agricultural news in marathi, papaya plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon

उत्तम निचऱ्याच्या जमिनीत पपई लागवड फायदेशीर
डॉ. उज्ज्वल राऊत, डॉ. देवानंद पंचभाई
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

पपई फळपिकाच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीची पूर्वमशागत करून योग्य आकारमानाचे खड्डे करावेत. गादीवाफ्यावर ठिबक सिंचन संचाचा वापर करून रोपांची लागवड करावी.

सद्यस्थितीत फेब्रुवारी - मार्च महिन्यात पपई पिकाच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. मात्र त्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे फायद्याचे ठरते.  

पपई फळपिकाच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीची पूर्वमशागत करून योग्य आकारमानाचे खड्डे करावेत. गादीवाफ्यावर ठिबक सिंचन संचाचा वापर करून रोपांची लागवड करावी.

सद्यस्थितीत फेब्रुवारी - मार्च महिन्यात पपई पिकाच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. मात्र त्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे फायद्याचे ठरते.  

हवामान :  पपईच्या वाढीसाठी उष्ण व दमट हवामानाची आवश्‍यकता असते. जोरदार वारे आणि कडक थंडी, दव आणि धुके या पिकाला हानिकारक ठरतात. तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास फळे पक्व होण्याची क्रिया थांबते. तसेच झाडाची वाढ व फळधारणेवरही प्रतिकूल परिणाम
होतो.

जमीन :  लागवडीसाठी मध्यम, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. खारवट, खोल, काळ्या जमिनीत लागवड करू नये. मुळ्या उथळ आणि ठिसूळ असल्याने योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत त्या सडतात. काही वेळा झाडे मरतात.

पूर्वमशागत : जमिनीची उभी-आडवी नांगरट करावी. कुळवाच्या ३-४ पाळ्या देऊन ढेकळे फोडून जमीन सपाट व भुसभुशीत करून घ्यावी. लागवडीसाठी सर्वसाधारणपणे १.८x१.८ मीटर अंतरावर ४५x४५x४५ सें.मी. आकारमानाचे खड्डे करावेत. प्रत्येक खड्ड्याच्या तळाशी ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक किलो निमपावडर टाकावी. त्यानंतर खड्डे माती व शेणखताच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. गादीवाफ्यावर ठिबक सिंचन संचाचा वापर करून लागवड करावी. लागवड वर्षातून तीन वेळा म्हणजे जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्‍टोबर किंवा फेब्रुवारी-मार्च महिन्यात करता येते.

पुनर्लागवड : पुनर्लागवडीसाठी ४० ते ६० दिवसांच्या रोपांची (उंची २२ ते २५ सें.मी.) निवड करावी. लागवडीपूर्वी पाणी देऊन खड्डे ओले करून घ्यावेत. त्यामुळे खत, माती मिश्रणाने भरलेले खड्डे स्थिर होऊन खाली बसतात. वाफसा आल्यानंतर लागवड करावी. दुपारी थोडे ऊन कमी झाल्यानंतर लागवडीस सुरवात करावी. रोपांच्या पिशव्या फाडून मुळांना इजा होणार नाही याची काळजी घेऊन रोपे खड्ड्यात लावावीत. रोपे लावताना मुळांभोवती पोकळी राहू न देता सभोवतालची माती घट्ट दाबावी. लागवडीनंतर हलके पाणी द्यावे.

नर, मादी रोपे :  द्विभक्तलिंगी प्रकारच्या जातींची लागवड करताना प्रत्येक खड्ड्यात एकमेकांपासून १० सें.मी. अंतरावर २-३ रोपे लावावीत. कारण लागवड करताना नर व मादी रोपे ओळखता येत नाहीत. लावलेली रोपे ४-६ महिन्यांची झाल्यानंतर फुले येण्यास सुरवात होते.
नर झाडांना लांब दांड्यावर अनेक लहान लहान पांढरट पिवळी फुले येतात व मोठ्या झुपक्‍याने वाढतात. पानाच्या बगलेत एक अथवा तीन मोठ्या कळ्या आल्यास ते झाड मादीचे आहे असे समजावे. यावेळी नर झाड ओळखून बुंध्यातून छाटून टाकावे. फक्त ५ ते ७ टक्के नर झाडे बागेच्या चारही दिशेने विखुरलेली राहतील या पद्धतीने ठेवावीत.

