द्राक्षबागेत योग्य वेळी थिनिंग करा

द्राक्षघडाचे थिनिंग
द्राक्षघडाचे थिनिंग

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात घडाचा आकार तसेच द्राक्ष मण्यांच्या आकारमानाला महत्त्व आहे. मणी आणि घडाचे आकारमान वाढविताना पाकळ्यांची विरळणी, बारीक व कमकुवत घड काढणे, वांझ फुटी काढणे महत्त्वाचे आहे. घडाचे आकारमान वाढविताना घडांमध्ये मण्यांची संख्या ५०० पेक्षा जास्त असू शकते. सर्व मणी घडावर ठेवल्यामुळे मण्यांच्या विकासात अडचण येते. मण्यांचे आकारमान लहान राहते. निर्यातक्षम द्राक्ष मण्यांचे आकारमान साधारणतः २० मि.मी. आणि देठाची लांबी १.५ द्राक्ष मणी प्रतिसें.मी. असावी. त्यामुळे सुटसुटीत घडनिर्मिती होण्यास मदत होते. किमान ४ ते ५ पानांच्या अवस्थेमध्ये जास्त फांद्या असल्यास किंवा कमी वाढ असल्यास त्या फांद्यांची विरळणी करावी. एका काडीवर दोन फांद्या ठेवाव्यात. ७ ते १० पाने आल्यास पाण्याचा ताण द्यावा. हे केल्यास घड निर्माण होण्यास सुरवात होते. वेलीच्या या अवस्थेच्या वेळी प्रतिदिन २५ हजार ते ३३ हजार लिटर पाणी आणि नत्राची ८० किलो प्रतिहेक्‍टरी आवश्‍यकता असते. वांझ फुटी काढणे :

  • घडातील पाकळ्यांचे जीएच्या साहाय्याने थिनिंग करण्याअगोदर प्रथम वांझफुटी काढून टाकाव्यात. यामुळे गर्दी कमी होऊन घडांचे योग्य पोषण होण्यास मदत होते. यामुळे घडांवर योग्य प्रकारे जीए फवारणीस मदत होते. वांझफुटी काढल्याने हवा खेळती राहते, आर्द्रता कमी होते. वेलीवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.
  • घडावर सूर्यप्रकाश नियंत्रित राहतो. घडांचे पोषण होण्यास मदत होते. कॅनॉपी कमी असल्यास वांझफुटी काढू नयेत. जेणेकरून प्रखर सूर्यप्रकाशामुळे घडांचे अथवा मण्यांचे नुकसान होणार नाही.
  • घडांची विरळणी :

  • द्राक्ष वेलींवर जास्त घड नसावेत. त्यामुळे इतर घडांचे पोषण व व्यवस्थापन योग्यप्रकारे करता येते. सुरवातीच्या काळात वेलींवर सुमारे ६० ते ७० इतके घड असतात, त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षनिर्मितीमध्ये बाधा पोचते, त्यासाठी एका फांदीवर एक घड असावा. लहान व रोगग्रस्त घड काढून टाकावेत.
  • प्रतिदीड फुटावर एकच घड असावा. त्यासाठी काड्या व घडांची विरळणी करावी.  निर्यातक्षम घड सुमारे ३५० ग्रॅम वजनाचा असावा. मण्यांचे आकारमान २० मि.मी. इतके असावे. त्यासाठी एका वेलीवर ४० ते ४५ इतकेच घड ठेवावेत.
  • घडातील पाकळ्यांची विरळणी :

  • पाकळ्यांच्या विरळणीसाठी जीएचा वापर :  मणीगळ करण्यासाठी ५० टक्के फुले उमलण्याच्या अवस्थेत ४० पीपीएम इतकी जीएची फवारणी करावी. त्यानंतर वेलीला ताण देऊ नये, कारण पाण्याचा ताण अडचणीत आणू शकतो. अशावेळी जमिनीचा प्रकार (हलका किंवा भारी जमीन) फार महत्त्वाचा ठरतो. अशा परिस्थितीमध्ये फुलगळ व्हायला लागली, की पूर्ण घड खाली होतो. हे सर्व टाळायचे असल्यास बागेला ताण बसू नये, याची काळजी घ्यावी. यासाठी जमिनीचा प्रकार व वाढीची अवस्था याचा विचार करून पाण्याचे नियोजन करावे.
  • जीएची फवारणी ही योग्य अवस्थेत न झाल्यास त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. उदा. शॉट बेरीज, लहान-मोठे मणी होणे, इत्यादी विकृती दिसून येतात. जीएच्या द्रावणाचा सामू आम्लधर्मी असावा. द्रावणाचा सामू ५.५ ते ६ पर्यंत असावा. फवारणी शक्‍यतोवर सकाळी किंवा संध्याकाळी करावी. शक्‍यतोवर युरिया फॉस्फेटची सलग फवारणी टाळावी. जेणेकरून घडाचा कडकपणा टाळता येईल.
  • जीएचा वापर करताना :

