agricultural news in marathi, precautions to be taken during grape re-cut, Agrowon, Maharashtra | Agrowon

द्राक्षबागेत रिकटवेळी घ्यावयाची काळजी
डॉ. आर. जी. सोमकुंवर
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

सध्याच्या वाढत्या तापमानामध्ये द्राक्षबागेमध्ये रिकट घेण्यासाठी पोषक वातावरण आहे. रिकटची पूर्वतयारी आणि त्यानंतर कार्यवाहीबाबत या लेखातून माहिती घेऊ.

सध्याच्या वाढत्या तापमानामध्ये द्राक्षबागेमध्ये रिकट घेण्यासाठी पोषक वातावरण आहे. रिकटची पूर्वतयारी आणि त्यानंतर कार्यवाहीबाबत या लेखातून माहिती घेऊ.

द्राक्षबागेत सध्या तापमानात वाढ होत आहे. नवीन बागेत रिकट घेऊन द्राक्षवेल उभी करण्याकरिता हे वातावरण पोषक आहे. गतहंगामात ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात कलम केलेल्या बागेत आता कलम काडीची परिपक्वता पूर्ण झाली आहे. वेलीवरील फुटीची वाढसुद्धा थांबली आहे. रात्रीचे तापमान हे १५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाले आहे. या वातावरणात वेलींच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग वाढतो. यानंतर तापमानात घट येण्याची फारशी शक्‍यता नाही. कलम केलेल्या द्राक्षबागेत रिकट घेण्यासाठी पुढीलप्रमाणे पूर्वतयारी करावी.

रिकट पूर्वतयारी
द्राक्षबागेत रिकट घेण्याच्या १२-१५ दिवस आधी २ वेलीमध्ये ३-४ इंच खोल आणि २ फूट रुंद अशी चारी घ्यावी. चारीमध्ये तळात जवळपास दोन घमेली शेणखत, २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट प्रतिवेल टाकावे. एकरी १० ते १२ किलो फेरस सल्फेट, ५० किलो डिएपी टाकून त्यावर मातीचा हलका थर टाकावा. यामुळे बोद तयार होईल. बोदामध्ये हवा खेळती राहून नवीन पांढरी मुळी तयार होईल. ही मुळी कार्यक्षम असते. बागेतील जमिनीत  चुनखडी आढळून येत असल्यास बागेत ४०-५० किलो गंधक (सल्फर) प्रति एकर चारी खोदल्यानंतर मातीमध्ये मिसळून घ्यावे. त्यामुळे स्फुरद, पोटॅशसारखी अन्नद्रव्ये जमिनीतून उचलण्यासाठी वेलींना अडचण येणार नाही.

रिकटच्या जागेवर पानगळ करणे
रिकट घेत असताना वातावरणातील तापमान वाढण्यास  सुरवात होत असते. मात्र, रिकटनंतर डोळे फुटण्याइतके पुरेसे तापमान व आर्द्रता नसते. परिणामी रिकट नंतर पुन्हा डोळे फुटण्यास वेळ लागतो. यासाठी पानगळ करून काडीवरील डोळे चांगले फुगवून घ्यावेत. त्यामुळे नवीन फुटी एकसारख्या व लवकर फुटतात. ज्या ठिकाणी रिकट घेणार आहोत, त्या जागेच्या वर ३-४ पाने व खालील ३-४ पाने हाताने गाळून घ्यावीत किंवा त्यासाठी इथेफॉनचा वापर करावा. बागेतील पाणी सुमारे आठवडाभर बंद करावे. वेलीवर ताण बसून पानगळ होण्यास मदत होईल.

काडीवर कोणत्या ठिकाणी रिकट घ्यावा?
बागेमध्ये कलम केल्यानंतर नवीन फूट निघून वाढ जोमात झाली. अशा ठिकाणी ओलांडासुद्धा तयार झाला असल्यास अशावेळी खरड छाटणी करता येईल. ही परिस्थिती फार कमी ठिकाणी पाहावयास मिळते. काही बागेत खोड तयार होऊन तारेच्या वर फूट परिपक्व झाली असल्यास, तारेच्या ३-४ इंच खाली काप घ्यावा. काही परिस्थितीमध्ये कलम केल्यानंतर निघालेली फूट पावसात रोगांना बळी पडलेली असल्यास फुटीची वाढ फक्त एक ते दीड फूट उंचीवर थांबलेली दिसेल. तेव्हा ज्या ठिकाणी काडी परिपक्व झालेली आहे अशा ठिकाणी किंवा सरसकट कलम जोडाच्या वर ४-५ डोळे राखून रिकट घ्यावा. ज्या बागेमध्ये १०-१२ मि.मी. जाडी आहे अशा ठिकाणी काडीवर रिकट घ्यावा.

