ग्लॅडिओलस लागवड तंत्रज्ञान

 ग्लॅडिओलस लागवड तंत्रज्ञान
ग्लॅडिओलस लागवड तंत्रज्ञान

ग्लॅडिओलस फुलाचे महत्त्व :  लांब दांड्याच्या फुलांमध्ये ग्लॅडिओलस हे अतिशय महत्त्वाचे व्यापारी फूलपीक आहे. दांड्यावर क्रमश: उमलत जाणारी आकर्षक फुले हे या पिकाचे खास वैशिष्ट्य. अनेक रंगछटांच्या विविध जातींमध्ये जगभर उपलब्ध होणारे हे फूल महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली आहे. प्रामुख्याने गुच्छ तयार करण्यासाठी आणि सजावटीसाठी पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतून या फुलाला वर्षभर मागणी असते. ग्लॅडिओसच्या फुलांना बाजारात वर्षभर मागणी असते. 

पीक वाढीसाठी अनुकूल स्थिती :  खरेतर ग्लॅडिओलस हे रब्बी हंगामातील पीक आहे; परंतु आपल्या हवामानात कडक उन्हाळा आणि जोमदार पावसाचा काळ वगळता वर्षभर त्याची लागवड करता येते. तसे पाहता ग्लॅडिओलस लागवडीचे खरीप आणि रब्बी हे दोन प्रमुख हंगाम आहेत; परंतु महाबळेश्‍वरसारख्या अति पावसाच्या; परंतु थंड हवामानाच्या ठिकाणी सौम्य उन्हाळा असल्याने अशा ठिकाणी उन्हाळ्यातही हे पीक घेणे शक्‍य होते. 

लागवड तंत्रज्ञान :  हवामान : ग्लॅडिओलस पिकात फुलाला आकर्षक रंग येणे महत्त्वाचे असते. यासाठी २० ते ३० अंश से. तापमान असणे अतिशय गरजेचे असते. या तापमानात पिकाची वाढ चांगली होते. पिकाच्या वाढीसाठी थंड, कोरडे आणि कमी पावसाचे हवामान अनुकूल असते. कडक उन्हाळा आणि जोराचा पाऊस या पिकाला मानवत नाही.

जमीन :  ग्लॅडिओलसच्या बाबतीत उत्पादनाच्या दोन बाजू आहेत. एक म्हणजे फुले आणि दुसरे कंदांचे उत्पादन. त्यामुळे जमीन निवडताना फुले आणि कंदांच्या उत्पादनासाठी चांगली अनुकूल असलेली जमीन निवडावी. त्या दृष्टीने सुपीक, पोयट्याची, मध्यम ते भारी जमीन अनुकूल असते. अशा जमिनी पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या असाव्यात.

लागवड :  प्रथम जमीन नांगरून कुळवून भुसभुशीत करावी. जमीन तयार करताना हेक्‍टरी ५० ते ६० टन शेणखत मिसळावे आणि सरी वरंबे तयार करावेत. रानबांधणी करताना हेक्‍टरी प्रत्येकी २०० किलो स्फुरद आणि पालाश मातीत मिसळावे. सरी वरंब्यावर ४५ बाय १५ सेंमी अंतरावर कंदांची लागवड करावी. काही ठिकाणी सपाट वाफ्यातही ३० बाय २० सेंमी अंतरावर लागवड केली जाते.

कंदाची निवड :    लागवडीसाठी कंदांची निवड करणे महत्त्वाचे आहे. त्यावरच उत्पादन अवलंबून असते. सारख्या आकाराचे दोन ते तीन इंच व्यासाचे ३० ते ३५ ग्रॅम वजनाचे निरोगी कंद निवडावे. हे कंद शीतगृहात तीन महिने पूर्ण विश्रांती दिलेले असावेत.

विश्रांती दिलेले कंद म्हणजे काय? : ग्लॅडिओलसचे कंद आपण बियाणे म्हणून वापरतो. ते कंद जमिनीतून काढल्यानंतर ताबडतोब लागवडीसाठी उपयुक्त नसतात. कारण ते त्वरित उगवत नाहीत. ते सुप्तावस्थेत असतात. कंद उगवणीसाठी तयार व्हावेत म्हणून म्हणजेच त्यांची सुप्तावस्था नष्ट व्हायला हवी, म्हणून काढणीनंतर निवडक कंद शीतगृहात ठेवतात. तेथे तीन ते पाच अंश सेल्सियस तापमानाला तीन महिने साठविलेल्या कंदांची सुप्तावस्था मोडते. असे कंद बाहेर काढू दोन ते तीन दिवसांनी त्यावर प्रक्रिया करून लागवड करावी. लागवड केल्यानंतर कंदकूज होऊ नये म्हणून लागवडीपूर्वी कंदांवर रासायनिक प्रक्रिया करावी. त्यासाठी कॅप्टन तीन ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणात कंद २०-२५ मिनिटे बुडवावेत व नंतरच लागवड करावी. जाती :  योग्य जातींची निवड फार महत्त्वाची असते. ग्लॅडीओलसच्या ३० हजारांहून अधिक जाती प्रचलित आहेत. ज्या जातीच्या फुलदांड्याला आकर्षक रंगाची, मोठ्या आकाराची किमान १४ ते १६ पेक्षा अधिक फुले लागतात. अशी जात तसेच रोगाला प्रतिकार करणारी जात निवडावी. रंगांनुसार सांगायचे, तर फिकट गुलाबी रंगाची सुचित्रा, लाल रंगाची पुसा सुहागन, निळ्या रंगाची ट्रॅपिक सी, पिवळसर रंगाची सपना, गर्द गुलाबी रंगाची नजराना, पिवळ्या रंगाची यलो स्टोन, तसेच पांढरी व केशरी रंगाचीही जात आढळते. याशिवाय महात्मा फुले कृषी विद्यापीठानेही फुले गणेश-पिवळसर, फुले निलरेखा, फुले प्रेरणा आणि जांभळट गुलाबी रंगाची फुले तेजस या जाती संकरीत जाती विकसित केल्या आहेत.

