कोरडवाहू फळबाग सल्ला

कोरडवाहू फळबागांमध्ये आच्छादन व ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
कोरडवाहू फळबागांमध्ये आच्छादन व ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.

सद्यःस्थितीत कोरडवाहू फळपिकात जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. आवळा, आंबा, कागदी लिंबू आदी फळपिकात पीकसंरक्षणाकडे लक्ष द्यावे. बोर, पेरू आदी पिकांत आच्छादन, आंतरमशागत, ताणव्यवस्थापन आदी बाबींवर भर द्यावा. बोर :

  • बोर हंगाम संपलेल्या बागेमध्ये वाळलेल्या फांद्या व फळे काढून टाकावीत.
  • ताण देण्यासाठी बागेस पाणी देऊ नये.
  • शेवगा :

  • शेवग्याचे झाड झपाट्याने वाढणारे असल्यामुळे झाडांना आकार देणे आवश्‍यक आहे. व्यवस्थित आकार दिला नाही तर झाड उंच वाढते. त्यामुळे शेंगा काढणी झाल्यानंतर साधारणत: ५ फूट उंचीनंतर मुख्य शेंड्याची छाटणी करावी. छाटणी करताना चार दिशांना चार फांद्या वाढू द्याव्यात.
  • मुख्य शेंडा छाटल्यानंतर ७ ते ८ महिन्यांनी चारीही फांद्या मुख्य खोडापासून एक मीटर अंतरावर छाटाव्यात. त्यामुळे झाडाचा मुख्य आराखडा तयार होईल. झाडाची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे जाईल व उत्पादनही वाढेल.
  • जुन्या झाडांची दर दोन वर्षांनी एप्रिल, मे महिन्यात शेंगा निघाल्यावर छाटणी करावी. म्हणजे झाड नियमित उत्पादन देईल.
  • शेवगा हंगाम संपलेल्या बागेमध्ये वाळलेल्या फांद्या व फळे काढून टाकावीत. ताण देणेसाठी बागेस पाणी देऊ नये.
  • आवळा :

  • ताण देणेसाठी बागेस पाणी देऊ नये.
  • आवळ्याच्या झाडावर साल खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, फळे पोखरणारी अळी आणि शेंड्यावर गादी करणारी अळी आदी किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याचे नियंत्रण करावे.
  • नियंत्रण प्रमाण प्रतिलिटर पाणी डेल्टामेथ्रीन १.५ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस  १.५ मि.लि.
  • कागदी लिंबू :

  • बागेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि मातीतील उपयुक्त जीवाणूच्या, गांडुळाच्या संख्येत वाढ होण्यासाठी बुंध्याभोवती आच्छादन (५ टन प्रति हेक्‍टरी) करावे.
  • ज्याठिकाणी नवीन बहार धरावयाचा आहे, तेथे बहर धरण्यापूर्वी ताण देण्यासाठी बागेचे पाणी तोडावे.
  • कागदी लिंबावर डिंक्‍या या रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
  • नियंत्रण व्यवस्थापन :

  • प्रथम रोगट फांद्या, पाने, फळे काढून त्यांचा नाश करावा. खोडाला १० टक्के बोर्डोपेस्ट लावावी. डिंक्या झालेल्या भागात थाेडे खरडून पेस्ट लावावी.
  • झाडाच्या बुंध्यात पाणी साचून राहिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे बुंध्याला मातीची भर द्यावी. तसेच वाफसा स्थिती राहिल इतकेच पाणी द्यावे.
  • आवश्‍यकता वाढल्यास १ टक्का बोर्डोमिश्रण किंवा मेटॅलॅक्झिल ८ टक्के अधिक मॅंकोझेब ६४ टक्के संयुक्त बुरशीनाशकाची  ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात झाडाच्या बुंध्याशी आळवणी करावी. मोठ्या झाडाला १० - १५ लिटर तर लहान झाडाला ३-४ लिटर द्रावणाची आळवणी करावी.
  • सद्यस्थितीत फळांवर रसशोषण करणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी प्रतिएकरी २ प्रकाशसापळ्यांचा वापर करावा. प्रकाश सापळ्याच्या तळाशी ठेवलेल्या भांड्यात डायमिथोएट किंवा क्लोरपायरीफॉस २ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात द्रावण ठेवावे. प्रकाश सापळ्यात पतंग सापडून खालील कीटकनाशकाच्या द्रावणात पडतात,  त्यामुळे पतंगाचे चांगल्या प्रमाणात नियंत्रण होते.
  • सीताफळ :