कीड व रोग व्यवस्थापन
बागेत रिकट घेतल्यानंतर ५-६ दिवसांनी वेलीवर डोळे फुगायला सुरवात होते. या काळात उडद्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. ही कीड वाढत्या तापमानात डोळे पोखरते. काही परिस्थितीत डोळा पूर्ण संपल्यास पुढील काळात फूट निघणार नाही. विशेषतः ही कीड तापमान जास्त व आर्द्रता कमी अशा परिस्थितीमध्ये आढळून येते. तेव्हा या किडीच्या नियंत्रणाकरिता योग्य वेळीच शिफारशीत कीडनाशकांचा वापर करावा.

फुटींची निवड करणे
रिकट घेतल्यानंतर बागेत पाणी जास्त प्रमाणात दिले जाते. त्याचवेळी वाढते तापमान व पाणी दिल्यामुळे वाढलेली आर्द्रता फुटींच्या वाढीकरिता पोषक असते. यासाठी बऱ्याचशा बागेमध्ये मोकळे पाणीसुद्धा दिले जाते. अशा वेळी नवीन निघालेल्या फुटींचा वापर खोड तयार करण्याकरिता करावा. काडीवर निघालेल्या फुटीपैंकी वरची फूट ३-४ पानांवर शेंडा पिंचींग करून घ्यावी. खालची फूट बांबुस सुतळीने बांधावी. वरच्या फुटीचा शेंडा खुडल्यास खालील फूट जोरात वाढेल. वरील फूट भविष्यात गरज पडल्यास कामी येईल.
बऱ्याच बागांमध्ये काडीत रोगांच्या प्रादुर्भावामुळे जिवाणू तसेच असतात. अनेक वेळा एकाच कात्रीने आपण बागेतील पूर्ण कलमवेलीचा रिकट घेतो. अशा वेळी रोगग्रस्त काडीवरून सशक्त व रोगमुक्त काडीवर संसर्ग (infection) होण्याची शक्‍यता असते. अशा परिस्थितीत वरील फूट टाळणे फायद्याचे होईल.

अन्नद्रव्य व्यवस्थापन
नवीन निघालेल्या फुटींच्या वाढीसाठी पाण्याइतकीच खतांचीही गरज असते. या काळात फक्त शाकीय वाढ महत्त्वाची असते. नत्ररुपी अन्नद्रव्याची यावेळी उपलब्धता केल्यास खोड लवकर तयार होण्यास मदत होईल. यामध्ये युरिया, १८ः४६ः० किंवा १२ः६१ः० या सारख्या ग्रेडचा वापर करता येईल. हलकी जमीन असल्यास अमोनियम सल्फेटचा वापरसुद्धा करता येईल. यावेळी नत्राचा वापर हा शाकीय वाढीबरोबरच दोन पेऱ्यातील अंतर वाढवण्यासाठीही महत्त्वाचा ठरतो.
ज्या बागेत स्लरीचा वापर करणे शक्‍य आहे, अशा बागेत सुरवातीपासूनच खतांचा वापर स्लरीद्वारे करावा. कलम केलेल्या बागेत पहिल्या वर्षी पाने पिवळी पडताना दिसतात. यावेळी फेरसची कमतरता असते. ही परिस्थिती टाळण्याकरिता बागेत रिकट घेतल्यानंतर वर ओलांड्याकरिता फूट थांबवेपर्यंत १ ग्रॅम फेरस सल्फेट प्रति लिटर पाणी याप्रमाणे एक ते दोनवेळा फवारणी करावी. त्यानंतर ओलांडा तयार करतेवेळी १.५ ते २ ग्रॅम फेरस सल्फेट प्रति लिटर पाणी याप्रमाणे २-३ फवारण्या घ्याव्यात. पुन्हा जमिनीतून १०-१२ किलो प्रति एकर या प्रमाणे उपलब्धता करावी. ही परिस्थिती डॉगरीज या खुंटावर फक्त पहिल्या वर्षी आढळून येईल.

