन खुरांच्या आतमध्ये फोड येतात. तोंडात झालेल्या जखमांमधून स्राव निघतो. तो लाळेसारखा सतत गळत राहतो.
  • जनावरे चारा खात नाहीत, जनावर मलुल राहते.
  • जनावराच्या शरीराचे तापमान १०४ ते १०५ अंश फॅरानाइटपर्यंत जाते. जनावराच्या तोंडात फोड तयार झाल्यावर शरीराचे तापमान कमी होते.
  • दुधाळ गाई, म्हशींच्या दुग्धोत्पादनात घट दिसून येते.
  • प्रसाराची कारणे :

  • जनावरांच्या तोंडामध्ये जखमा झाल्यानंतर तीन ते चार दिवसांनी पायाच्या खुरात जखमा होऊ लागतात. त्या मोठ्या होऊन त्यातून स्राव बाहेर पडतो.
  • जनावराचे तोंड आणि पायातील फोडातून पिवळसर चिकट स्राव बाहेर पडत असतो. या स्रावामध्ये रोगकारक विषाणू असतात. हा स्राव चारा आणि पाणी यामध्ये मिसळल्याने रोगाचा प्रसार झपाट्याने होता.
  • जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास जनावराचे खूर गळून पडतात. अशी जनावरे लंगडतात. खूर गळून पडलेली जनावरे एका ठिकाणी शांत बसून राहतात.
  • जनावरांचे सड सातत्याने ओले राहत असतील तर सड आणि कासेरवर रोगाचे फोड दिसतात.
  • तातडीच्या उपाययोजना :

  • जनावराच्या तोंडातील जखमा :  बोरिक ॲसिड पावडर १५ ग्रॅम प्रति एक लिटर पाण्यात मिसळावी. या द्रावणाने तोंडातील जखमा धुवाव्यात. सलग ५ ते ६ दिवस दररोज चार वेळेस द्रावणाने जखमा धुवाव्यात.
  • जनावराच्या पायामधील जखमा  :  एक ग्रॅम पोटॅशिअम परमॅगनेट प्रति तीन लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणाने  सलग ५ ते ६ दिवस दररोज  चार वेळेस जखमा धुवाव्यात.
  • जखमांवर पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसारच जंतूनाशक मलम लावावे. सलग तीन आठवडे आजारी जनावरांमध्ये उपचार करावे लागतात.पूर्ण गाव किंवा गोठ्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी एक ते दोन महिने लागू शकतात.
  • सांसर्गिक रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्याने प्रतिजैविकांची मात्रा द्यावी.
  • लसीकरण आवश्यक :

  • पावसाळ्याच्या पूर्वी जनावरांना लसीकरण करणे आवश्यक आहे.सध्याच्या काळात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर तातडीने निरोगी जनावरांना पशुवैद्यकाकडूनच प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.
  • प्रतिबंधात्मक उपाय :

  • आजारी जनावरांना निरोगी जनावरांच्यापासून वेगळे ठेवावे.   गोठा स्वच्छ ठेवावा. गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे. निर्जंतुकीकरण करण्यासाठी १ ते २ टक्के चुना पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणाने गोठा स्वच्छ धुवावा. आजारी जनावरांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने निरोगी जनावरांना चारा, पाणी देऊ नये. जर संबंधित व्यक्ती निरोगी जनावरांना चारा, पाणी देणार असेल तर त्याने पहिल्यांना जंतुनाशकाने हात, पाय धुवावेत. स्वच्छ कपडे घालून मगच निरोगी जनावरांना चारा, पाणी द्यावे.  बाहेरील व्यक्तींना गोठ्यात येण्यास प्रतिबंध करावा.
  • नवीन खरेदी केलेल्या जनावरांना किमान पंधरा दिवस वेगळे ठेवावे.लाळ्या खुरकूत रोगाने जनावर दगावत नाही; परंतु रोगी जनावरास दुसऱ्या रोगाचा संसर्ग होऊन ते जनावर दगावल्यास त्या जनावरास खोल खड्यात पुरावे. खड्डा किमान पाच फूट खोल असावा.  पुरताना त्या जनावरांच्या अंगावर मीठ, चुना आणि त्यानंतर माती टाकून खड्डा पूर्णपणे भरावा.
  • संपर्क : टोल फ्री क्रमांक  १८००२३३३२६८ (विस्तार शिक्षण विभाग, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर )  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com