पर्यावरण, वन्यजिवांची काळजी घ्या...
डॉ. विजयश्री हेमके
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

मानवी हस्तक्षेपामुळे आज सुमारे ४१ हजार प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत; तर काही नष्ट झाल्यादेखील आहेत. हे लक्षात घेता आपल्या परिसरातील वनसंपदा तसेच पशू, पक्षी आणि प्राण्यांच्या संवर्धनाची जबाबदारी सर्वांची आहे.

मानवी हस्तक्षेपामुळे आज सुमारे ४१ हजार प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत; तर काही नष्ट झाल्यादेखील आहेत. हे लक्षात घेता आपल्या परिसरातील वनसंपदा तसेच पशू, पक्षी आणि प्राण्यांच्या संवर्धनाची जबाबदारी सर्वांची आहे.

भारत सरकारने देशामधील वन्य प्रजाती लुप्त होऊ नयेत म्हणून १९५२ मध्ये भारतीय वन्यजीव बोर्डाची स्थापना केली. देशात सर्वप्रथम ७ जुलै १९५५ रोजी ‘वन्य प्राणी दिवस’ साजरा करण्यात आला. पर्यावरण आणि वन्य प्राण्यांबाबत जनजागृती होण्यासाठी प्रत्येक वर्षी ऑक्टोबरचा पहिला आठवडा वन्य जीव सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो.  
सृष्टीनियमानुसार मानव, पर्यावरण आणि वन्यजीव एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जोडले गेले आहेत. मात्र मानवी हस्तक्षेपामुळे आज सुमारे ४१ हजार प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, तर काही नष्ट झाल्यादेखील आहेत. उदाहरणार्थ सांगायचे झाले तर एकेकाळी भारतामध्ये मोठ्या संख्येने असणारा चित्ता हा प्राणी संपूर्णपणे नामशेष झाला आहे. मोठ्या प्रमाणावर आढळणारी गिधाडे आज दिसत नाहीत. याप्रमाणे इतर प्राणी आणि वनस्पतीदेखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे लक्षात घेऊन  पर्यावरण व वन्यजिवांना संरक्षण मिळावे म्हणून केंद्र सरकारने काही जंगल क्षेत्रांना अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानांच्या स्वरूपामध्ये घोषित केले आहे.  त्यासाठी कायदेदेखील बनविले. या कायद्याच्या माध्यमातून शिकारीस आळा घालणे; तसेच पर्यावरण व वन्यजिवांचे संरक्षण केले जाते.
वर्ष २००२ मध्ये राष्ट्रीय वन्यजीव कार्य योजना (२००२-२०१६) अमलात आणली गेली. त्यामध्ये वन्यजिवांचे संरक्षण करण्यासाठी जनतेचा सहभाग घेण्याचे ठरविले गेले. त्यानुसार योग्य पावले उचलून वन्यजिवांचे संरक्षण करण्याच्या दीर्घकालीन उद्दिष्टांची पूर्तता करणे आणि त्यासंबंधी जागृती करणे हे ध्येय ठरविले गेले. वन्यजिवांचे संरक्षण हे मानवी प्रगतीबरोबर वन्यजिवांचे व्यवस्थापन करण्याची योजना आहे.

वर्ल्ड वाईड फंड संस्थेने वन्यजिवासंबंधी २०१४ मध्ये जाहीर झालेली आकडेवारी  :

 • पृथ्वीवरील सस्तन प्राणी, पक्षी, सरीसृत, उभयचर प्राणी आणि मासे यांची संख्या १९७०- २०१२  या काळात ५८ टक्के  घसरली अाहे.  २०२० पर्यंत ही संख्या ६७ टक्यांनी घसरेल असा अंदाज आहे. ही घट वार्षिक २ टक्के या वेगाने सुरू आहे.
 • जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या संख्येत ३८ टक्के घट झाली अाहे. हे  त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे घडत आहे.
 • अधिवास नष्ट झाल्यामुळे वाघांची संख्या झपाट्याने घटली.
 • पर्यावरणासंबंधी जागृती झाल्यामुळे पृथ्वीवरील एकूण जमिनीच्या क्षेत्रफळापैकी १५ टक्के जमीन ही अधिवासात संरक्षित केली गेली आहे. समुद्री क्षेत्रफळापैकी केवळ ४ टक्के क्षेत्र अधिवास संरक्षित आहे.

वृक्ष लागवड आणि संवर्धनाची उद्दिष्टे :

 • नष्टप्राय होणाऱ्या प्रजातींबद्दल जागृती.
 • वन्यजिवांचा पाणी, जमीन, जंगल आणि वायुमंडळावर असणाऱ्या नैसर्गिक अधिकारांचा सन्मान.
 • लोकसमुदायाला निसर्गाशी जोडणे.
 • वन्यजिवांची सुरक्षा, लोकांना वन्यजिवांच्या संरक्षणासाठी प्रोत्साहन.
 • वन्यजिवांची शिकार रोखणे, त्यासंबंधी तात्काळ माहिती देणे.
 • जंगल सफारी, वनपर्यटनाच्या वेळी वन्यजिवांचा अधिवास कोणत्याही प्रकारे प्रदूषित न करणे.
 • प्राण्यांना मारून तयार केलेल्या वस्तू विकत न घेण्याबाबत जनतेमध्ये जागृती.

भारतीय वन्यजीव संस्था :

 • सरकारने भारतीय वन्यजीव संस्थेची स्थापना १९८२ मध्ये केली.
 • ही संस्था केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या आधीन एक स्वयंशासित संस्था आहे.
 • वन्यजीव क्षेत्रासंबंधीचे प्रशिक्षण; तसेच संशोधन केले जाते.
 • जंगल व प्राणी संरक्षणासंबंधी अनेक कायदे सरकारने केले असून १९७२ मध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम संमत करण्यात आला. हा एक व्यापक केंदीय कायदा असून यामुळे नष्ट होणारे वन्यजीव; तसेच अन्य नष्टप्राय प्राण्यांना संरक्षण देण्यात आले आहे.

संपर्क : डॉ. विजयश्री हेमके, ९४२१७३२६८०  
(सहायक प्राध्यापक, प्राणीशास्त्र विभाग, जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा)

इतर कृषी शिक्षण
पर्यावरण, वन्यजिवांची काळजी घ्या... मानवी हस्तक्षेपामुळे आज सुमारे ४१ हजार प्रजाती...
‘वनामकृवि‘चे बीटी वाण येत्या हंगामातनागपूर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...