गहू पिकातील उंदरांचे नियंत्रण

ओंबी अवस्थेतील गहू पिकात उंदरांचा प्रादुर्भाव होतो.
ओंबी अवस्थेतील गहू पिकात उंदरांचा प्रादुर्भाव होतो.

नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी केलेल्या गव्हाच्या ओंब्या बाहेर पडण्यास सुरवात झाली आहे. काही ठिकाणी गहू फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे, तर लवकर पेरलेला गहू चिकाच्या अवस्थेत आहे. सद्यःस्थितीत पिकामध्ये उंदरांचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यादृष्टीने नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

  • गहू ओंबीवर आल्यावर उंदीर नासाडी करतात. उंदरांचा वेळीच बंदोबस्त न केल्यास ३ ते २१ टक्‍क्‍यांपर्यंत गव्हाचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.  
  • शेतामध्ये ज्या ठिकाणी उंदरांनी तयार केलेली बिळे आढळून आली आहेत त्या ठिकाणी इंग्रजी टीप्रमाणे काठी लावून पक्षी थांबे तयार करावेत. त्यामुळे पक्षी उंदीर खातील.  
  • उंदराच्या बिळामध्ये गाजराचे तुकडे टाकावेत. गाजर दातात अडकल्याने नुकसानीचे प्रमाण कमी होईल.
  • बिळांची संख्या मर्यादित असल्यास उंदरांच्या बिळाजवळ पिंजऱ्यात आमिष ठेवून उंदीर पकडता येतील. हा उपाय सामूहिक पद्धतीने करावा.
  • दक्षता घ्या

  • झिंक फॉस्फाईड हे उंदरांप्रमाणेच इतर सस्तन प्राण्यांना घातक असल्याने त्याचा वापर काळजीपूर्वक करावा. आमिष जमिनीवर पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • विषारी आमिष तयार करताना हातामध्ये प्लॅस्टिक मोजे घालून काडीचा वापर करून मिश्रण तयार करावे.
  • अामिष तयार करताना व वापरताना पुढील तक्त्यानुसार करावे.  १५-२० दिवसांनंतर पुन्हा अशा प्रकारे उंदरांचा बंदोबस्त करावा.
  • गहू पिकाची काढणी केल्यानंतर रिकाम्या क्षेत्रात शेळ्या-मेंढ्या चरायला सोडल्या जातात. त्यामुळे विषारी औषध जमिनीवर राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • टीप :  विषबाधा होऊ नये यासाठी तज्ज्ञांच्या सहाय्याने ही प्रक्रिया करावी.

    पारंपरिक उपाय :

  • एका मडक्यामध्ये बेशरम झाडाची तीन किलो पाने, धोतऱ्याची चिरलेली तीन फळे ही तीन लिटर पाण्यात उकळून घ्यावीत.
  • पाणी उकळून अर्धे झाल्यावर त्याचा अर्क गाळून घ्यावा. नंतर या पाण्यात अर्धा किलो हरभरा रात्रभर व दिवसभर भिजवावा. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे.
  • अर्कामध्ये भिजवलेले हरभरे उंदराच्या बिळात टाकावेत. हा हरभरा खाऊन उंदीर मरतात.
  • टीप :  सर्व मिश्रण घरापासून बाजूला ठेवण्याची दक्षता घ्यावी. योग्य पद्धतीनेच वापर करावा.

    विषारी आमिषाचा वापर :

  • शेतातील सर्व बिळांची पाहणी करावी. बिळांची तोंडे चिखलाने किंवा मातीने बंद करावीत. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी जी बिळे उघडी दिसतील त्यात उंदीर असतात.
  • उंदरांना आकर्षित करण्यासाठी धान्याच्या भरड्यात थोडेसे गोडेतेल मिसळून मिश्रण करुन थोडे थोडे त्या बिळात टाकावे.
  • भरडा खाल्लेल्या बिळात चौथ्या दिवशी सायंकाळी झिंक फॉस्फाईडयुक्त विषारी आमिष टाकावे.  
  • विषारी आमिष तयार करण्याकरिता कोणत्याही धान्याचा जाडा भरडा ५० भाग त्यात एक भाग झिंक फॉस्फाईड मिसळावे. यामध्ये थोडेसे गोडेतेल टाकून चांगल्या प्रकारे मिश्रण तयार करावे. प्रत्येक बिळामध्ये साधारणपणे एक चमचा मिश्रण काठीच्या सहाय्याने खोलवर ढकलावे. बिळे पालापाचोळा आणि गवताने झाकावीत. त्यानंतर बिळांची तोंडे चिखलाने बंद करावीत.
  • सामुदायिकरीत्या परिसरात उंदीर संहाराची मोहीम हाती घेतली तर त्याचा अधिक फायदा होतो. विषारी अामिषाचा वापर केल्यानंतर शेतात जे मेलेले उंदीर सापडतील ते गोळा करून खड्ड्यात पुरावेत.
  •                                                     तक्ता : उंदीर नियंत्रणाची पद्धत

    दिवस     नियंत्रण पद्धती     प्रमाण ५० बिळांसाठी     प्रत्येक बिळासाठी प्रमाण
    पहिला दिवस    बिळांची पाहणी करून उंदरांची बिळे बंद करणे  बिळांची पाहणी करून उंदरांची बिळे बंद करणे  बिळांची पाहणी करून उंदरांची बिळे बंद करणे
    दुसरा आणि तिसरा दिवस  उघडलेली बिळे मोजणे, त्यानुसार आवडीचा भरडा टाकणे. त्यामुळे नवीन खाद्याची आवड निर्माण होईल. त्यानुसार औषध खरेदी करावे.   ४९० ग्रॅम भरडा  + १० ग्रॅम गोडेतेल   १० ग्रॅम
    चौथा दिवस     ज्या ठिकाणी भरडा खाल्लेला आहे त्या ठिकाणी बिळात विषारी अामिष टाकणे, अामिष जमिनीवर पडणार नाही याची दक्षता घ्यावी.     ४९० ग्रॅम भरडा + १० ग्रॅम गोडेतेल + १० ग्रॅम झिंक फॉस्फाईड. साधारणपणे ४९ भाग भरडा व १ भाग औषध    १० ग्रॅम विषारी अामिष साधारणपणे एक चमचा मिश्रण काठीच्या सहाय्याने खोलवर टाकावे.
    पाचवा दिवस    मेलेले उंदीर गोळा करून गाडणे. विषारी औषध जमिनीवर पडलेले असल्यास बिळात ढकळून बिळे बंद करणे म्हणजे पक्षी-प्राणी त्याच्या संपर्कात येणार नाही.  मेलेले उंदीर गोळा करून गाडणे. विषारी औषध जमिनीवर पडलेले असल्यास बिळात ढकळून बिळे बंद करणे म्हणजे पक्षी-प्राणी त्याच्या संपर्कात येणार नाही.  मेलेले उंदीर गोळा करून गाडणे. विषारी औषध जमिनीवर पडलेले असल्यास बिळात ढकळून बिळे बंद करणे म्हणजे पक्षी-प्राणी त्याच्या संपर्कात येणार नाही.

    संपर्क : डॉ. भरत रासकर, ८७८८१०१३६७ (कृषी संशोधन केंद्र,निफाड, जि. नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com