पाणीटंचाई परिस्थितीत फळझाडांना ठिबकसिंचन पद्धतीने सिंचन,आच्छादनाचा वापर व खोडाला बाेर्डाे पेस्ट लावणे या उपाययोजना कराव्यात.
पाणीटंचाई परिस्थितीत फळझाडांना ठिबकसिंचन पद्धतीने सिंचन,आच्छादनाचा वापर व खोडाला बाेर्डाे पेस्ट लावणे या उपाययोजना कराव्यात.

फळपीक सल्ला

दोन वर्षांखालील झाडांचे उन्हापासून संरक्षणासाठी त्यांच्यावर सावली करावी.झाडाच्या आळ्यात वाळलेले गवत, पालापाचोळा, उसाचे पाचट किंवा पॉलिथिनचे आच्छादन टाकावे.

आंबा :

  • झाडाच्या खोडाला बोर्डोपेस्ट (१० टक्के) लावावी.
  • झाडांना ७-८ दिवसांच्या अंतराने ठिबकसिंचन पद्धतीने पाणी द्यावे.
  • पाणीटंचाई असल्यास झाडांवर १ टक्का पोटॅशची (१० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी. त्यामुळे पाण्याचा ताण सहन करण्याची झाडांची क्षमता वाढते.
  • सिंचनासाठी मटका सिंचन पद्धतीचा वापर करावा.
  • कलमांच्या कोवळ्या फुटीवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याचे नियंत्रण करावे.नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर थायामेथोक्झाम (२५ टक्के इ.सी.) ०.२ ग्रॅम
  • कलमीकरण केलेल्या लहान झाडांवर मोहर आला असल्यास तो काढून टाकावा.
  • जमिनीपासून साधारण ३ फूट उंचीपर्यंत खोडावरील फांद्या कापून टाकाव्यात.
  • फळधारणा झाल्यानंतर १५ पीपीएम एन.ए.ए.(१५ मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी )या संजीवकाची फवारणी करावी. फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर १५ पीपीएम (१५ मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) जी.ए.ची फवारणी करावी.  
  • केळी :

  • उन्हाळ्यात झाडापासून केळीचा घड निसटू नये म्हणून बागेस पुरेसे पाणी द्यावे.
  • बागेस आठ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • वारा प्रतिबंधक उंच झाडे लावली नसल्यास पऱ्हाटीचे फास दक्षिण / पश्‍चिम बाजूस टाकून वाऱ्यापासून संरक्षण करावे.
  • उन्हामुळे केळीच्या घडाचा दांडा मोडत असल्यास केळीचे घड व घडाचा दांडा वाळलेल्या पानांनी झाकावा.
  • टरबूज :

  • पिकास आठ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • लावणीनंतर ३० दिवसांच्या अंतराने प्रतिहेक्टरी ५० किलो नत्र युरियाद्वारे द्यावे.
  • वेली कोरड्या जागेत पसरतील याची काळजी घ्यावी.
  • पीक कळ्या व फुले या अवस्थेत असताना भुरी रोग अाणि कळी पोखरणारा भुंगा यांचा प्रादुर्भाव होतो. त्याचे नियंत्रण करावे.
  • नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी     प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. अधिक क्विनॉलफाॅस २ मि.लि.
  • केवडा रोग नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी मेटॅलॅक्झिल अधिक मँकोझेब संयुक्त बुरशीनाशक -२ ग्रॅम
  • फळमाशी नियंत्रण : फुले लागण्याच्या अवस्थेपासून फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. नियंत्रणासाठी गूळ १५ ग्रॅम अधिक मॅलॅथिऑन २ मि.लि. प्रतिलिटर पाणी यांची एकत्रित फवारणी करावी.
  • फळमाशींच्या नरांना आकर्षित करण्यासाठी एकरी ३ या प्रमाणात कामगंध सापळे लावावेत. तसेच भोपळ्याचा गर १ किलो अधिक गूळ १०० ग्रॅम अधिक मॅलॅथिऑन१० मि.लि. यांचे अामिष तयार करून एका एकरामध्ये ४ ते ६ ठिकाणी ठेवावे. प्रौढ माशा अमिषाकडे आकर्षित होऊन त्यामध्ये अंडी देतात व मरून जातात. गरज पडल्यास ही पद्धत हंगामामध्ये २ ते ३ वेळा राबवावी.
  • माेसंबी