  • फुलोऱ्यानंतर जीएचा वापर विरळणी करता करू नये. अन्यथा शॉर्ट बेरीजचे प्रमाण वाढते. पाण्याचा ताण जास्त असल्यास फवारणी टाळावी. विरळणीसाठी ढगाळ वातावरणात जीएची फवारणी करू नये. कॅनॉपी प्रमाणापेक्षा जास्त असल्यास तसेच घड सतत सावलीत राहत असल्यास फवारणी टाळावी. रोग व किडीचे नियंत्रण केल्यानंतर जीएची फवारणी करावी.
  • जीएसोबत झिंक सल्फेटचा वापर करू नये. त्यामुळे शॉर्ट बेरीज होण्याचा धोका जास्त असतो. जीएच्या जास्त वापरामुळे घडाच्या देठाची लांबी वाढते आणि फुलगळ जास्त प्रमाणात होऊन घड पूर्ण मोकळा होतो. त्यासाठी जीएचा वापर संतुलित व नियंत्रित करावा.
  • कात्रीच्या साह्याने घडातील पाकळ्यांची विरळणी :

  • जीएच्या वापराने १०० टक्के विरळणी होत नसल्याने कात्रीच्या साह्याने मण्यांची विरळणी करावी. विरळणीची मात्रा पूर्ण झाल्यानंतर व मणी सेट झाल्यानंतर घडाची लांबी अधिक असेल, तर कात्रीच्या लांबीएवढा किंवा वितभर लांबी ठेवून घडाचा शेंडा खुडावा.
  • कात्रीच्या साह्याने घडाची विरळणी करत असताना पहिल्या तीन पाकळ्या सोडून चौथी, सहावी, आठवी, दहावी, बारावी आदी क्रमाने घडातील पाकळ्या मण्यांचा आकार दोन-तीन मि.मी. व्यासाचा असताना काढाव्यात.
  • बऱ्याच बागांमध्ये घडाच्या वरच्या बाजूचे मणी आकाराने लहान राहिल्याचे दिसून येते. याचे कारण म्हणजे घड बुडवणी करताना वरील बाजूचे मणी संजीवकांच्या द्रावणात पूर्णपणे बुडविले जात नाहीत. त्यामुळे त्याचे आकारमान इतरांपेक्षा लहान दिसून येते. यासाठी वरील तीन पाकळ्या काढून नंतरच्या दोन-तीन पाकळ्या एकआड एक पद्धतीने काढून टाकाव्यात.
  • साधारणतः १० ते १२ पाकळ्या घडावर असाव्यात. प्रत्येक पाकळीवर सरासरी दहा मणी ठेवल्यास १०० ते १२० मणी राहतील. घड सुटसुटीत व मोकळा होईल.
  • थोडक्‍यात पण महत्त्वाचे :

  • सध्याच्या परिस्थितीत डाउनीचा प्रादुर्भाव झालेला आहे. अशावेळी आपल्या बागेत जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पोचणे आवश्‍यक असते. आपल्या बागेतील कॅनॉपी मोकळी असावी.
  • मागच्या आठवड्यासारखे वातावरण असल्यास व फुलोरा अवस्थेच्या आधी बाग असल्यास पाकळ्यांची विरळणी करणे फायद्याचे ठरू शकते. याचे कारण म्हणजे जर घड फुलोरा अवस्थेत किंवा थोडा पुढे मागे असल्यास व अशावेळी पाऊस पडल्यास मणी गळी सोबतच मण्यांची कुज होण्याची शक्‍यता असते.  घड जर घट्ट असतील, तर डाउनीचे नियंत्रण अवघड होते. कारण घडाच्या आत डाउनीला नियंत्रित करणारे बुरशीनाशक पोचण्याची शक्‍यता कमी असते. घड मोकळा असेल तर पूर्णपणे बुरशीनाशकाचा फवारा बसतो. त्यामुळे डाउनीचे नियंत्रण होते. सोबतच पाकळ्यांची लांबी वाढून घड सुटसुटीत होण्यास मदत मिळेल. त्यामुळे पुढील अवस्था व्यवस्थितपणे पूर्ण होतील.
  • संपर्क : डॉ. एस. डी. रामटेके, ९४२२३१३१६६ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com