हलक्या पावसाची शक्यता, भुरी नियंत्रणाकडे लक्ष द्यावे

अनेकांच्या द्राक्ष बागेमध्ये पॉली आच्छादनाची सोय असली तरी प्लॅस्टिक काढून ठेवलेले आहे. शक्य असल्यास ते त्वरित लावून घेतल्यास येत्या पावसामध्ये बागेचा बचाव करणे शक्य होईल.
अनेकांच्या द्राक्ष बागेमध्ये पॉली आच्छादनाची सोय असली तरी प्लॅस्टिक काढून ठेवलेले आहे. शक्य असल्यास ते त्वरित लावून घेतल्यास येत्या पावसामध्ये बागेचा बचाव करणे शक्य होईल.

सर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या सोमवारपासून (ता. ५) पुढील आठ ते दहा दिवस वातावरण मोठ्या प्रमाणात ढगाळ राहणार आहे. त्यामुळे सध्याचे ३० अंशांवर असलेले दुपारचे तापमान बऱ्याच वेळा खाली जाण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमान सर्वसाधारणपणे वाढलेले असेल, ज्या ठिकाणी जास्त ढगाळ वातावरण असेल, तिथे ते १७ -१८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकेल.

पावसाची जास्त शक्यता नाही. मात्र येत्या मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळी (ता. ५ किंवा ६) सर्व द्राक्ष विभागांमध्ये कमी जास्त प्रमाणात रिमझिम किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. औरंगाबाद विभागात पावसाचे प्रमाण जास्त असू शकेल. पाऊस होणाऱ्या ठिकाणी नेहमीप्रमाणे पहाटेची आर्द्रता वाढेल. २२ ते २४ तारखेनंतर पुन्हा सर्व द्राक्ष विभागांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्याचे नेमके प्रमाण आताच सांगणे कठीण आहे. परंतु तमिळनाडूच्या काही भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असल्यामुळे त्याचे परिणाम काही दिवसांत द्राक्ष विभागांमध्ये पावसाची शक्यता निर्माण करू शकतात. ढगाळ वातावरण, हलका पाऊस, त्यामुळे वाढणारी आर्द्रता या सर्व गोष्टी भुरीच्या प्रादुर्भावाचे संकेत देतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशके वापरण्याची वेळ निघून गेलेली आहे. बऱ्याच ठिकाणी आंतरप्रवाही बुरशीनाशके विशेषतः ट्रायअझोल जातीतील किंवा टॅब्युलेरीन जातीतील बुरशीनाशके कमी जास्त प्रमाणामध्ये प्रतिकारशक्ती तयार झालेली असल्यामुळे भुरीचे अपेक्षित नियंत्रण देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वापरावर अवलंबून राहणे भुरीच्या नियंत्रणासाठी धोक्याचे आहे. छाटणीनंतर सत्तर दिवसांच्या पुढे असलेल्या बागेमध्ये भुरीसाठी शिफारशीत कोणतेही आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरल्यास त्याचे उर्वरित अंश विश्लेषणामध्ये निश्चित दिसतील. फक्त मायक्लोब्युटॅनिल व मेट्राफेनॉन या बुरशीनाशकांचा वापर केल्यास या दोन्हीही बुरशीनाशकांची एमआरएल ही तुलनेने जास्त असल्यामुळे उर्वरीत अंश एमआरएलपेक्षा कदाचित कमी राहू शकतील. या सर्वांचा विचार करता ज्या बागा सत्तर दिवसांच्या पुढे असतील, त्यांनी आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर शक्यतो टाळावा. त्या ऐवजी भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यूजी) ६०० ते ८०० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात चांगल्या फवारणीयंत्राद्वारे वापरणे जास्त फायदेशीर ठरू शकेल. भुरीच्या नियंत्रणासाठी डाग न येता बुरशीनाशक कसे वापरायचे या बद्दलची सविस्तर माहिती व व्हिडिओ फिल्म राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या वेबसाइटवर मिळू शकेल. वातावरणामध्ये आर्द्रता जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे भुरीच्या जैविक नियंत्रणासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता वाढेल. ट्रायकोडर्मा, अॅम्पिलोमायसिस हे दोन्ही बुरशीजन्य घटक पाच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात वापरल्यास जास्त आर्द्रतेमध्ये चांगले काम करतात. तसेच सध्याच्या वाढत्या तापमानामध्ये बॅसिलस सबटिलीस दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात हा जिवाणूसुद्धा जास्त चांगले काम करू शकेल. शून्य रेसिड्यूच्या संदर्भात आम्ही चालू ठेवलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये आतापर्यंतच्या निरीक्षणानुसार वेगवेगळ्या आंतरप्रवाही बुरशीनाशकांच्या वापराने मिळालेल्या भुरीच्या नियंत्रणापेक्षा फक्त सल्फर व जैविक नियंत्रक घटक वापरलेल्या वेलीमध्ये जास्त चांगले भुरीचे नियंत्रण मिळालेले आहे. द्राक्ष मण्यांतील क्रॅकिंग टाळण्यासाठी...

