शेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवड

शेवंती लागवडीसाठी काश्‍यांचा वापर करावा.
शेवंती लागवडीसाठी काश्‍यांचा वापर करावा.

शेवंती लागवडीसाठी जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. लागवडीसाठी ४५ ते ५० दिवस वयाच्या रोपांची व अधिक उत्पादनक्षम जातींची निवड करावी. सरीच्या दोन्ही बगलांमध्ये संध्याकाळच्या वेळी लागवड करावी. शेवंती पिकाच्या देशी व विदेशी अशा दोन प्रकारच्या जाती अाहेत. आपल्या भागात ज्या जातींच्या फुलांना मागणी असते त्यानुसार निवड करावी.

पूर्वमशागत : लागवडीपुर्वी एकवेळा नांगरट करून उभी - आडवी कुळवणी करावी. दुसऱ्या कुळवणीपूर्वी हेक्‍टरी २५-३० टन शेणखत मिसळावे. तयार जमिनीत ६० सें.मी. अंतरावर सरी सोडावी. सरीच्या बगलेत दोन्ही बाजूस ३० सें.मी. अंतरावर रोपांची लागवड करावी. लागवडीसाठी निरोगी व जोमदार वाढीची रोपे किंवा काश्‍या वापराव्यात. लागवड संध्याकाळच्या वेळी करावी. लागवडीनंतर २-३ दिवसांनी आंबवणीसाठी पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीचा मगदूर व हंगामानुसार ५-७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

खते : हेक्‍टरी नत्र ३०० किलो, स्फुरद २०० किलो व पालाश २०० किलो अशी खत मात्रा द्यावी. संपूर्ण स्फुरद, पालाश व अर्धे नत्र लागवडीवेळी द्यावे. लागवडीनंतर दीड-दोन महिन्यांनी उर्वरित नत्र द्यावे.

पाणी व्यवस्थापन : उन्हाळ्यात ५-७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पावसाळ्यात आवश्‍यकता भासल्यास आणि हिवाळ्यात १०-१२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पिकात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

आंतरमशागत : पीक तणमुक्त ठेवावे. निंदणी करताना रोपांना मातीची भर द्यावी म्हणजे फुलांच्या ओझ्याने झाड कोलमडून पडत नाही.  लागवडीपासून २-३ आठवड्यांनी सरळ वाढणारा शेंडा खुडावा. शेंडा खुडल्याने बगलफुटी फुटतात. बगल फुटीच्या चांगल्या वाढीनंतर (लागवडीपासून ७-८ आठवड्यांनी) शेंडे खुडावेत. त्यामुळे झाडाची भरगच्च वाढ होते.

अभिवृद्धी

  • शेवंतीची अभिवृद्धी दोन प्रकारे करता येते. सकर्स किंवा काश्‍यापासून (मुळापासून येणारे फुटवे) व छाट्यांपासून शेवंतीची अभिवृद्धी करतात. लागवडीचा हंगाम लक्षात घेऊन सकर्स किंवा छाट्यांपासून रोपे तयार करावीत.
  • फुलबहार संपल्यानंतर फेब्रुवारी - मार्च महिन्यात झाडे जमिनीपासून २० सें.मी. उंचीवर कापावीत. झाडांना पुन्हा पाणी द्यावे म्हणजे लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात सकर्स मिळतात.
  • छाटे पद्धतीने लागवडीसाठी फुलबहार संपल्यावर येणाऱ्या फुटीचे छाटे काढावेत. शेंड्याकडील ८-१० सें.मी. लांबीचे कोवळे छाटे लागवडीसाठी वापरावेत. भरपूर मुळ्या फुटण्यासाठी छाटे काढल्यानंतर छाट्याच्या बुडाकडील २-३ पाने काढून खालील बाजूचा काप कॅरॅडॅक्‍स किंवा आयबीए (इंडॉल ब्यूटिरिक अॅसिड) २००-३०० पीपीएमच्या (२०० ते ३०० मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) द्रावणात बुडवून लावावेत.
  • छाटे लावताना त्यांचा एकतृतीयांश भाग जमिनीत गाडावा. छाटे शेणखत व माती १ः१ प्रमाणात या मिश्रणाने भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत लावावेत. छाटे लागवडीसाठी ४५-५० दिवसांत तयार होतात.
  •                शेवंतीच्या विदेशी व देशी जाती  

     जाती       -   -   विदेशी
    क्र.     प्रकार     रंग     जाती
    १.     स्प्रे     पांढरा अर्कोटिक व्हाईट स्पायडर
        पिवळा सेलीब्रेट
        गुलाबी     ब्ल्यु मार्बल
    २.     स्टँडर्ड  पांढरा ग्रँड इंडिया, नॉपोलीस व्हाईट
        पिवळा ब्राईट गोल्डन ॲने
        गुलाबी     सिसेंन्ड्रा
    ३.     पॉट    पांढरा माऊंटन स्नो
        पिवळा गोल्डन क्रिस्टल
        गुलाबी     अाॅलवेज पिंक
    भारतीय जाती भारतीय जाती भारतीय जाती भारतीय जाती
    मोठ्या फुलाच्या जाती     पांढरा    स्नो बॉल, ब्युटी
        पिवळा  चंद्रमा, सूपर जायंट
    २.     लहान फुलाच्या जाती (पॉट)     पांढरा मरक्युरी
        पिवळा     अपराजिता
    ३.    लहान फुलाच्या जाती (कट फ्लाव्हर)    पांढरा बिरबल सहानी
        पिवळा सुजाता
        माऊ    अप्सरा, नीलिमा
    ४.     लहान फुलांच्या जाती (हार, वेण्या)    पांढरा शरद शोभा
        पिवळा  फ्रिडम

    संपर्क :  डॉ. सतीश जाधव, ९४०४६८३७०९ (अखिल भारतीय समन्वयित पुष्प संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com