उत्पादन व पॅकिंग :  पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी आंतरमशागत महत्त्वाची आहेच. शिवाय पिकाला भर देणे, खते-पाणी व्यवस्थापन आणि रोग-किडींचे नियंत्रण हे घटकही तितकेच महत्त्वाचे आहेत. एकूण व्यवस्थापनातून प्रतिहेक्‍टर क्षेत्रातून दीड लाख ते अडीच लाख फुलदांडे मिळतात. प्रतवारीनुसार प्रति १२ फुलदाड्यांची एक जुडी बांधून वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून बांबूच्या अथवा कागदी खोक्‍यात पॅक करावी. त्यानंतर ही फुले विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवावीत.   पीक संरक्षण :  ग्लॅडिओलस पिकात मररोग किंवा कंदकूज रोग आढळून येतो. हा बुरशीजन्य रोग रोगट कंद लागवडीसाठी वापरल्यामुळे होतो. अशा कंदाची उगवण होत नाही किंवा झालीच तर ते लगेच पिवळे पडून मरून जातात. या रोगाची जमिनीतील बुरशीमुळे लागण झाल्यास झाडाची पाने पिवळी पडून झाडाची वाढ खुंटते. परिणामी झाड मरते. उपाययोजना म्हणून लागवडीपासून काळजी घ्यावी. लागवडीसाठी निरोगी कंद वापरावेत. शिवाय कंदांवर कॅप्टन या बुरशीनाशकाची शिफारसीनुसार प्रक्रिया करून लागवड करावी. त्यानंतरही बुरशीनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. किडींच्या बाबतीत सांगायचे तर पाने कातरणाऱ्या अळीचा प्रार्दुभाव आढळतो. ही कीड जमिनीलगत रोपे कातरते. खोडाला छिद्र पाडते. मोठ्या पानांच्या कडा खाते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जमिनीत फोरेट (१० जी) हे हेक्‍टरी २० किलो प्रमाणात मिसळावे. उगवणीनंतर या किडीचा प्रार्दुभाव आढळल्यास कार्बारील (१० टक्के पावडर) हेक्‍टरी २० किलो या प्रमाणात सकाळी पिकावर धुरळावी.

बीजोत्पादन :  ग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी पूर्ण वाढलेले कंद वापरले जातात. कंदांच्या निर्मितीसाठी विशेष काळजी घ्यावी लागते. फुलदांडे काढल्यानंतर पिकाला वेळेवर पाणी देऊन कंद काढावेत. कारण फुलदांडे काढणीनंतर कंदांच्या पोषणास सुरुवात होते. दांडे काढून राहिलेल्या पानांवर पोषण अवलंबून असते. त्यामुळे कमीत कमी चार पाने झाडाला राहतील अशा पद्धतीने दांडांची काढणी करावी. ही पाने पिवळी पडून वाळू लागल्यावर तोडावीत. पीक पूर्ण वाळून गेल्यावर कंदांची काढणी करावी. जमिनीतून खोदून कंद काढावे. पूर्ण वाढलेले आणि छोटे कंद वेगळे ठेवावेत. पुढील वर्षी पूर्ण वाढलेले कंद फुलदांड्यांसाठी वापरावेत. छोटे कंद निर्मितीसाठी वेगळे लावावेत. छोट्या कंदांपासून पूर्ण वाढलेला कंद निर्माण व्हायला तीन वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे कंद साठवणुकीत त्यांची विशेष काळजी घ्यावी.

कंदांची साठवणूक :  जमिनीतून कंद काढल्यानंतर ते दोन ते तीन आठवडे सावलीत सुकवावेत. त्यानंतर शिफारस केलेल्या रसायनाची प्रक्रिया त्यावर करावी. त्यानंतर ते शीतगृहात तीन ते पाच अंश से. तापमानात साठवून ठेवावेत. अशाप्रकारे तीन महिने साठवलेले कंद पुन्हा लागवडीसाठी वापरावेत. संपर्क : डॉ. सतीश जाधव, ०२०- २५६९३७५० (लेखक अखिल भारतीय समन्वयीत पुष्पसुधार प्रकल्प, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथे कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com