व्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे...

व्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे
व्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे

माणगा बांबू टणक असून, भरीव असतो. विविध प्रकारच्या जमिनीत व वेगवेगळ्या वातावरणात चांगला वाढतो. हा बांबू पाणलोट, सागरी किनारपट्टी क्षेत्र आणि आदर्श कृषी - वानिकीसाठी उपयुक्त आहे. या जातीची व्यावसायिक तत्त्वावर लागवड करणे शक्य आहे. माणगा बांबू हे जलदगतीने वाढणारे काष्ठ गवत आहे. योग्य व्यवस्थापन असल्यास चौथ्या वर्षांपासून उत्पादन मिळण्यास सुरवात होते. नैसर्गिकरीत्या माणगा बांबू (शास्त्रीय नाव ः Dendrocalamus Stocksii किंवा Oxytenanthera Stocksii / Pseudoxytenanthera Stocksii ) मध्य पश्‍चिम घाटात आढळतो. महाराष्ट्रात चिवा, माणगा, कर्नाटकात सिमे, बिदरू, गोव्यात कोंडया आणि केरळमध्ये ओविये या स्थानिक नावांनी ओळखला जातो. माणगा बांबूची परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता चांगली असल्याने उष्ण दमट (जास्त पर्जन्यमान आणि आर्द्रता असलेल्या) कटिबंधामध्ये चांगल्या प्रकारे येतो. यास निचरा होणारी गाळाची खोल जमीन मानवते. काटेविरहीत, सुटसुटीत येणाऱ्या काठ्या जोडण्यास व व्यवस्थापनास सुलभ असतात.   माणगा बांबू १० ते १२ मीटर उंच, टोकाशी सरळ, जास्त फांद्या नसलेला, अणकुचीदार लहान पाने, पिवळट हिरव्या रंगाचा ताठ, मजबूत आणि चांगला भरीव असतो. पेरातील अंतर १५ ते ३० सें. मी. असून व्यास साधारणतः २.५ ते ६ सें. मी. असतो. माणगा बांबूचे गुणधर्म, वैशिष्ट्य, उपयोग आणि उपलब्धता लक्षात घेऊन नॅशनल बांबू मिशनने व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त अशा १६ प्रजातीमध्ये माणगा बांबूचा समावेश केला आहे.

बाह्य गुणधर्म

  • काठीची उंची साधारणतः १०-१२ मीटरपर्यंत वाढते. बुंध्याच्या व्यास २.५ ते ६ सें. मी. व पेराची रुंदी १५-३० सें. मी. पूर्ण विकसित काठी नवीन काठीच्या तुलनेत केसरहीत हिरवीगार गुळगळीत असते. तर नवीन काठीही पांढऱ्या किंवा राखाडी रंगाची आणि दाट केसांनी आच्छादित असते.
  • विकसित काठी ही हिरव्या रंगाची सुटसुटीत वाढलेले आणि काटेविरहीत असते. साधारणतः काठी बुंध्यात घन असते. (साधारणतः सहाव्या ते सातव्या पेरापर्यंत) किंवा इतर बांबूपेक्षा अर्ध्यापेक्षा अधिक उंचीपर्यंत ही घन असू शकते.
  • काठीचा पोकळपणा हा वरच्या भागात अधिक ठामपणे दिसून येतो.
  • पाने साधारणतः १०-२० सें. मी. लांब, १-२ सें. मी. रुंद गोलाकार लांबूडकी आणि बुंध्यात लहान (२ मिमी) असतात. या प्रजातीत सहसा अधूनमधून घडणारा अनियमित (एकांडी) फुलोऱ्याचा प्रकार आढळून येतो.
  • व्यवस्थापन आणि काढणी

  • सुरवातीच्या काळात तणाच्या प्रादुर्भावानुसार १ ते २ वेळा खुरपणी करावी.
  • स्थानिक वातावरणानुसार साधारणतः आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. रोपाच्या भोवती पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • पावसाळ्याच्या शेवटी बेटांभोवती पालापाचोळा, गवत, शेणखताची भर व आवरणामुळे जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यास व हिवाळ्यात नवीन कोंब येण्यास मदत होते.
  • बांबूला कोंब आल्यापासून तिसऱ्या वर्षी बांबू कापणीला येतो. मात्र त्याची पूर्ण वाढ चार वर्षांपर्यंत होते. चार वर्षीय बांबूचा टिकाऊपणा जास्तीत जास्त असतो.
  • बांबूचे वय चार वर्षांच्या पुढे गेल्यास तो ठिसूळ व्हायला लागतो. कमकुवत होऊन तो वाळतो.
  • साधारणतः ३ ते ४ वर्षांनंतर बेटापासून बांबू काढणीस सुरवात होते.
  • चांगली देखभाल असलेल्या बेटांकडून ३ ते ४ वर्षांनी सरासरी ८ ते १० बांबू मिळतात. ५ ते ६ नंतर १० ते १५ काठ्या प्रत्येक बेटापासून मिळू शकतात. प्रती हेक्‍टरी १०,००० काठ्या उपलब्ध
  • होतात.
  • वैशिष्ट्ये

  • प्रबळ पेरांची रचना, नैसर्गिक घनता, टिकाऊ अाणि टणक असून भरीव असतो.
  • बारीक तार सोलण्यास सुलभ असल्याने विणकामासाठी अतिशय उत्कृष्ट.
  • विविध प्रकारच्या जमिनीत व वेगवेगळ्या वातावरणात येतो.
  • लागवड, व्यवस्थापनासाठी कमीत कमी मजूर व कमी खर्च.
  • तुरळक बेटांमध्ये फुलोरा येतो, जेणेकरून संपूर्ण लागवड नष्ट होत नाही.
  • उपयोग

  • कोवळ्या कोंबापासून भाजी, विविध पदार्थ तसेच लोणचे निर्मिती.
  • विणकाम व विविध हस्तकलेच्या वस्तू बनवण्यासाठी उपयुक्त.
  • कागद आणि लगदा उद्योगात, बांधकाम, छत्रीचे दांडे, आधाराची काठी आणि लहान बोटींचे व्हल्ले, मासेमारीत मोठ्या प्रमाणावर वापर.
  • प्रबळ पेर रचना, नैसर्गिक घनता आणि चांगल्या जाडीमुळे वेताचा तुटवडा असेल तर माणगा फर्निचर उद्योगात एक पर्याय म्हणून उपयुक्त.
  • शेतीउपयोगी अवजारे बनविण्यासाठी, केळी, टोमॅटो, मिरची आणि इतर पिकामध्ये आधारासाठी मोठ्या प्रमाणावर वापर.
  • शेती तसेच घराभोवती सजवी कुंपण म्हणून उत्तम पर्याय.
  • रासायनिक प्रक्रिया करून टिकाऊपणा वाढविलेल्या मागण्या बांबूचा उपयोग घरे, हरितगृहे, उपहारगृहे बनविण्यासाठी होतो.
  • मृद संधारण, जमिनीचा कस वाढविण्यासाठी, घरगुती वापरातील अन्नधान्य ठेवण्याची टोपल्या, कणग्या बनवण्यासाठी उपयुक्त. तसेच ट्रे, तट्टे, खुराडे, सुपल्या निर्मितीसाठी उपयोगी.
  • संपर्क : डॉ. अजय राणे ७८७५४८५२२७ ( वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com