  • सिताफळाचा हंगाम संपलेल्या बागेमध्ये वाळलेल्या फांद्या व फळे काढून टाकावीत.
  • सिताफळ पिकात मिलीबग या किडीच्या नियंत्रणासाठी (पिठ्या ढेकूण) सैल साल खरडून काढून नष्ट करावी. कारण अनुकूल काळात पिठ्या ढेकुण या सालीमागे लपून राहतात. जमिनीत बुंध्यापाशी दाणेदार फोरेट (१० टक्के) १० ग्रॅम प्रतिझाड याप्रमाणात ओलसर मातीत टाकावे.   
  • आंबा :

  • आंबा पीक बहुतांश काढणीच्या  किंवा फळवाढीच्या अवस्थेत आहे. अशावेळी फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मिथााईल युजेनॉल सापळे प्रति एकरी २ याप्रमाणात वापरावेत.
  • पेरु :

  • पेरु फळपिकावर प्रामुख्याने मिलीबग, (पिठ्या ढेकुण) या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी ब्युप्रोफेझिन १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
  • ज्या बागांमध्ये फळे वाढीच्या किंवा काढणीच्या अवस्थेत आहे तेथे फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी मिथाईल युजेनॉल सापळे प्रतिएकरी २ याप्रमाणात वापरावेत.
  • दर्जेदार व तजेलदार फळांच्या उत्पादनासाठी प्रतिझाड २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा, २५ ग्रॅम अझोटोबॅक्‍टर, २५ ग्रॅम पी.एस.बी.अशी जीवाणू खते द्यावीत.  
  • कवठ :

  • कवठाच्या बिया जुलै महिन्यात गादी वाफ्यावर टाकल्या जातात. बी उगवल्यानंतर ६-७ महिन्यांनी (फेब्रुवारी - मार्च महिन्यात) प्रमुख क्षेत्रावर रोपांची पुनर्लागण करावी.
  • बियांपासून उगवलेल्या रोपाचा खुंट म्हणून वापर करून त्यावर मृदू काष्ठ पद्धतीने कलम केल्यास फायदेशीर ठरते. अशापद्धतीने कलम केलेल्या रोपांना ३-८ वर्षांत फळधारणा होते.
  • पिकाच्या वाढीनुसार खताची मात्रा द्यावी. पहिल्या वर्षी १० किलो शेणखत आणि १० किलो नत्र, १० किलो स्फुरद, १० किलो पालाश प्रति झाड द्यावे. झाडाचे वय जसजसे वाढेल तसतशी ही मात्रा वाढवावी.
  • जमिनीतील ओलावा बचतीच्या उपाययोजना  

  • सद्यःस्थितीत तापमानात वाढ होत आहे. अशावेळी कोरडवाहू फळबागांमध्ये जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याची गरज आहे.
  • बागेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी बुंध्याभोवती सेंद्रिय पदार्थांचे (५ टन प्रति हेक्‍टरी) आच्छादन करावे. आच्छादनामुळे मातीतील उपयुक्त जीवाणूंच्या, गांडुळांच्या संख्येत वाढ होऊन मातीची रचना सुधारते. जमिनीची पाणीधारण क्षमता वाढते. जमिनीतून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओलावा टिकून राहतो. आच्छादनामुळे मातीचे तापमानही  नियंत्रित राहते. परिणामी सिंचनासाठी कमी पाणी लागते.
  • सिंचनासाठी ठिबकसिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
  • बागेमध्ये व्ही ब्लेडने मशागत करून जमीन भुसभुशीत ठेवावी. त्यामुळे तापमानवाढीमुळे जमिनीत पडणाऱ्या भेगा बुजल्या जातात. परिणामी मातीतून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग मंदावतो.
  • संपर्क : डॉ. विजय अमृतसागर, ९४२०७५९२८६ (विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com