बचत गटातून मत्स्यपालनाला मिळाली चालना

महिला बचत गटांनी तलावामध्ये मत्स्य आणि बदकपालनातून उत्पन्न वाढविले.
महिला बचत गटांनी तलावामध्ये मत्स्य आणि बदकपालनातून उत्पन्न वाढविले.

ग्रामीण भागातील महिलांच्यापर्यंत पूरक उद्योगाचे तंत्र पोहचविण्यासाठी महिला शेतकऱ्यांसाठी संशोधन संचालनालयातर्फे उपक्रम राबविण्यात येतात. ओदिशा राज्यातील किनारपट्टीच्या भागातील महिलांसाठी मत्स्यपालन तंत्रज्ञान प्रसारासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. पुरी जिल्ह्यातील जयपूर या गावातील महिलांसाठी संचालनालयाने विशेष उपक्रम हाती घेतला.

जयपूर गावात १.५ हेक्टर क्षेत्राचा तलाव आहे. या तलावाच्या काठाने छोट्या वस्त्या आहेत. या वस्त्यांमधील महिला प्रामुख्याने मजुरी कामासाठी जात होत्या. या तलावातील कमी होणारे पाणीसाठा आणि दुर्लक्षामुळे त्यामध्ये पाणवनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. तसेच अशुद्ध पाण्यामुळे परिसरात रोगराईदेखील पसरत होती. संचालनालयातील तज्ज्ञांनी या परिसराचा अभ्यास केला. या तलावाची स्वच्छता करून परिसरातील महिलांना मत्स्यपालन करणे शक्य आहे हे लक्षात आले. तज्ज्ञांनी गावातील महिलांशी चर्चा केली. त्यांना मत्स्यशेतीचे फायदे समजावून सांगितले. मत्स्यपालनासाठी पाच महिला बचत गट तयार करण्यात आले. या गटांचा महासंघ तयार करण्यात आला. या माध्यमातून ७० महिला एकत्र आल्या. संचालनालयातर्फे महिलांना मत्स्यपालनाचे प्रशिक्षणही देण्यात आले.  प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिला गटांनी या तळ्याची स्वच्छता केली. त्यातील पाणवनस्पती काढल्या. तळ्यामध्ये मत्स्यखाद्य तयार होण्यासाठी खत मिसळले. पुरेसा पाणीसाठा झाल्यानंतर महिलांनी या तळ्यामध्ये मत्स्यबीज सोडले. त्यानंतर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मत्स्यखाद्याचाही योग्य प्रमाणात वापर केला. या महिला स्वतः सर्व कामे करत असल्याने मजुरांची गरज त्यांना भासली नाही. माशांची योग्य वाढ होताच सुधारित जाळ्यांचा वापर करून मासे तळ्यातून काढण्यात आले. पहिल्यावर्षी महिला बचत गटांनी मत्स्यपालनाच्या बरोबरीने बदक पालनदेखील केले. त्यामुळे मासे, बदक आणि बदकांच्या अंड्याच्या विक्रीतून या गटाला सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळाले. दुसऱ्यावर्षी गटातील महिलांनी मत्स्यपालनाच्या बरोबरीने कुक्कुटपालन आणि ससेपालनदेखील केले. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली. परंतु अति पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्याचा फटका मत्स्य उत्पादनाला बसला. परंतु पूरक उद्योगामुळे महिला स्वयंपूर्ण झाल्या. या यशस्वी प्रयोगानंतर महिला शेतकऱ्यांसाठी संशोधन संचालनालयाने ३५ गावांच्यामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून ७५० महिलांना एकत्र करून मत्स्यपालन तंत्रज्ञान पोचविले. त्यामुळे किनारपट्टीतील महिलांना मत्स्यपालन, मत्स्यबीज निर्मिती, प्रक्रिया उद्योगातून नवीन पूरक व्यवसायाच्या संधी तयार झाल्या.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com