स्फुरदाच्या उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक

स्फुरदाच्या उपलब्धतेवर  परिणाम करणारे घटक
स्फुरदाच्या उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक

पिकांना खते दिल्यानंतर ती उपलब्ध होण्यापर्यंतच्या टप्प्यावर मातीतील विविध घटक परिणाम करत असतात. खतामुळे मातीच्या रासायनिक घटकांवरही (सामू) परिणाम होत असतात. आजच्या लेखामध्ये स्फुरदाच्या विविध परिणामांविषयी जाणून घेऊ.

पिकांच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या मूलद्रव्यांची आवश्यकता असते. आपण माती परिक्षणानुसार स्फुरदयुक्त खते देतही असतो. मात्र, त्यातील नक्की किती पिकांना उपलब्ध होतात हेही पाहणे महत्त्वाचे असते.  

  • स्फुरदाच्या पिकांना होणाऱ्या उपलब्धतेवर अनेक घटक परिणाम करत असतात. उदा. मातीचे स्वरूप, जमिनीतील हवेचे प्रमाण, जमिनीचे तापमान, जमिनीतील पाण्याचे प्रमाण, जमिनीचे रासायनिक गुणधर्म, जमिनीतील सेंद्रिय पदार्थ, मातीचा सामू, इतर अन्नद्रव्यांसोबतची अभिक्रिया, जमिनीचे जैविक गुणधर्म या बरोबरच पिकांचा प्रकार अशा घटकांचा समावेश होतो.
  • त्याचप्रमाणे खतांचे स्वरूप, खतांची पाण्यातील विद्राव्यता तसेच स्फुरदाचे रासायनिक स्वरूप यांचाही त्यांच्या पिकासाठीच्या उपलब्धतेवर परिणाम करतो.
  • मातीचे स्वरूप : ज्या जमिनीतील माती ही जाड कणांनी बनलेली असते, त्या जमिनीत स्फुरदयुक्त खतांचे वहन होण्यात अडचणी येतात. ज्या जमिनीतील माती बारीक किंवा सूक्ष्म कणांनी बनलेली असते त्या जमिनीत स्फुरदचे वहन जरी व्यवस्थितरित्या होत असले तरीदेखील स्फुरदचे स्थिरीकरण वेगाने होते. अशा जमिनीत स्फुरदयुक्त खते जास्त प्रमाणात द्यावी लागतात.
  • जमिनीतील हवा-पाणी गुणोत्तर : मुळांद्वारे स्फुरदाचे शोषण होण्यासाठी कर्बोदकांची गरज भासते. कर्बोदकांपासून आवश्यक ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासते. जर जमिनीतील मातीचे कण एकमेकांशी घट्ट चिकटलेले असतील तर त्यातून हवा खेळती राहत नाही. मुळांना योग्य तो ऑक्सिजन न मिळाल्याने कर्बोदकांपासून ऊर्जा निर्मिती होत नाही. त्यामुळे स्फुरद शोषणावर विपरीत परिणाम होतो. मातीचे कण घट्ट असल्यामुळे स्फुरदाच्या वहनातदेखील अडथळे निर्माण होतात.
  • जमिनीचे तापमान व आर्द्रता ः कमी तापमानामुळे स्फुरदाच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होतो. कमी तापमानात मुळांची वाढदेखील कमी होते. तसेच कमी आर्द्रतेमुळेदेखील स्फुरदाची उपलब्धता कमी होते.
  • जमिनीचे रासायनिक गुणधर्म :  जमिनीतील कॅल्शियम, लोह व अॅल्युमिनियम या मूलद्रव्यांमुळे स्फुरदाचे स्थिरीकरण होते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणानुसार तसेच सेंद्रिय पदार्थांच्या प्रमाणानुसार स्फुरदाची उपलब्धता वाढते. जास्त सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत स्फुरदाची उपलब्धता वाढते. जमिनीचा सामू ६ ते ७ च्या दरम्यान असल्यास स्फुरदाची उपलब्धता जास्त असते. जमिनीत झिंक (जस्त) युक्त खतांसोबत स्फुरदाचा वापर केल्यास झिंकची कमतरता जाणवते. तसेच अमोनिकल-नत्र (NH४-N) च्या उपस्थितीत जमिनीचा सामू कमी होत असल्याने स्फुरदाची उपलब्धता वाढते.
  • स्फुरदयुक्त खते जमिनीच्या वरच्या थरात राहतात. तिथूनच पिकांस मिळतात. मात्र, पाण्याचा ताण बसल्यास ही खते पिकास मिळत नाहीत. अशा वरील थरात कायम पाणी राहणे मुश्किलच असते. त्यामुळे स्फुरदयुक्त खते जमिनीत थोडी खोलवर टाकावीत.
  • रासायनिक खते आणि त्यांच्या वापराने जमिनीच्या सामुवर होणारा परिणाम

    खताचा प्रकार नत्र-स्फुरद-पालाश प्रति १०० वर्ग फूट क्षेत्रात टाकावयाचे प्रमाण   अभिक्रियेचा वेग  सामुवर परिणाम
    अमोनियम सल्फेट    २०-००-००     २२०-४५० ग्रॅम    वेगवान     अती आम्ल (जास्त अॅसिडीक)
    कॅल्शियम नायट्रेट     १५-००-००    ३४०-६८० ग्रॅम    वेगवान   विम्ल (अल्कलाइन)
    पोटॅशियम नायट्रेट    १३-००-४५     २२०-४५० ग्रॅम    वेगवान   सामान्य (न्युट्रल)
    अमोनियम नायट्रेट  ३४-००-००    ११०-२२० ग्रॅम         वेगवान   आम्ल (अॅसिडीक)
    युरिया   ४६-००-००   ११०-२२० ग्रॅम    वेगवान किंचित आम्ल
    डाय अमोनियम फॉस्फेट (डीएपी) १८-४६-००   ११०-३४० ग्रॅम   वेगवान     आम्ल
    पोटॅशियम क्लोराईड (एमओपी)  ००-००-६०   ११०-३४० ग्रॅम   वेगवान   सामान्य (न्युट्रल)
    पोटॅशियम सल्फेट (एसओपी)  ००-००-५०      २२०-४५० ग्रॅम    वेगवान    सामान्य (न्युट्रल)
    जिप्सम     निरंक   १-२.२५ किलो       मध्यम  विम्ल (अल्कलाईन)
    गंधक     निरंक    ४५०-९०० ग्रॅम  संथ       आम्ल
    बोनमिल  निरंक       २.२५ किलो  संथ  विम्ल (अल्कलाईन)

    संपर्क : पूजा राऊत, ९०७५६४५४०३ (श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com