जाणून घ्या फळधारणा न होण्याची कारणे

कमी फळे लागलेले संत्रा झाड
कमी फळे लागलेले संत्रा झाड

फळझाडांचे उत्पादन हे फूल व फळधारणेवर अवलंबून असते. फळबागांची या अवस्थेमध्ये काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. फळधारणा न होण्यामागील कारणे जाणून घेऊन ती टाळल्यास फळबागेतून चांगले उत्पादन मिळविणे शक्य होते. अलीकडे अनेक फळझाडांमध्ये फळधारणा न होण्याची समस्या दिसून येते. एखाद्या झाडाची शाखीय वाढ चांगली होत असली तरी त्याला फळे येत नाहीत. फळबागेमध्ये अशा फळे न देणाऱ्या झाडांची संख्या वाढल्यास उत्पादनामध्ये घट होते. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मोठी घट होऊन फळबाग न परवडण्याची स्थिती निर्माण होते. फळधारणा न होण्याची कारणे : शाकीय वाढ व पुनरुत्पादन याचा समतोल बिघडणे: फळझाडांमध्ये शाकीय वाढ आणि पुनरुत्पादनासाठी आवश्यक त्या क्रिया सुरू होण्याची प्रक्रिया यामध्ये समतोल बिघडल्यास फुले न लागणे, कमी प्रमाणामध्ये फळ सेटिंग होणे या बाबी दिसून येतात. त्याचा विपरीत परिणाम हा फलधारणा कमी किंवा न होण्यामध्ये होतो. झाडाच्या क्षमतेपेक्षा चालू वर्षी जास्त उत्पादन घेणे: एखाद्या वर्षी झाडाच्या क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन घेतल्यास, दुसऱ्या वर्षी फळधारणेचे प्रमाण कमी होते किंवा होत नाही. वंधत्व : अनुवांशिकरीत्या वंधत्व असलेल्या झाडांना फळे येत नाहीत. फळधारणेवर परिणाम करणारे मुख्य घटक : हवामानाशी संबंधित बाह्य घटक  : हंगाम : फळझाडांची लागवड कोणत्या हंगामात केली आहे, यावरूनही त्यांच्यात फळधारणा होणे ठरत असते. उदा. आंबा. तापमान : तापमान हे फळपिकाच्या फूल व फळ धारणेवर विविध प्रकारे परिणाम करते. तापमान शून्य अंशापेक्षा कमी झाल्यास, फुलकळ्या मरून जातात, परागकणाची जगण्याची क्षमता कमी होते. उदा. एप्रिल ते मे महिन्यामध्ये तापमानात वाढ झाल्यामुळे संत्रा पिकामध्ये फुले गळणे व सेटिंग झालेली फळे गळणे ही समस्या उद्भवते. तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त किंवा अतिशय कमी झाल्यास मधमाश्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन परागीभवन घटते. फलधारणा कमी होते. हवेतील आर्द्रता : फुलोरा अवस्थेमध्ये अवकाळी पाऊस आल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन व पराग अंकुरण्यावर होतो. प्रकाश : प्रकाश हा वनस्पतीमधील अन्न तयार करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. फळझाडावर सूर्यप्रकाश व्यवस्थित पडत नसल्यास वनस्पतीतील कर्बोदकांची निर्मिती कमी होते. परिणामी फूल व फळधारणा कमी प्रमाणात होते. फळझाडामध्ये दाट कॅनोपी (पानांची संख्या जास्त) ठेवल्यास खालील पानांपर्यंत सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात पोचत नाही. परिणामी अकार्यक्षम पाने झाडाला पोसावी लागतात. त्याचा विपरीत परीणाम फळधारणेवरही होतो. फळगळीचे प्रमाण वाढते. वारा : परागीभवनासाठी वारा गरजेचा आहे. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त वारा असल्यास फुलांमधील गर्भधारणेसाठी आवश्यक घटकांना इजा पोचते. परिणामी फलधारणा कमी होते. झाडाशी संबंधित बाह्य घटक : झाडवाढीचा जोम : झाडाची वाढ समतोल होणे गरजेचे असते. अन्यथा केवळ शाकीय वाढ वेगाने झाल्याने फळधारणेवर विपरीत परीणाम होतो. संतुलित वाढीमुळे झाड समान फलधारणा करते व फळाचा संपूर्ण भार पेलू शकते. जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण : झाडाच्या वाढीमध्ये जमिनीतील नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्य घटकांचा समतोल आवश्यक असतो. तो बिघडल्यास फळधारणा होत नाही. कलम : कलमीकरणाची प्रक्रिया योग्य न झाल्यास फलोत्पादनावर परिणाम होतो. उदा. एकसारखी कलम काडी किंवा खुंटरोप न वापरणे. छाटणी : झाडांची छाटणी अतिशय महत्त्वाची असते. छाटणीचे प्रमाण, वेळ योग्य असावी लागते. त्यासाठी हवामानातील घटकांचा विचार करणे आवश्यक असते. चुकीच्या छाटणीमुळे झाडांमधील संतुलन बिघडल्यास शाकीय वाढ जास्त होऊन, फूल व फळधारणेचे प्रमाण कमी होते. वनस्पतीमधील अंतर्गत घटक : उत्क्रांती प्रवृत्तीमध्ये झाडाच्या जाती व प्रजातीमध्ये अनेक घटक कार्यरत असतात. त्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी एखादी क्रिया विकृती निर्माण झाल्यास फळधारणा होण्यामध्ये अडचणी येतात. फूल गर्भपात होणे : मादी आणि नर भाग तयार होत असताना अडथळे येतात. गर्भधारणेशी संबंधित भाग अर्धवट विकसित झाल्यास फलधारणा अल्प प्रमाणात किंवा अजिबात न होणे. स्त्रीकेसरातील अडचणीमुळे डाळिंबाला फळधारणा होत नाही. अकार्यक्षम परागकण : काही वेळेस फुलांमधील परागकण अकार्यक्षम असतात किंवा ते लगेचच मरतात. उदा. मुस्कडाईन जातीच्या द्राक्षामध्ये असे अकार्यक्षम परागकण असल्यामुळे फलधारणा होत नाही. वंध्यत्व : काही फळझाडामध्ये विशिष्ट प्रकारच्या अनुवांशिक घटकामुळे साधारणतः पराग, मादीमधील अंडाशय, गर्भ, भ्रूणकोष तयार होत नाहीत. परिणामी फळ धारणा होत नाही. बाह्य वंध्यत्व हे प्रथमतः अंडाशयाचा गर्भपात झाल्यामुळे होते. परागनलिकाची मंद वाढ : वातावरणातील बदल, अन्नद्रव्यांचा असमतोल व संप्रेरकातील बदल यामुळे परागनलिकेची वाढ मंद होते. अशा मंद वाढीमुळे परागकण हे अंडाशयापर्यंत योग्य वेळेत जाऊ शकत नाहीत. परिणामी फळधारणा होत नाही. उदा. आंब्याच्या तैमूर या जातीमध्ये परागनलिकेचे तोंड बंद असल्यामुळे परागकण गर्भाशयापर्यंत पोचू शकत नसल्याचे दिसून आले आहे . अकाली किंवा विलंबित परागकण : परागीकरण योग्य वेळी होणे आवश्यक असते. ते लवकर किंवा उशिरा झाले तरी त्याचा विपरीत परिणाम फळधारणेवर होतो. अकाली परागीकरण झाल्यामुळे फुलातील स्त्रीकेशरामध्ये अडचण होऊन फळगळ होते. तसेच परागीकरण उशिरा झाले तरी सेटिंग होण्यापूर्वी फूलगळ होते. वनस्पतीची पोषण स्थिती : झाडे चांगली पोसली गेल्यास फुलांचे प्रमाण वाढते. सक्षम फुले असल्यास फलधारणा चांगली होते. झाडाच्या वाढीमध्ये अडचणी असल्यास, दोष असणारे स्त्रीकेशर तयार होतात. फळझाडामधील परागकणांची क्षमता व फळाची परिपक्वता ही झाडांच्या योग्य पोषणावर अवलंबून असते. फळधारणा योग्य प्रकारे होण्यासाठी उपाययोजना :

