अधिक उत्पादन, साखर उताऱ्यासाठी फुले १०,००१

फुले १०,००१ हा ऊसाचा वाण क्षारपड जमिनीतही चांगले उत्पादन देतो.
फुले १०,००१ हा ऊसाचा वाण क्षारपड जमिनीतही चांगले उत्पादन देतो.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाची नेहमीच आवश्‍यकता असते. तसेच साखर कारखानदारांनाही अधिक साखर उतारा आवश्‍यक असतो. साखर उद्योगातील या दोन्ही घटकांच्या अपेक्षा उसाचा फुले १०,००१ हा वाण पूर्ण करतो. राज्यातील विविध प्रक्षेत्रांवर घेतलेल्या चाचण्यांमध्ये या वाणाचे उत्पादन व साखर उतारा फुले ०२६५, को ८६०३२ व व्हीएसआय ४३४ या वाणांपेक्षा अधिक मिळाला आहे. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होत असताना बहुतांशवेळा त्यांना सुरवातीला कमी साखर उतारा असलेला ऊस उपलब्ध होतो. मात्र फुले १०,००१ ऊसवाणामुळे सुरवातीपासूनच अधिक साखर उतारा मिळविता येतो.

फुले १०,००१ जातीचा पूर्वेतिहास :

  • फुले १०,००१ या वाणाची फुले २६५ व एम एस ०६०२ या वाणांच्या संकरातून निर्मिती करण्यात आली आहे. सदर वाणांचा संकर हा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे करण्यात आला आहे.
  • वाणाची चाचणी सन २०१० सालापासून पूर्वहंगामी, सुरू तसेच खोडवा पिकासाठी घेण्यात आली आहे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, विभागीय ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे तसेच प्रवरानगर येथील प्रक्षेत्रांवर चाचणी घेण्यात आली आहे.
  • महाराष्ट्रात सर्वप्रकारच्या चाचण्या घेऊन वर्ष २०१६ -१७ मध्ये प्रसारित करण्यात आला आहे.
  • फुले १०,००१ वाणाची वैशिष्ट्ये :

  • हा वाण केवळ १० - १२ महिन्यातच पक्व होतो. त्यामुळे पूर्वहंगामी उसाची तोडणी व गाळप ऑक्‍टोबर - नोव्हेंबर महिन्यातच करता येते. साखर कारखान्यांचा या वेळी साखर उतारा कमी असतो. मात्र या उसामुळे गाळपाच्या सुरवातीच्या महिन्यातही साखर कारखान्यांच्या साखर उताऱ्यात वाढ होते.
  • गाळपालायक ऊसाची अधिक संख्या, उसाची जाडी चांगली व वजन जास्त असल्याने हेक्‍टरी अधिक ऊसउत्पादन व साखरउतारा मिळतो. त्यामुळे हा वाण साखर कारखाने तसेच ऊस उत्पादकांनाही फायदेशीर राहणार आहे.
  • खोडव्याची फूट व वाढ चांगली होते. त्यामुळे खोडव्याच्या उत्पादनातही भरीव वाढ मिळते. 
  • पाने हिरवीगार असून तुऱ्याचे प्रमाण अत्यल्प असते. पाचट सहज निघते त्यामुळे तोडणी करणे सुलभ जाते.
  • वाणाच्या पानांवर, तसेच देठांवर कूस नसल्याने वाढ्याचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी होतो.
  • हा वाण मध्यम ते भारी जमिनीत तसेच खारवट व चोपण जमिनीतही चांगले उत्पादन देतो.
  • पूर्वहंगामी व सुरू लागवडीसाठीही हा वाण शिफारशीत करण्यात आला आहे.  
  • उसाचे व साखरेचे उत्पादन : फुले ०२६५, को ८६०३२ व व्हीएसआय ४३४ या वाणांच्या तुलनेत उत्पादनात हेक्टरी अनुक्रमे २.०९, ११.३१ आणि ३२.७४ टक्के इतकी वाढ मिळाली आहे. तसेच साखर उताऱ्यात अनुक्रमे हेक्टरी ९.०४, १४.८७ आणि २६.०७ टक्के वाढ मिळाली आहे.

    रोग व किडींसाठी प्रतिकारशक्‍ती :

  • हा वाण मर व लालकूज या रोगांना मध्यम प्रतिकारक तसेच चाबूककाणी रोगाला प्रतिकारक आहे.
  • खोड कीड, कांडी कीड, शेंडेकीड व लोकरी मावा या कीडींचाही प्रादुर्भाव या वाणाला अत्यंत कमी होतो.
  • संपर्क : डॉ. आनंद सोळंके, ९४२२९२१८१६ (मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com