फळबाग सल्ला

उन्हाळ्यात फळबागांच्या बुंध्यात प्लास्टिक आच्छादन करावे.
उन्हाळ्यात फळबागांच्या बुंध्यात प्लास्टिक आच्छादन करावे.

येत्या काळात तापमान वाढण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ झाल्‍यास त्‍याचा विपरीत परिणाम फळझाडांवर  होतो. हे लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात. आंबा :

  • नवीन लागवड केलेल्‍या कलमांचे संरक्षण करण्‍यासाठी सावली करावी.
  • कलमांच्‍या आळ्यातील पाण्‍याचे बाष्‍पीभवन कमी होण्‍यासाठी वाळलेले गवत, पालापाचोळा, ऊस पाचट किंवा पॉलिथीनचे आच्‍छादन करावे. कलमांना सकाळी मडका सिंचन, ठिबक सिंचन पद्धतीनेच पाणी द्यावे.
  • आंबा फळे बटर पेपरने झाकून घ्‍यावीत. जेणेकरून प्रखर सूर्यप्रकाश व उष्‍णता यापासून फळांचे संरक्षण होईल.
  • झाडांच्‍या खोडाला बोर्डोपेस्‍ट (१० टक्‍के) लावावी.
  • पाणीटंचाई असल्‍यास झाडांवर १५ ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्‍यामुळे झाडांची पाण्‍याचा ताण सहन करण्‍याची क्षमता वाढते.
  • केळी :

  • बागेमध्‍ये पाण्‍याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्‍यावी. बागेस ठिबक सिंचनाने पिकाच्या गरजेनुसार पाणीपुरवठा करावा.
  • खोडाच्‍या भोवताली असलेली रोग विरहीत वाळलेली पाने कापू नये. त्‍यामुळे खोडाचे उष्‍ण वाऱ्यापासून संरक्षण होते.
  • उष्‍ण वाऱ्यापासून संरक्षण करण्‍यासाठी बागेच्‍या पश्चिम व दक्षिण दिशेने वारा प्रतिरोधकाची व्‍यवस्‍था करावी. बागेत गव्‍हाचे काड, ऊस पाचट, वाळलेला पालापाचोळा किंवा गवत इत्‍यादी आच्‍छादनाचा वापर करावा. यामुळे जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्‍यास मदत होते. सेंद्रिय आच्‍छादनाचा थर ८ ते १० सें. मी. जाडीचा असावा.
  • बागेभोवती सजीव कुंपणाची लागवड केली नसल्‍यास तुराट्या, कडबा किंवा उसाचे पाचट वापरून झापड तयार करून बागेभोवती लावावे.
  • बागेच्‍या चोहोबाजूने ७५ टक्के सावलीची तीन मीटर रुंदीचे शेडनेट उभे बांधावे. शेडनेटच्‍या वरच्‍या बाजूस ठिबकची इनलाइन नळी बांधावी. जेणेकरून बागेत शिरणारी हवा थंड होऊन शिरेल. बागेत उपयुक्‍त सूक्ष्‍म वातावरण निर्माण होईल.
  • नवीन लागवड केलेल्‍या झाडांना सावलीची व्‍यवस्‍था करावी. यासाठी मांडव किंवा शेडनेटचा वापर करावा.
  • उन्‍हाळ्यामध्‍ये घडाच्‍या दांड्यावर व केळीवर प्रखर सूर्यप्रकाश पडल्‍यास दांडा काळा पडून सडतो. केळी पिवळी व काळी होतात. उष्‍णतेपासून संरक्षणासाठी दांड्यावर व घडावर वाळलेल्‍या पानांची पेंढी ठेवावी. ज्‍यामुळे सनस्‍ट्रोक होणार नाही.
  • केळी घड ८० ते ९० टक्‍के हिरव्‍या रंगाच्‍या शेडनेटच्‍या कापडाने झाकून घ्‍यावा म्‍हणजे उन्‍हापासून संरक्षण होईल.
  • मुख्‍य खोडा लगत येणारी पिले धारदार विळ्याने कापावीत.   
  • पिकास पाण्‍याचा ताण बसत असल्‍यास झाडांच्या वाढीनुसार पोटॅशियम नायट्रेट ५ ते १५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून सकाळी फवारणी करावी.
  • जमिनीतील ओलाव्‍याच्‍या कमतरतेमुळे झाडांना जमिनीतून उपलब्‍ध होणारा अन्‍नपुरवठा कमी होतो. यावर उपाय म्‍हणून १९:१९:१९ हे १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्‍या अंतराने फवारणी करावी. असे केल्‍यास झाडांची अन्‍नद्रव्‍याची गरज भागविता येते.
  • केळीच्‍या पानांद्वारे होणाऱ्या बाष्‍पोत्‍सर्जनाचा वेग कमी करण्‍यासाठी केओलिन ८० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून  सकाळी किंवा सायंकाळी १५ दिवसांच्‍या अंतराने झाडावर फवारणी करावी.
  • केळीच्‍या दोन ओळीतील रिकाम्‍या जागेत पांढऱ्या अथवा चंदेरी रंगाचे पॉलिथीन कापडाचे आच्‍छादन करावे. यामुळे जमिनीतून होणाऱ्या बाष्‍पीभवनाचा वेग कमी होतो.  
  • बाष्‍पीभवनाचा व उष्‍ण वाऱ्याचा वेग सध्या आहे. अशापरिस्थितीत ‍केळी घडाच्या संरक्षणासाठी तसेच घडांची प्रत खराब होऊ नये यासाठी ‍केळीचे घड पानांच्या सहाय्याने  दांड्यासह झाकून घ्‍यावेत. शक्‍य असल्‍यास पांढरी स्‍कर्टींग बॅग लावावी.
  • संत्रा, मोसंबी :