खत व्यवस्थापन :

 • पपई हे जलद वाढणारे, जास्त उत्पादन देणारे, जास्त अन्नद्रव्ये शोषण करणारे फळझाड आहे. त्यामुळे झाडांना वर्षभर खताची उपलब्धता करावी लागते.
 • पानामधील नत्र, स्फुरद, पालाश यांचे आवश्‍यक प्रमाण ठरविण्यासाठी पक्व पानांच्या देठातील ऊती पृथःकरणासाठी वापरतात. अधिक उत्पादनासाठी देठामध्ये नत्र १.४४ टक्के, स्फुरद ०.२५ टक्के आणि पालाश २.५२ टक्के असणे आवश्‍यक आहे.
 • पपई पिकात जस्त आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळून येते. त्यासाठी ४ थ्या आणि ८ व्या महिन्यात झिंक सल्फेट ०.५ टक्के (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) व बोरिक ऍसिड ०.१ टक्का (१ ग्रॅम प्रतिलिटर) तीव्रतेची झाडावर फवारणी करावी.
 • फळांचा एकसारखा आकार, वजन व जास्त उत्पादनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. त्यातून पाण्याबरोबर विद्राव्य खतांच्या मात्राही द्याव्यात.

विद्राव्य खतांच्या मात्रा देण्याचे वेळापत्रक :

 • विद्राव्य खतांमधूनही प्रतिझाड २०० ग्रॅम नत्र, २०० ग्रॅम स्फुरद व २०० ग्रॅम पालाश अशीच खतमात्रा महिन्यानुसार विभागून द्यावी. माती परिक्षणानुसार खतमात्रा द्यावी.
 • पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या व सातव्या महिन्यात प्रतिझाड दर पंधरा दिवसांनी १२५ ग्रॅम १९:१९:१९ या विद्राव्य खताची मात्रा द्यावी. आवश्‍यकता वाटल्यास हीच खतमात्रा विभागून आठ दिवसांच्या अंतराने ६३ ग्रॅम प्रतिझाड या प्रमाणातही देता येते.
 • एक एकर क्षेत्रामध्ये जितकी झाडे बसतात त्यानुसार वरील मात्रेस गुणाकार करून प्रतिएकरी प्रति हफ्ता द्यावयाची खतमात्रा काढता येते.

                  पपई पिकास खतव्यवस्थापन  (ग्रॅम/ प्रतिझाड)

महिना     नत्र स्फुरद  पालाश
पहिला     ५०     ५०     ५०  
तिसरा     ५०     ५०     ५०  
पाचवा     ५०     ५०     ५०  
सातवा    ५०     ५०     ५०  
एकूण    २००    २००    २००  

पाणी व्यवस्थापन :
वर्षभरात ३५ ते ४० पाण्याच्या पाळ्या लागतात. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास ३० ते ४० टक्के पाण्याची बचत होते. पाणी देताना ते साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. जमीन पाणथळ झाल्यास बुंधा सडण्याचा (कॉलर रॉट) रोग होतो. उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांच्या अंतराने, हिवाळ्यात ७ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पावसाळ्यात पाणी देण्याची गरज नसते. मात्र महिना दोन महिन्यांपर्यंत पावसाचा खंड पडल्यास जमिनीचा मगदूर व वातावरणानुसार ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

आंतरमशागत आणि आंतरपिके : मुळे उथळ असल्यामुळे आंतरमशागत आणि खुरपणी केवळ तण काढण्यापुरती करावी. पपईच्या ओळीतील रिकाम्या जागेत सुरवातीला उथळ मुळे असलेली भाजीपाला पिके, उदा. चवळी, वाटाणा, घेवडा, कांदा, मुळा किंवा कडधान्य पिकांची लागवड करावी.  वेलवर्गीय भाज्या, कोबीवर्गीय भाज्या, भेंडी, वांगी ही पिके आंतरपिके म्हणून घेऊ नयेत.
फळधारणा व फुले विरळणी ः रोपांची लागवड केल्यापासून फळे तयार होईपर्यंतचा कालावधी १० ते १२ महिन्यांचा असतो. फुलधारणा होण्यास ५ महिने लागतात आणि आणखी ५-७ महिने फळे तोडण्यासाठी लागतात. फळधारणा सुरू झाल्यानंतर भरपूर फुले व फळे लागतात. पुष्कळदा एकाच ठिकाणी जास्त फळे लागतात. ही सर्व फळे झाडावर एकाच वेळी वाढू दिल्यास ती चांगली पोसत नाहीत. शिवाय फळांच्या दाटीमुळे आकार लहान व वेडावाकडा होतो. म्हणून सर्वच्या सर्व फळे वाढू न देता खूप दाटलेल्या फळातील काही फळे लहान असतानाच विरळणी करावी.

