भातपिकावर तपकिरी तुडतुडे, लष्करी अळीच्या प्रादुर्भावाची शक्‍यता

भातपिकावरील तपकिरी तुडतुडे
भातपिकावरील तपकिरी तुडतुडे

मुसळधार पावसानंतर सद्यस्थितीत पावसाने उघडीप दिली असल्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीमध्ये भात पिकावर तपकिरी तुडतुडे व लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते.

लष्करी अळी : प्रादुर्भावाची कारणे :

  • वाढते ऊन व आर्द्रतेचे प्रमाण यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे.
  • ज्या खाचरात पाणी नाही अशा खाचरात ही कीड येते. विशेषकरून ज्या भात रोपवाटिका वरकस जमिनीत केलेल्या आहेत तसेच हळव्या जातीची लागवड ज्या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव दिसतो.
  • प्रादुर्भावाची लक्षणे :

  • अळ्या निशाचर आहेत. दिवसा ढेकळाच्या खाली, चुडांमध्ये किंवा तणांच्या खाली लपून बसतात आणि सायंकाळी उशिरा बाहेर पडून भाताची रोपे कुरतडून खातात.
  • नियंत्रणाचे उपाय :

  • ज्या विभागामध्ये प्रादुर्भाव आढळून येत आहे, त्या ठिकाणी भातखाचरात तीन ते चार पक्षी बसण्याचे थांबे उभे करावेत. जेणेकरून पक्षी या अळ्या नष्ट करतील.
  • सकाळी किंवा सायंकाळी भातखाचरात जाऊन चूड उघडून पाहावेत. त्यामध्ये अळी/कोष प्रतिचुड १ याप्रमाणे आढळल्यास सायंकाळच्या सुमारास वारा शांत असताना तज्ज्ञांच्या शिफारशीनुसारच कीडनाशकांचा वापर करावा. या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
  • तुडतुडे : प्रादुर्भावाची लक्षणे

  • तुडतुडे व त्यांची पिले भात चुडातील बुंध्याकडील भागात लपून राहतात आणि खोडातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे रोपांची पाने पिवळी पडू लागतात.
  • उपद्रव मोठ्या प्रमाणावर असेल तर रोपे वाळतात, जळल्यासारखी दिसतात.
  • शेतात ठिकठिकाणी तुडतुड्यांमुळे करपून गेलेले गोलाकार भाताच्या पिकाचे दळे दिसतात यालाच ‘हॉपर बर्न’ असे म्हणतात. अशा रोपांना लोंब्या येत नाहीत आणि आल्याच तर दाणे न भरता पोचट राहतात. प्रादुर्भावग्रस्त पिकाचा पेंढा जनावरांना खाण्यायोग्य राहत नाही.
  • नियंत्रणाचे उपाय : (प्रतिलिटर पाणी)

  • प्रत्येक चुडात ५ ते १० तुडतुडे आढळल्यास : ॲसिफेट (७५ टक्के) २.२५ ग्रॅम किंवा फिप्रोनिल (५ टक्के) २ मि.ली. किंवा इमिडाक्‍लोप्रिड (१७.८ टक्के) ०.२ मि.ली.  
  • टिप : फवारणी करताना कीटकनाशक चुडाच्या बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी.

    संपर्क : डॉ. आनंद नरंगलकर, ९४०५३६०५१९ (कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com