ओलांडा तयार करणे
ओलांडा तयार करतेवेळीसुद्धा "स्टॉप अॅन्ड गो'' पद्धतीने गेल्यास काड्यांची आवश्‍यक ती पूर्तता होईल. पहिल्याच वर्षी वेलीचा पूर्ण सांगाडा तयार होण्यास मदत होईल. बागेत दरवर्षी खरड छाटणीनंतर फुटींची विरळणी करावी लागते. आपण जरी मागील हंगामातील काडी फक्त एक डोळ्यावर कापली असली तरी खरड छाटणीनंतर एका वेलीवर जवळपास ७०-८० फुटी निघतील. या सर्वच फुटी राहिल्यास कॅनॉपीमध्ये गर्दी होऊन घड निर्मितीस अडचण येते. ही परिस्थिती टाळण्याकरिता यावेळी संधी असते. जेव्हा आपण पंजा मारतो, त्यावेळी नत्र व स्फुरद किंवा फक्त नत्रयुक्त खतांचा वापर जमिनीतून व फवारणीद्वारे करावा. तसेच पाण्याची मात्रासुद्धा वाढवावी. हा कालावधी फक्त एक आठवड्याचा असतो. असे केल्यास शाकीय वाढ जोमात होईल. म्हणजेच दोन पेऱ्यातील अंतर वाढेल. यावेळी फुटीची वाढ अशा प्रकारे व्हावी की जवळपास अडीच ते तीन इंच पेरा मिळावयास हवा. यामुळे भविष्यात ओलांड्यावर मोजक्‍याच काड्या मिळतील व विरळणीचा फारसा खर्च होणार नाही.
"स्टॉप ॲन्ड गो'' पद्धतीचा ओलांडा तयार करतेवेळी ८-९ पानांची फूट झाली की ६-७ पानांवर थांबवून घ्यावी. यावेळी निघालेल्या बगलफुटी ३-४ पानावर थांबवाव्यात. पुढील फूट न थांबवता तारेवर पुन्हा बांधून घ्यावी. म्हणजे ओलांड्याचा पुढील टप्पा तयार करणे सोपे होईल. मागील ३-४ पानांवर थांबवलेल्या बगलफुटीस "आखुड सबकेन''सुद्धा म्हटले जाते. पहिल्याच वर्षी वेलीचा सांगाडा पूर्णपणे तयार व्हावा व फलधारी काडी मिळावी या उद्देशाने असे करणे गरजेचे असते.

खोड व ओलांडा तयार करणे :
नवीन फूट निघाल्यानंतर सुरवातीच्या काळामध्ये तिच्या वाढीचा वेग अधिक असतो. या जोमाचा उपयोग करून खोड व ओलांडा तयार करावा. खोड तयार करतेवेळी "स्टॉप अँन्ड गो'' पद्धतीने काम केल्यास त्याचा खोडाची जाडी मिळवण्यास फायदा होतो. याकरिता वाढत असलेली नवीन फूट ९-१० पानांच्या अवस्थेत ६-७ व्या पानावर खुडावी. जी फूट जवळपास एक ते सव्वा फूट उंचीची असेल. खुडल्यानंतर या फुटीच्या बगलफुटी निघतील. बगलफुटीत ५-६ पाने आल्यानंतर ३-४ थ्या पानावर खुडून घ्यावी. वरील फूट न खुडता पुन्हा बांबूस सुतळीने बांधून घ्यावी. ही फूट वाढत असताना पुन्हा एकदा ७-८ पानावर शेंडापिंचिंग करावे. म्हणजे वाय वळण पद्धतीमध्ये असलेल्या वेलीवरील नवीन फुटीचा दोनवेळा काप घेतल्यास ती फूट पहिल्या तारेजवळ पोचेल. मांडव पद्धतीमध्ये कदाचित पुन्हा एकदा काप घ्यावा लागेल. काडीवर राखलेल्या बगलफुटीवरील पाने सूर्यप्रकाशाच्या साह्याने प्रकाशसंश्‍लेषणामार्फत अन्नद्रव्य तयार करतील. त्याचा फायदा खोड जाड होण्यास होईल.

खत व पाणी व्यवस्थापन

  • रिकट घेतल्यानंतर बागेत साधारणतः ८-१० दिवसात पूर्णपणे फुटी बाहेर निघताना दिसून येतील. यावेळी बागेत तापमान वाढायला सुरवात झाली असेल. अशावेळी वेलीची पाण्याची गरजसुद्धा वाढेल. ही गरज पूर्ण करण्याकरिता बागेत आवश्‍यकतेप्रमाणे पाणी देणे गरजेचे राहील.
  • यापूर्वी चारी घेतल्यानंतर रिकट होईपर्यंत पाणी बंद केले असेल. आता बागेत नवीन पांढरी मुळी फुटण्यासाठी बोद पूर्णपणे भिजणे गरजेचे आहे. बोद पूर्णपणे भिजेल अशा प्रकारचे पाण्याचे सुरवातीस नियोजन करावे. त्यानंतर मात्र गरजेप्रमाणे पाण्याची उपलब्धता करून द्यावी.
  • ज्या भागात तापमान जास्त असून, आर्द्रता ४० टक्केपेक्षा कमी आहे, अशा बागांमध्ये रिकट घेतल्यानंतर ४-५ दिवसानंतर पाण्याची फवारणी दिवसातून दोन वेळा (१०-१२ दिवसांपर्यंत) करावी. त्याचा नवीन फुटी लवकर निघण्यास फायदा होईल.
  • जमिनीतून होणाऱ्या बाष्पीभवनाला अटकाव घालण्यासाठी बोदावर मल्चिंग करावे.
  • डोळे फुगत असताना बागेत नत्राचा वापर सुरू करावा. यामुळे बागेत दिले गेलेले पाणी व अन्नद्रव्य या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ बसू शकेल. त्याचा फायदा नवीन फूट लवकर निघण्यास होईल.

संपर्क : डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०- २६९५६०६०
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

 

 

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...