गॅलार्डिया लागवड तंत्रज्ञान

गॅलार्डिया लागवड तंत्रज्ञान
गॅलार्डिया लागवड तंत्रज्ञान

गलांडा नावाने ओळखले जाणारे गॅलार्डियाचे पिवळ्या रंगाचे फूल सर्वांना परिचयाचे आहे. कमी कष्टात येणारे, रोग व किडींना कमी प्रमाणात बळी पडणारे आणि भरपूर फुलांचे उत्पादन देणारे अत्यंत काटक असे हे फूलपीक आहे. त्याचे मूळ उत्तर अमेरिका असले तरी महाराष्ट्राच्या हवामानात हंगामी फूलझाड म्हणून ते चांगले रुळले आहे.

  • आकर्षक गोल आकार, रंग, टिकाऊपणा या गुणधर्मांमुळे फुलांचा उपयोग सजावट, हारतुरे, पुष्पगुच्छ करण्यासाठी होतो. फुलांना लांब दांडे असल्याने फुलदाणी सजविण्यासाठी तसेच कटफ्लॉवर्स म्हणूनही वापर करता येतो. केशरी, पिवळ्या, पांढऱ्या रंगाने बहरलेले ताटवे बागेत मोहक दिसतात. फुले मोठी आकर्षक व वजनाने हलकी असतात.
  • फुले जास्त दिवस म्हणजे सुमारे पाच दिवस चांगली टिकून राहतात. या फुलांचा ताटवा गालिचासारखा दिसतो. म्हणून परदेशात या फुलांना ‘ब्लॅंकेट फ्लॉवर’ म्हणून ओळखतात. 
  • पिकाचे महत्त्व व लागवड : 

  • पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता या फूलपिकात असते. सर्व प्रकारच्या जमिनीतही लागवड करता येते. साहजिकच लागवड महाराष्ट्रात तसेच भारतात बहुतांश ठिकाणी आढळून येते. महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, नगर, ठाणे, उस्मानाबाद, परभणी, औरंगाबाद, नागपूर, वर्धा व अन्य जिल्ह्यांत अल्प प्रमाणात दिसून येते.
  • सध्या या पिकाखालील क्षेत्र विखुरलेले आहे. या फूलपिकाला बाजारात मोठी मागणी आहे. प्रामुख्याने देवपूजा व हार, माळा तयार करून सजावटीसाठी फुलांचा उपयोग होतो. विशेषतः सणासुदीच्या काळात, उन्हाळी हंगामात जेव्हा अन्य फुलांची बाजारात कमतरता असते, त्या वेळी या फुलांना मोठी मागणी असते. बाजारातील मागणीचा विचार करून गलांडाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो. 
  • लागवड तंत्रज्ञान  :  जमीन :  गॅलार्डिया पीक जमिनीच्या बाबतीत विशेष चोखंदळ नाही. परंतु, चांगल्या व अधिक उत्पादनासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. ज्या जमिनीचा सामू पाच ते आठच्या दरम्यान आहे, अशा जमिनीत लागवड करावी. पाण्याचा निचरा न होणारी, खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य असते.

    हवामान :  अतिपावसाळा आणि कडाक्‍याची थंडी या पिकाला मानवत नाही. गॅलार्डियाच्या चांगल्या वाढीसाठी व दर्जेदार उत्पादनासाठी २० ते ३५ अंश सें. तापमान उपयुक्त ठरते. हे पीक काटक असल्यामुळे वर्षभर जरी घेता येत असले तरी त्यास उष्ण व दमट हवामान चांगले असते. 

    प्रकार व जाती :  गॅलार्डिया पिकाचे दोन प्रकार आहेत 

  • पिक्‍टा : पिक्‍टा प्रकाराची फुले एकेरी, परंतु मोठ्या आकाराची असतात. या प्रकारात इंडियन चीफ रेड व पिक्‍टा मिक्‍स्ड जाती आहेत. 
  • लॉरेझियाना :  या प्रकारातील फुले मोठी व डबल असतात. उदा. डबल मिक्‍स्ड्‌, सनशाईन गेईटी, डबल रेट्रा फिएस्टा.
  • गॅलार्डिया ग्रॅंडीफ्लोरा : प्रकारातील झाडे बहुवर्षायू असून पिवळसर, लाल व केशरी रंगाची मोठी फुले लागतात. या प्रकारात सनगॉड, गोब्लील, वॉरियर, डॅझलर आदी जातींचा समावेश होतो.
  • लागवड तंत्रज्ञान :

  • गॅलार्डियाची लागवड बियांपासून करतात. प्रथमतः रोपे तयार करावी लागतात. सर्वप्रथम एक मीटर रूंद व १५ ते २० सेंमी उंचीचे आवश्‍यक त्या लांबीचे वाफे तयार करून घ्यावेत. वाफ्यावर बी ओळीत पेरावे. दोन ओळींत १० ते ५ सेंमी अंतर ठेवून बी मातीत एक ते दीड सेंमी खोल पेरावे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.
  • उगवण चांगली व्हावी म्हणून बी कोमट पाण्यात एक तास भिजवून बियांना कार्बेन्डाझीम तीन ग्रॅम प्रतिकिलो प्रमाणात चोळावे. त्यानंतर पातळ पेरणी करावी. उगवणीनंतर रोपांना पाच ते सात पाने आल्यानंतर रोपे लागवडीस तयार होतात. यासाठी साधारणतः चार ते पाच आठवड्यांचा कालावधी लागतो.
  • प्रतिहेक्‍टरी लागवडीसाठी चांगले साठवलेले २०० ते २५० ग्रॅम बियाणे पुरेसे होते. लागवडीसाठी ताजे व निरोगी बियाणे वापरावे. कारण चांगल्या साठवलेल्या गॅलार्डियाच्या बियाण्यांची उगवण क्षमता वर्षभर असते.
  • लागवड हंगाम : 