  • वातावरणामधील आर्द्रता वाढलेली असल्यामुळे वेलीमधून होणारे बाष्पीभवन कमी होते. त्यामुळे झाडाला लागणारी पाण्याची गरजसुद्धा कमी होते. जवळपास असलेल्या केव्हीके किंवा प्रगत शेतकऱ्यांच्या बागेमध्ये असलेले पॅन इव्हपोरीमीटरद्वारे बाष्पीभवनाच्या वेग निश्चित जाणून घ्यावा. त्यानुसार सिंचनासाठीचे पाणी कमी करून द्यावे. वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेमध्ये प्रति मि.लि. बाष्पोत्सर्जनासाठी किती पाणी द्यावे लागते, याची माहिती एनआरसीच्या वेबसाइटवर दिलेली आहे. त्याचा उपयोग करणे अतिशय आवश्यक आहे. वाढती साखर असलेल्या मण्यामध्ये पावसाच्या दिवसामध्ये सिंचनाद्वारे पाणी योग्य प्रमाणात ठेवल्यास वेलीवर होणारी क्रॅकिंग कमी होऊ शकेल.
  • तयार झालेल्या मण्यामध्ये पावसामुळे किंवा जमिनीतून दिलेल्या जास्त पाण्यामुळे जास्त पाणी मण्यात येते. ते पाणी सामावून घेण्याची शक्ती मण्याच्या सालीमध्ये नसेल, तर मणी फुटतात किंवा क्रॅक होतात. याचा अर्थ असा, की ज्या ज्या प्रकारे मण्याच्या सालीची शक्ती वाढविता येईल, त्या घटकांचा वापर पावसाच्या दिवसांमध्ये करणे क्रॅकिंग कमी करण्यासाठी उपयोगाचे आहे.  
  • खाली काही मुद्दे नमूद करत आहोत, त्याचा योग्य वापर शक्यतेनुसार करावा. काही सुचविलेल्या उपायांमध्ये लेबल क्लेम नसलेल्या घटकांचा उल्लेख असेल, त्याचा वापर निर्यातीच्या द्राक्षामध्ये निश्चित करू नये.
  • बऱ्याच शेतकऱ्यांनी बागेवर प्लॅस्टिक लावण्यासाठी नियोजन केले होते. मागील काही वर्षांमध्ये पावसासारखे वातावरण न आल्यामुळे जवळ जवळ सर्व शेतकऱ्यांनी प्लॅस्टिक काढून ठेवलेले आहे. ज्यांच्याकडे हे प्लॅस्टिक लावण्याची व्यवस्था आहे, अशा सर्व शेतकऱ्यामध्ये बागेवर प्लॅस्टिक लावण्याचे प्रयत्न केल्यास निश्चित फायदेशीर ठरू शकेल. विशेषतः २२ -२३ तारखेनंतर पावसाची शक्यता वाढल्यास प्लॅस्टिक खाली असलेल्या काढणीस तयार होत असलेल्या बागांचे संरक्षण सोपे होऊ शकेल.
  • पावसानंतर मुळाच्या कक्षेमधील ओलावा वाढल्यास मुळे जास्त प्रमाणात प्रमाणात पाणी ओढून घेतात. हे पाणी वातावरणातील आर्द्रता जास्त असल्यामुळे पानातून बाष्पोत्सर्जनामुळे जात नाही. जास्त साखर असलेल्या मण्याकडे वळते. त्यामुळे मण्यात जास्त पाणी होऊन क्रॅकिंगची शक्यता वाढते. या दृष्टिकोनातून खालील दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अ) पांढऱ्या मुळ्या कार्यरत असलेल्या बोदावरील भागामध्ये प्लॅस्टिक आच्छादन करून घ्यावे. या आच्छादनामुळे मुळाच्या कक्षेमध्ये जास्त पाणी जाणार नाही. दोन ओळींच्या मधील भागामध्ये एखादा चर अशा प्रकारे काढून घ्यावा, जेणेकरून पावसाचे पाणी बागेतून लवकर बाहेर निघून जाईल. ब) फळांवरती ऑर्गनिक पॉलिमर फवारल्यास मण्यावर सूक्ष्म आवरण तयार होते. या आवरणामुळे मण्याच्या सालीमध्ये क्रॅकिंग विरुद्ध जास्त प्रतिकारशक्ती तयार होऊ शकते. अशा पदार्थांची फवारणी घेतल्यास पावसाच्या दिवसामध्ये क्रॅकिंग निश्चित कमी होऊ शकेल. क) कॅल्शिअम हा घटक दोन पेशींना एकत्र बांधून घेणाऱ्या मध्यम प्रतलामध्ये (मिडल लॅमेला) असतो. कॅल्शिअम पुरेसे असल्यास मिडल लॅमेला सशक्त बनतो. त्यामुळे फळांची सालीची लवचिकता वाढते. व क्रॅकिंगची शक्यता कमी होते. म्हणून कॅल्शिअम उपलब्ध आवश्यकतेनुसार आहे, हे निश्चित करण्यासाठी कॅल्शिअम सल्फेट, कॅल्शिअम क्लोराईड यांची (५०० ते १००० पीपीएम प्रमाणात) मण्यावर फवारणी घेतल्यास फायदा होईल. सर्वसाधारणपणे अशा फवारण्या छाटणीनंतरच्या ७५ ते ८० दिवसांच्या आधी केल्यास चांगले परीणाम मिळतात. कॅल्शिअम क्लोराईड व कॅल्शिअम सल्फेट घडाच्या देठावरती उशिरा येणारी भुरी बऱ्याच प्रमाणात कमी करू शकते.
  • संपर्क : ०२०-२६९५६००१ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com