  • बागेस सकाळी ठिबक सिंचनाने पाणी द्यावे.
  • नवीन लागवड केलेल्‍या संत्रा बागेतील जमीन वखरून घ्‍यावी. यामुळे बाष्‍पीभवनाचा वेग कमी होतो.
  • प्रखर उन्‍हापासून नवीन लागवड केलेल्‍या रोपांचे संरक्षण करण्‍यासाठी कलमाभोवती तुराट्या, पऱ्हाट्या किंवा कडब्‍याचा वापर करून सावली करावी.
  • आळ्यामध्‍ये आच्‍छादन करावे. जेणेकरून बाष्‍पीभवनामुळे होणारा पाण्‍याचा ऱ्हास कमी होईल.
  • झाडाच्‍या खोडावर जमिनीपासून एक मीटर उंचीपर्यंत बोर्डोपेस्‍ट लावावी. यामुळे सूर्यकि‍रण परावर्तित होऊन उष्‍ण वाऱ्यापासून झाडाच्‍या बुंध्‍याचे संरक्षण होते.  
  • पाण्‍याची फारच कमतरता असल्‍यास झाडावरील अनावश्‍यक फांद्याची हलकी छाटणी करावी. यामुळे पर्णभार कमी होऊन बाष्‍पीभवनाचा वेग कमी होऊन झाडे जगवता येतात.    
  • बागेत पॉलिथीन फिल्‍म (१०० मायक्रॉन), गवत किंवा पालापाचोळा थर (१० सें.मी.) देऊन आच्‍छादन करावे. यामुळे ओलावा जास्‍त काळ टिकून राहतो.
  • डाळिंब :

  • बागेस शक्‍यतो सकाळी पाणी द्यावे. बागेत सेंद्रिय आच्‍छादनाचा किंवा मल्चिंग पेपरचा वापर करावा.
  • डाळिंबाच्‍या नवीन बागेचे उन्‍हापासून संरक्षणासाठी कलमांना सावली करावी. तसेच अाळ्यातून आच्‍छादनाचा उपयोग करावा. बाग तणमुक्‍त ठेवावी.
  • बागेभोवती पश्चिम- उत्तर दिशेने वारा प्रतिरोधकाची व्‍यवस्‍था करावी.
  • बागेतील बाष्‍पोत्‍सर्जन कमी होण्‍यासाठी केओलिन २५ ते ५० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून  झाडावर फवारणी करावी.
  • संपर्क : डॉ. कैलास डाखोरे, ७५८८९९३१०५, (ग्रामीण कृषी हवामान सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com