  • गॅलार्डियाची लागवड सरी वरंबे अथवा सपाट वाफ्यांवर करतात. यासाठी प्रथम जमीन उभी- आडवी नांगरून भुसभुशीत करून वाफे तयार करावेत. जमीन तयार करताना हेक्‍टरी ३० ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
  • पाण्याची उपलब्धता असल्यास गॅलार्डियाची लागवड वर्षभर केव्हाही करता येते. मात्र, सातत्याने फुलांचा वर्षभर पुरवठा करण्यासाठी एप्रिल, ऑगस्ट व ऑक्‍टोबर महिन्यात लागवड करावी. हंगाम व जमिनीच्या मगदुरानुसार लागवड ६० बाय ४५ सेंमी किंवा ६० बाय ३० सेंमी अंतरावर करावी.
  • पावसाळी हंगामासाठी जून- जुलै, रब्बी हंगामात ऑक्‍टोबर तर उन्हाळी हंगामासाठी लागवड फेब्रुवारी महिन्यात करावी.
  • खते, सिंचन व आंतरमशागत : 

  • लागवडीच्या वेळी हेक्‍टरी ५५ किलो युरिया, १५७ किलो सुपर फॉस्फेट व ४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. तसेच लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी हेक्‍टरी ६५ किलो युरियाचा दुसरा हप्ता खुरपणीनंतर द्यावा. पाऊस नसेल तर लागवडीनंतर ताबडतोब पाणी द्यावे.
  • उन्हाळी हंगामात लागवडीनंतर तीन ते चार दिवसांच्या अंतराने पाण्याच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. लागवड केल्यापासून पाच ते सहा आठवड्यांनी खुरपणी करावी.
  • हंगामानुसार व जमिनीच्या मगदुराप्रमाणे हिवाळ्यात १० ते १५ दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात पाच ते सात दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. लागवडीनंतर दुसऱ्या पाण्याच्या पाळीवेळी रोपे मेलेल्या जागी पुन्हा रोपे लावावीत. 
  • फुलांची काढणी व उत्पादन : 

  • गॅलार्डियाच्या पूर्ण उमललेल्या फुलांची काढणी केली जाते. फुलांना १५ ते २० सेंमी लांब दांडे ठेवून अथवा दांडेविरहित सुट्या फुलांची काढणी करता येते. सुटी फुले करंडीत अथवा गोणीत भरून बाजारात पाठवतात. तर लांब दांड्याच्या प्रति १० ते १५ फुलांच्या जुड्या बांधून विक्रीसाठी पाठवतात. हंगामानुसार गॅलार्डियाला लागवडीनंतर दोन-अडीच महिन्यांत फुले येण्यास सुरवात होते.
  • फुलोरा आल्यापासून २० ते २५ दिवसांत काढणी सुरू होते. एकदा उत्पादन सुरू झाले, की पुढे अडीच महिने ते सुरू राहते. फुलांची काढणी सुरू झाली, की झाडाला सतत नवीन फूट व फुले येत राहतात. त्यामुळे काढणी काळात पिकाची काळजी घ्यावी लागते. फुलांचे उत्पादन वाढवण्यासाठी काढणी काळात झाडावर एक टक्का युरियाची फवारणी करावी.
  • फुलांचा हंगाम जसजसा कमी होत जातो, तसतसा फुलांचा आकारही कमी होतो. अशा वेळी फुलांची प्रत व आकार सुधारण्यासाठी झाडावर नॅप्थील ॲसेटीक ॲसिड (एनएए) या संजीवकाची १० पीपीएम तीव्रतेची फवारणी करावी. सुधारित तंत्राचा वापर करून वाढवलेल्या गॅलार्डिया पिकापासून साधारणपणे हेक्‍टरी चार ते पाच टन फुलांचे उत्पादन मिळते.
  • पीक संरक्षण : 

  • गॅलार्डिया पिकाला विशेष करून रोग-किडींचा प्रादुर्भाव होत नाही. तरीही पिकाच्या वाढीच्या व फुलोऱ्याच्या काळात काही रोग-किडींचा प्रादुर्भाव आढळतो. पावसाळ्यात मर रोग व हिवाळ्यात मावा कीड आढळून येते. मर रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम एक टक्के द्रावणात रोपांची मुळे बुडवून लागवड करावी.
  • पावसाळ्यात शेतात पाणी साठून राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. शेतांमध्ये हा रोग आढळून आल्यास कार्बेन्डाझीमचे द्रावण रोपांच्या बुंध्याला शिफारसीनुसार ओतावे. शिफारसीनुसार फवारणीही करावी. मावा किडीचे नियंत्रण शिफारसीनुसार करावे.  
  • संपर्क : डॉ. सतीश जाधव , बळवंत पवार, ०२०- २५६९३७५० (लेखक अखिल भारतीय समन्वयीत पुष्पसुधार प्रकल्प, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथे कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com