गारपीटग्रस्त द्राक्षबागेसाठी उपाययोजना

गारपीटग्रस्त द्राक्षबाग
गारपीटग्रस्त द्राक्षबाग

गेल्या काही दिवसांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट झाली. या विभागातील द्राक्षबागेचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले. विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये द्राक्ष लागवड सध्या जोर धरत आहे. या ठिकाणी छोट्या बागायतदारांचे बऱ्यापैकी नुकसान झाले. बागेत असलेल्या विविध स्थितीनुसार येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याविषयी माहिती घेऊ. रि-कटची बाग : बऱ्याच ठिकाणी रि-कट घेतलेल्या बागांमध्ये नवीन फुटी निघत आहे. या वेळी बागेमध्ये गारांचा मारा बसून कोवळी फूट तुटली व जखम झाली. किंवा नुकताच रि कट घेतलेल्या बागेमध्ये काडीवर गारांचा आघात झाला. या दोन्ही स्थितीमध्ये ताम्रयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यावी. जखम झालेली फूट काढून घेऊन पुन्हा नवीन फूट वाढवून घ्यावी. या वेळी बागेमध्ये तापमान आणि आर्द्रता वाढलेली असेल, याचा फायदा घेता येईल. नत्राचा पुरवठा वाढवल्यास नवीन फुटींची वाढ  करणे शक्य होईल.

जुनी द्राक्षबाग : काही बागांमध्ये फळकाढणीच्या स्थितीमध्ये गारपीट होऊन जखमा झाल्या आहेत. या बागेत मण्यामध्ये टर्गर प्रेशर वाढून मणी तडकतात. त्यातून रस बाहेर येतो. त्याकडे किडी व माश्या आकर्षित होतात. त्याच बरोबर बागेमध्ये वाढलेल्या आर्द्रतेमुळे मार लागलेले द्राक्षघड सडायला सुरवात होईल. यामध्ये सर्वच द्राक्षघड खराब झालेले नसतील. अशा स्थितीमध्ये बागेत जमिनीवर कीटकनाशकाची फवारणी उपयुक्त ठरू शकते. या कीटकनाशकाच्या वासामुळे द्राक्षघडावरील किडी व माश्यांचा प्रादुर्भाव थोडाबहुत कमी होऊ शकतो. वेलीवरील द्राक्षघडावर जैविक नियंत्रण घटकाची (उदा. ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे) आवश्यकतेनुसार एक ते दोन फवारणी घ्यावी. यामुळे बागेतील बागेतील पुढील प्रसार थांबेल.

बेदाणा निर्मिती : बेदाणा तयार होत असलेल्या भागामध्ये गारपीट झालेली नाही. परंतु, काही प्रमाणात पाऊस किंवा ढगाळ वातावरण झाले. अशा बागेमध्ये वातावरणातील आर्द्रता वाढली. बेदाणा तयार करतेवेळी जास्त तापमान आणि कमी आर्द्रता या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

  • वाढलेल्या आर्द्रतेमुळे बेदाणा तयार होण्यास उशीर होईल.
  • काही परिस्थितीमध्ये बेदाण्याला नैसर्गिक रंग मिळण्याऐवजी लालसर ते काळपट होण्याची शक्यता आहे.
  • यावर उपाय म्हणून बेदाणा शेडमध्ये वारे वाहत असलेल्या दिशेने हवेचा प्रवाह पुढे जाईल, अशा प्रकारे पंखे लावल्यास फायदा होईल.
  • ज्या शेडमध्ये बेदाणा काळा पडत आहे, तिथे सल्फरचे कमी मात्रेमध्ये फ्युमीगेशन करून एक सारखा रंग मिळवता येईल.
  • टीप : द्राक्षामध्ये कीडनाशक व संजीवकांचा वापर करण्यापूर्वी त्यांचे अवशेष राहण्याचा धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ज्ञांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा. बेदाणा निर्मितीतील फ्युमिगेशन प्रक्रियेपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

    संपर्क : डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०- २६९५६०६० (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com