काढणी :

 • रोपे लागवडीपासून दहा-बारा महिन्यांनी फळे काढणीस तयार होतात. फळ काढणीस तयार झाल्याचे पुढील गुणधर्मावरून ओळखता येते.
 • फळ काढणीसाठी तयार झाल्यावर त्यावर पिवळे डाग पडतात. त्यास कवडी पडणे असे म्हणतात.
 • फळातून निघणारा चीक जेव्हा पाण्यासारखा पातळ निघतो तेव्हा फळ काढणीसाठी तयार झाले असे समजावे.
 • फळांच्या देठाजवळचा भाग पिवळा दिसू लागतो.
 • फळांची तोडणी करताना फळे देठासहीत तोडावीत. स्थानिक बाजारासाठी पूर्ण तयार झालेली फळे काढावीत.
 • काढणीनंतर त्यांच्या आकाराप्रमाणे प्रतवारी
 • करावी. फळे स्वच्छ करून प्रत्येक फळावर कागद गुंडाळून टोपल्यात खालीवर गवताचा पेंडा भरून पॅकिंग करावे. टोपलीचे झाकण लावून टोपल्या सुतळीने शिवाव्यात व विक्रीसाठी पाठवाव्यात. टोपल्यात आकारमानाप्रमाणे ४ ते १० फळे बसतात.
 • फळे लागण्याचे प्रमाण पहिली तीन वर्षे भरपूर असते. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या उत्पादन परवडत नाही म्हणून झाडे काढून टाकावीत.

फळांची साठवण :
फळांची साठवण करण्यासाठी २० अंश सेल्सिअस तापमान सर्वोत्तम असते. फळे पिकण्याची क्रियासुद्धा या तापमानात चांगली होते. यापेक्षा जास्त तापमानामध्ये फळांना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो.

संपर्क : डॉ. उज्ज्वल राऊत, ९८५०३१४३५२
(उद्यान विद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
सर्वांच्या प्रयत्नांनीच गोवर्धन उचलला...अतिरिक्त दूध झाल्यास प्रक्रिया वाढविणे, त्यासाठी...
सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट...महाराष्ट्र सध्या दुधाच्या प्रश्नावरून निर्माण...
प्रशासकीय अधिकाऱ्यांना दुग्ध व्यवसाय...‘शेतीपूरक व्यवसाय करा त्यातून आर्थिक स्थैर्य...
अतिरिक्त दूध कमी झाले की दर वाढेल :...राज्यात दूध दराचा गंभीर प्रश्‍न तयार झाला आहे....
पहिला अधिकृत जागतिक मधमाशी दिन आज होणार...संयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी...
राहुरी येथे मधमाशीविषयक प्रशिक्षणाचे...राहुरी ः मधुमक्षिका पालनाचे शेती उत्पादनात विशेष...
देशव्यापी शेतकरी संपादरम्यान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने...
हरितगृहात गुलाब फुलांचे उत्पादन घेताना...जागतिक बाजारात गुलाब फुलांना वर्षभर मागणी असते....
तापमानात घट, ढगाळ हवामानासह पावसाची शक्...महाराष्ट्राचा पूर्वभाग, मध्य प्रदेश, गुजरात,...
लाल गराच्या संत्रा निर्यात वाढीसाठी... ऑस्ट्रेलियामध्ये आतील गर व रस रक्तासारख्या...
पीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी...बागायती कापूस शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव...
पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप...पुणे  ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा...
परभणीत लिंबू प्रतिक्विंटल १५०० ते ३०००... परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
शेततळ्यांसाठी १०० टक्के अनुदानाची... बुलडाणा  : शेततळे हा शाश्वत सिंचनाचा...
नगर जिल्ह्यात पाण्याच्या टॅंकरला ‘... नगर  ः जिल्ह्यात यंदा उशिराने टॅंकरद्वारे...
यवतमाळ जिल्हा बॅंक पीककर्ज देणार फक्‍त...यवतमाळ ः आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील...
नगर जिल्ह्यात ९४ हजार ८४९ क्विंटल हरभरा... नगर  ः जिल्ह्यात नाफेडने सुरू केलेल्या १३...
शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांपर्यंत...  परभणी : हवामान बदलामुळे जगातील सर्वच...
राशी आणि कावेरीला कृषी विभागाची क्‍लीन...नागपूर : गेल्या हंगामात राज्यात विक्रीस बंदी...
पुणे विभागात ‘जलयुक्त’च्या कामांसाठी... पुणे : जलयुक्त शिवार अभियानाच्या २०१८-१९ मधील...