दर्जेदार कांदा उत्पादनासाठी फर्टिगेशन तंत्रज्ञान

ठिबकसिंचन पद्धतीने गादीवाफ्यावर कांदा लागवडीमुळे योग्य खत व पाणीव्यवस्थापन करता येते.
ठिबकसिंचन पद्धतीने गादीवाफ्यावर कांदा लागवडीमुळे योग्य खत व पाणीव्यवस्थापन करता येते.

कांदा उत्पादनासाठी पाणी आणि खताचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. रब्बी हंगामामध्ये बऱ्यावेळा पाण्याचा तुटवडा असतो. अशावेळी पाणी व खताचे व्यवस्थापन ठिबक सिंचन पद्धतीमधून केल्याने दोन्ही निविष्ठांची कार्यक्षमता ८० ते ९० टक्के वाढते. परिणामी कांद्याच्या उत्पादनातही वाढ होते. त्याशिवाय त्याची गुणवत्ताही सुधारते.   सिंचनासोबत पाण्यात विरघळणारी खते वापरण्याच्या तंत्रास फर्टिगेशन तंत्र असे म्हणतात. या तंत्रामुळे पाणी व खतांच्या वापरामध्ये अनुक्रमे ५० ते ६० टक्के आणि २५ ते ३० टक्के बचत होते. तसेच विद्राव्य खते सामान्य खतांपेक्षा ४० ते ५० टक्के अधिक प्रमाणात पिकांना मिळतात.

फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करताना

  • ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्यासाठी १२० सें.मी. रुंद, ४० ते ६० मीटर लांब आणि १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे ट्रॅक्‍टरला जोडता येणाऱ्या सरी यंत्राने तयार करावेत.
  • ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरीयंत्राच्या फाळाची दोन टोके १६५ सें.मी. अंतरावर ठेवल्यास १२० सें.मी. रुंदीचा गादी वाफा तयार होतो.
  • वाफ्याच्या दोन्ही कडेला ४५ सें.मी. रुंदीच्या दोन सऱ्या तयार होतात. या जागेचा उपयोग जास्त झालेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तसेच फवारणी करणे, गवत काढणे, पिकांचे निरीक्षण करण्यासाठी होतो.
  • गादी वाफ्यावर ठिबक सिंचनाच्या दोन लॅटरल ६० सें.मी. अंतरावर ओढून घ्याव्यात. लॅटरलला ३० ते ४० सें.मी. अंतरावर ड्रीपर्स असावेत.
  • फर्टिगेशनसाठी विद्राव्य खतांच्या मात्रा ठरविण्यापूर्वी मातीचे परीक्षण करणे आवश्यक आहे. जमिनीचा सामु, विद्युत वाहकता, जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण लक्षात घेऊन विद्राव्य खतांचे नियोजन करावे.
  • चांगल्या उत्पादनासाठी हेक्‍टरी ४० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, ६० किलो पालाश व ५० किलो गंधकयुक्त खते लागवडीवेळी द्यावीत. उर्वरित ७० किलो नत्र आठवड्याच्या अंतराने सात समान भागांमध्ये विभागून लागवडीच्या ६० दिवसांपर्यंत ठिबकमधून द्यावे. ठिबक सिंचनामुळे नत्र पाण्याद्वारे वाहून जात नाही व मुळांच्या कक्षेत पोचल्यामुळे त्याचे पुरेपूर शोषण होते.
  • कांदा पीक लागवडीनंतर ६० दिवस खतांना चांगला प्रतिसाद देते. त्यामुळे खतांचे नियोजन लागवडीनंतर ६० दिवसांच्या आत करावे.
  • जस्त, लोह व मॅंगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा फवारणी किंवा ठिबक सिंचनातून गरजेनुसार करता येतो.
  • बाजारात प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली विद्राव्य खते १९:१९:१९, २०:२०:२०, ११:४२:११, १६:०८:२४, १५:१५:३० अशा नत्र, स्फुरद आणि पालाश अन्नद्रव्यांच्या विविध प्रमाणात उपलब्ध आहेत.
  • फर्टिगेशन तंत्रज्ञानाचे फायदे

  • विद्राव्य खते ठिबक सिंचनासोबत थेट मुळांच्या कक्षेत दिली जातात. त्यामुळे त्वरित उपलब्ध होतात.
  • निर्यातक्षम गुणवत्तेचे उत्पादन मिळते. पिकांना पाणी आणि अन्नद्रव्यांचा नियमित पुरवठा होत असल्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते.
  • पिकांच्या गरजेनुसार व अवस्थेनुसार पाणी आणि खताचे योग्य नियोजन शक्य होते.
  • विद्राव्य खते सौम्य द्रावणातून दिली जात असल्यामुळे मुळांवर अनिष्ट परिणाम होत नाही.
  • वेळ, मजूर, खर्च, ऊर्जा, यंत्रसामग्रीची बचत होते.
  • हलक्या जमिनीतही फर्टिगेशन तंत्राच्या मदतीने अधिक उत्पादन मिळविणे शक्य होते.
  • एकसारख्या प्रतवारीचे उत्पादन मिळते.
  • विक्रीलायक कांद्याचे प्रमाण जास्त मिळते.
  • जमिनीत सतत वाफसा राहतो. परिणामी  जमीन भुसभुशीत राहते. त्यामुळे कांद्यांची काढणी सोपी होते.
  • संपर्क : डॉ राजीव काळे, ९५२१६७८५८७ (कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com