  • बागेस ७ ते ९ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.  
  • आंबे बहराची फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर ४०० ग्रॅम प्रतिझाड या प्रमाणात नत्राची मात्रा युरियाच्या माध्यमातून त्वरित द्यावी.
  • आंबे बहराच्या कोवळ्या फुटीवर मावा, फुलकीडे, सिट्रस सिला, काळीमाशी आदी कीडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. त्याचे नियंत्रण करावे.नियंत्रण :  फवारणी प्रतिलिटर पाणी     डायमिथोएट १ मि.लि. किंवा      इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के इ.सी.) ०.२ मि.लि.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त मिश्रण ग्रेड २ या  खताची १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • टंचाईसदृश परिस्थितीत फळझाडांचे व्यवस्थापन बाग स्वच्छ ठेवावी : हलकीशी मशागत करावी. म्हणजे तणांमार्फत पाण्याचे होणारे बाष्पीभवन टाळता येते. तणांची पाण्यासाठी होणारी पिकाबरोबर स्पर्धा टळून पिकाला पाण्याची उपलब्धता वाढेल.   बाष्परोधकांचा वापर : वाढत्या तापमानानूसार पिकाची पाण्याची गरज वाढते. पिकाने शोषलेल्या पाण्यापैकी केवळ ५ टक्क्यांपर्यंत पाण्याचा शारीरिक कार्यांसाठी वापर केला जातो. बाकीचे पाणी बाष्पीभवनाच्या रूपाने पुन्हा वातावरणात सोडले जाते. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी केओलीन या बाष्परोधकाची ८ टक्के (८० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.     अन्नघटकांची फवारणी : पाणीटंचाईचा पिकाला सामना करता यावा यासाठी पोटॅशयुक्त विद्राव्य खतांची फवारणी करावी. त्यासाठी पोटॅशियम नायट्रेट १ ते १.५ टक्के (१० ते १५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी.       आच्छादनांचा वापर : जमिनीतून होणाऱ्या बाष्पीभवनामुळे सुमारे ७० टक्के पाणी वातावरणात निघून जाते. त्यासाठी शेतातील काडीकचरा, गवत, तुरकाड्या, भुसा इत्यादींचा ७ ते ८ सें.मी. जाडीचा थर आच्छादनासाठी वापरावा. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. मटका सिंचन : झाडाच्या आळ्यात ४ ते ५ मडके ठेवून मडक्याच्या तळाशी लहान छिद्र पाडून त्यात कापडाची वात बसवून झाडाच्या मुळांना पाणी देण्यात येते. मडक्यातील पाणी झिरपत राहून झाडांच्या तंतुमय मुळांना उपलब्ध होते. ठिबक सिंचनाचा वापर : झाडांना माेजून पाणी दिल्यामुळे झाडांना पाणी कमी लागते. मातीचा थर : झाडांच्या खोडाभोवती मातीचा थर दिल्यास बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान टाळता येते. मातीचा थर आच्छादनाप्रमाणे कार्य करते. झाडाच्या खोडास बोर्डो पेस्ट लावणे : झाडाच्या खोडास बोर्डोपेस्ट (१ टक्का) लावल्यामुळे सूर्यकिरणे परावर्तित होतात. तसेच बुरशीजन्य रोगासही प्रतिबंध होतो. पाणी व्यवस्थापन : शक्यतो बागांना सायंकाळच्या वेळेस पाणी द्यावे.

    संपर्क : डी. डी. पटाईत, ७५८८०८२०४० (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com