गारपीटग्रस्त मोसंबी बागेतील व्यवस्थापन

गारपीटग्रस्त मोसंबी बागेतील व्यवस्थापन

रविवार-सोमवारी (ता. ११, १२) मोसंबी उत्पादक विभागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे विशेषतः नवीन आलेल्या आंबिया बहराची फुलगळ आणि मृग बहराच्या पक्व झालेल्या फळांची गळ मोठ्या प्रमाणात झाली. या बागांमध्ये पुढील अधिक नुकसान टाळण्यासाठी खालील प्रकारे नियोजन करावे.

  • गारपिटीमुळे मार खाऊन पडलेली मृग बहराची फळे वेचून नष्ट करावीत. बुरशीजन्य रोगाचा व फळमाशीचा प्रादुर्भाव वाढून आंबिया बहराच्या लहान फळांचे नुकसान होईल.
  • गारपिटीमुळे मोडलेल्या फांद्यांची सिकेटरच्या साह्याने छाटणी करावी. त्यापूर्वी सिकेटर एक टक्का सोडिअम हायपोक्‍लोराईटच्या (१० ग्रॅम प्रतिलिटर) द्रावणाने निर्जंतुक करावे. त्यामुळे रोगाचा फैलाव कमी करता येईल.
  • गारपीटग्रस्त बागेमध्ये झाडांची पाने पूर्ण किंवा अंशतः झडण्याची शक्‍यता आहे. अशा बागेत कार्बेन्डाझिम एक ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • बागेमधील आंबिया बहराची फुलगळ आणि फळगळ मोठ्या प्रमाणात झाली असल्यास, राहिलेली फळे टिकवून ठेवण्यासाठी १.५ ग्रॅम जिब्रेलिक ॲसिड अधिक १ किलो युरिया प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • शिफारशीत खताच्या मात्रा पूर्ण कराव्यात, त्यामुळे पुढील बहर चांगला टिकविता येईल. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी ५०० ग्रॅम युरिया, २ किलो सिंगर सुपर फॉस्फेट,  ८०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश जमिनीत भरपूर ओल असताना झाडाच्या बुंध्यापासून २.५ फूट लांब द्यावे. याचबरोबर झिंक सल्फेट १२५ ग्रॅम, फेरस सल्फेट १२५ ग्रॅम, मॅग्नीज सल्फेट १२५ ग्रॅम प्रतिझाडास द्यावे. ५० किलो कुजलेले शेणखत किंवा गांडूळखत (२० किलो) किंवा लिंबोळीखत १५ किलो प्रतिझाडास द्यावे.
  • याच कालावधीत पाने पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी डायमेथोएट १.५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात फवारावे.
  • अशा वातावरणामुळे लिंबूवर्गीय फळपिकावर खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड ३० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन ६ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारावे.
  • खोडाला ६० ते ७५ सेंटिमीटरपर्यंत बोर्डोपेस्ट लावावी. खोडावर झालेल्या जखमेतून डिंक येणार नाही. तसेच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.
  • फळावर होणारे दुष्परिणाम :

  • वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे फळे सडण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर फुलगळ व फळगळ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी फळांची सडण्याची परिस्थिती ओळखून कार्बेन्डाझिम १.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा मेटॅलॅक्झिल अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • फुलगळ व फळगळ मोठ्या प्रमाणात होत असल्यास बागेतील फळे व फुले टिकवून ठेवण्यासाठी एनएए १.५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तसेच प्रत्येक झाडास ५०० ग्रॅम युरिया द्यावा.
  • संपर्क : डॉ. एम. बी. पाटील, ७५८८५९८२४२ (प्रभारी अधिकारी, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com