केळी बागेत आच्छादन महत्त्वाचे...

घड स्कर्टिंग बॅगने व दांडे केळीच्या पानांनी झाकल्याने उन्हाळ्यात घड सटकण्याचे प्रकारांना अटकाव घालता येतो.
घड स्कर्टिंग बॅगने व दांडे केळीच्या पानांनी झाकल्याने उन्हाळ्यात घड सटकण्याचे प्रकारांना अटकाव घालता येतो.

केळी हे पीक पाण्यासाठी फार संवेदनशील असते. उन्हाळ्यातील वाढते तापमान, उष्ण वारे यामुळे पिकाची पाण्याची गरज वाढते. तसेच उष्ण वाऱ्यामुळे पाने फाटणे, घड कोसळणे आदी दुष्परिणाम पिकात दिसून येतात. अशावेळी केळी पिकाचे नुकसान रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात.   उन्हाळ्यात केळी पिकाचे अतिउच्च तापमान, उष्ण वारा तसेच पाणीटंचाईमुळे आदी कारणांनी नुकसान हाेते. नुकसानीचे प्रकार वेगवेगळे असून त्यानुसार उपाययाेजना कराव्यात.  

पाणी व्यवस्थापन : दुष्काळी क्षेत्रात तसेच पाण्याची कमतरता असलेल्या भागात केळीला पाणी देण्यासाठी ठिबकसिंचन पद्धतीचा अवलंब करावा. ठिबकसिंचन पद्धतीने प्रचलित पद्धतीपेक्षा २५ ते ३० टक्के इतक्याच पाण्याची गरज लागते. तसेच उत्पादनातही १० ते १५ टक्के वाढ होते. मृगबाग लागवडीच्या केळीस सद्यस्थितीत २० ते २५ लिटर पाणी व मे महिन्यात ३० ते ३५ लिटर पाणी प्रतिझाड, प्रतिदिन द्यावे.  

आच्छादनाचा वापर : पाण्याची बचत करण्यासाठी तसेच बाष्पीभवन टाळण्यासाठी जमिनीवर झाडांच्या दाेन ओळीत आच्छादन पसरावे. त्यासाठी गव्हाचा भुस्सा, उसाचे पाचट, केळीची वाळलेली पाने यांचा वापर करावा. त्यामुळे पाण्याच्या बचतीबरोबर तणांचाही बंदोबस्त होतो. परिणामी आंतरमशागतीच्या खर्चात बचत होते.

बाष्प निरोधकांची फवारणी : केळीच्या पानाद्वारे मोठ्या प्रमाणात वातावरणात पाणी फेकले जाते. त्यासाठी केओलीन ८ टक्के (८० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) द्रावणाची फवारणी संपुर्ण झाडावर केल्यास पर्णोत्सर्जन कमी होऊन पाण्याची बचत होते.

ठिबकद्वारे विद्राव्य खत नियोजन : मृगबाग लागवडीची केळी सध्या घड भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यासाठी केळी बागेस ०:०:५० हे विद्राव्य खत २.५ किलो प्रतिदिवस याप्रमाणे ७५ किलो प्रतिएकर याप्रमाणे एक महिन्यात ठिबकद्वारे द्यावे.  

उष्ण वाऱ्यापासून बागेचे नुकसान : अति तापमानामुळे उन्हाळ्यात उष्ण वारे वाहतात. त्यामुळे बागेतील तापमान वाढते. तसेच वाऱ्यामुळे बागेची पाने फाटूनही बागेचे नुकसान होते. त्यामुळे बागेचे उष्ण वाऱ्यापासून संरक्षण करणे आवश्‍यक ठरते. त्यासाठी केळी लागवडीच्या वेळी बागेच्या चोहोबाजूंनी शेवरी किंवा गजराज गवताची लागवड करावी. अशी लागवड केली नसल्यास तात्पुरती उपाययोजना म्हणून तुराट्या, कापसाच्या पऱ्हाट्या, कडबा किंवा उसाचे पाचट यांचे झापड तयार करून बागेभोवती चोहोबाजूंनी लावावे.

घडांची काढणी : उन्हाळ्यात गरम हवा तसेच पाण्याची असमानता यामुळे घड बुंध्यापासून सटकतात. तसेच जास्त उन्हामुळे घडाच्या दांड्यावर काळे चट्टे पडून त्याठिकाणी दांडा मोडून घड सटकतो. त्यासाठी केळीच्या पानांच्या सहाय्याने घड दांड्यासहित झाकून घ्यावेत. किंवा पानांची पेंडी करून घडाच्या दांड्यावर ठेवावी. परिणामी घड सटकत नाही. तसेच ८० ते ९० टक्के जाळीचे ग्रीनशेड कापड घेऊन त्याने घड झाकावेत. जास्त तापमानाच्या कालावधीत केळी पिकात वाफसा राहिल्यास बागेतील तापमान कमी राहते. त्यासाठी सकाळी लवकर दोन तास व संध्याकाळी दोन तास ठिबक चालू ठेवावे. जेणेकरून केळी बाग वाफसा स्थितीत राहून बागेत थंडावा निर्माण होण्यास मदत होते.

संपर्क : आर. व्ही. देशमुख, ९४२१५६८६७४ (केळी संशोधन केंद्र, नांदेड.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com