खोडव्याच्या अधिक उत्पादनासाठी सुधारित तंत्रज्ञान

खोडवा उस पिकात बुडखा छाटणी महत्त्वाची आहे.
खोडवा उस पिकात बुडखा छाटणी महत्त्वाची आहे.

उस खोडवा पिकाची जोपासना आधुनिक तंत्राने केल्यास त्याचे उत्पादन लागणीच्या ऊस उत्पादनाएवढे किंवा त्यापेक्षा जास्त मिळते. त्यासाठी पाचट आच्छादन, बुडखा छाटणी व खतव्यवस्थापन महत्त्वाचे आहे. फेब्रुवारीनंतर अधिक तापमानामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढतो, त्यामुळे खोडवा उत्पादनात लक्षणीय घट येते. त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवावा. त्याशिवाय खालील सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा.

पाचट व्यवस्थापन :

  • प्रतिएकर उसातून साधारणतः ३ ते ४ टन पाचट मिळते. त्यापासून १६ ते २० किलो नत्र, ८ ते १२ किलो स्फुरद, ३० ते ४० किलो पालाश आणि १२ ते १६ टन सेंद्रिय कर्ब जमिनीत मिसळले जाते. त्यामुळे पाचट न जाळता ते उसाच्या सरीतच आच्छादन करून कुजवावे.
  • उसाच्या बुडख्यांवरील पाचट बाजूला सारून बुडखे मोकळे करावेत. पाचट सरीमध्ये व्यवस्थित बसवून घ्यावे. त्यामुळे खोडवा व्यवस्थित फुटतो. सर्व सऱ्यांना पाणी देऊन पाचट दाबून बसवावे. त्यामुळे पाचट लवकर कुजते. अशाप्रकारे सर्व सऱ्यांमध्ये पाचटाचे आच्छादनामुळे अवर्षणातही खोडवा पीक तग धरुन राहते.  
  • खोडव्यात एक आड एक सरी तसेच पट्टा पद्धतीत पट्ट्यातही पाचटाचे आच्छादन करता येते.
  • पाचट वापरल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग घटून पाणी धारण क्षमता वाढते. पाण्याची बचत होते.
  • पाचट आच्छादनामुळे शेत तणविरहीत राहते. त्यामुळे खुरपणीच्या खर्चात बचत होते.
  • बुडखा छाटणी :

    खोडवा पिकास चांगला फुटवा येण्यासाठी लागण उसाची तोड जमिनीलगत करावी. तोडणीनंतर धारदार कोयत्याने बुडखे जमिनीलगत छाटून घ्यावेत. जमिनीवर उसाचे बुडखे राहिल्यास जमिनीजवळ असलेल्या कांडीवरील डोळे प्रथम फुटतात. परंतु, सदर कांडीस माती नसल्याने मुळ्या फुटत नाहीत. परिणामी अन्नांश कमी पडून फुटवे मरतात. जमिनीलगत बुडखे छाटल्यास फुटवे जमिनीतून येऊन मुळावाटे अन्न शोषून खोडव्यांची वाढ चांगली होती.

    बुरशी व कीटकनाशकांचा वापर : बुडखा छाटणीनंतर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक मॅलॅथिऑन ३ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात बुडख्यांवर फवारावे.

    ऊस सांधणे : उसात नांग्या पडल्यास प्लॅस्टिक पिशवी किंवा ट्रेमध्ये ऊस रोपे तयार करून नांग्या भराव्यात.

    जिवाणू व सेंद्रिय खतांचा वापर : पाचटावर प्रति एकरी ५० किलो युरिया, ५० किलो सुपर फॉस्फेट तसेच ५ किलो पाचट कुजविणारे जिवाणूखत अधिक ५०० किलो शेणखत मिसळून टाकावे.

    रासायनिक खतांचा वापर : रासायनिक खते देण्यासाठी पहारीचा वापर करावा. पहिले पाणी दिल्यानंतर ३-४ दिवसांनी वापसा आल्यानंतर रासायनिक खते द्यावीत. खतांची पहिली मात्रा उसाच्या एका बाजूस १० ते १५ सें. मी. अंतरावर आणि १०-१५ सें. मी. खोल छिद्रे घेऊन द्यावी. दोन छिद्रात १ फुटाचे अंतर ठेवावे. रासायनिक खताची दुसरी मात्रा विरुद्ध बाजूने १३५ दिवसांनी द्यावी. (तक्ता)

    पहारीने खते दिल्याने होणारे फायदे :

  • खत मुळांच्या सान्निध्यात दिल्याने पिकास त्वरित उपलब्ध होतात. हवेद्वारे खतांचा ऱ्हास होत नाही, तसेच पाण्याने वाहून जात नाही.
  • तणांचा प्रादुर्भाव कमी होउन खुरपणी खर्चात ५० ते ७० टक्के बचत होते.
  • पिकांच्या गरजेनुसार खतांची हळूहळू उपलब्धता होऊन जोमदार वाढ होते.
  • सूक्ष्म अन्नद्रव्य : सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार प्रति हेक्‍टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मॅंगेनिज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्‍स चांगल्या कुजलेल्या शेणखतात (१०ः१ प्रमाणात) १-२ दिवस मुरवून सरीत द्यावे. खोडवा पीक घेताना महत्त्वाच्या बाबी :

  • ज्या उसाचे उत्पादन एकरी ४० टनांपेक्षा जास्त व तुटणाऱ्या उसांची संख्या ४० हजारपेक्षा जास्त आहे, अशा उसाचाच खोडवा ठेवावा.
  • लागवडीचे पीक विरळ असेल तर त्या ठिकाणी प्लॅस्टिक पिशवी किंवा ट्रेमध्ये रोपे तयार करून नांग्या भराव्यात.
  • हलक्‍या, कमी खोलीच्या तसेच निचरा न होणाऱ्या क्षारवट किंवा चोपण जमिनीतील उसाचा खोडवा ठेऊ नये.
  • खोडव्यासाठी शिफारशीत जातींचाच खोडवा ठेवावा.
  • रासायनिक खत व्यवस्थापन

    अ. नं.     खते देण्याची वेळ   को-86032  को-86032  को-86032  इतर वाण इतर वाण इतर वाण
    - -      नत्र (युरिया)     स्फुरद (सिं.सु.फॉ.)     पालाश म्यु.ऑ.पो.       नत्र (युरिया)     स्फुरद (सिं.सु.फॉ.)     पालाश म्यु.ऑ.पो. 
    १)    १५  दिवसांचे आत    १५० (३२४)    ७० (४३७)    ७० (११७) १२५ (२७१)    ५८ (३६३)   ५८ (९७)
    २)    १३५ दिवसांनी    १५० (३२५)     ७० (४३७)     ७० (११७)     १२५ (२७१)        ५७ (३६३)    ५७ (९७)

    संपर्क : नारायण निबे, ८८०५९८५२०५ (विषय विशेषज्ञ, कृषिविद्या, कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com