  • फळाचा आणि शाकीय वाढीचा योग्य समतोल राखावा.
  • फळझाडामधील शाकीय वाढ नियंत्रणात आणण्यासाठी बुटके खुंट रोप वापरावे.
  • दोन डोळ्यातील अंतर कमी असणारी कलम काडी कलमासाठी वापरावी.
  • फळझाडांना वळण देताना दोन फांद्यामधील अंतर जास्त राहील, अशा प्रकारे छाटणी करावी.
  • वनस्पती वाढरोधकांचा तज्ज्ञांच्या साह्याने वापर करून शाकीय वाढ व फळांचा योग्य समतोल राखावा.
  • फुलांची संख्या वाढविणे : फुलांची संख्या वाढविण्यासाठी वाढ संप्रेरकांचा वापर केला जातो. संप्रेरकांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक व लेबल क्लेमप्रमाणे करावा.

  • फूलकळीची गुणवत्ता व संख्या :  चांगल्या प्रकारे फूलकळी निघण्यासाठी फळझाडाच्या फांद्या वाकवून घ्यावात. लवकर फळ काढणी करावी. यामुळे फांद्यामध्ये शिल्लक असलेल्या अन्नसाठ्याचा उपयोग नवीन डोळे तयार होण्यासाठी होईल. फूलकळीची संख्या चालू वर्षीच्या हंगामामध्ये मर्यादीत ठेवावी. त्यामुळे फळधारणा व बहारामध्ये सातत्य ठेवता येते.
  • झाडावरील फळांचा भार कमी करणे : व्यापारी दृष्टिकोनातून मोठ्या आकाराच्या, आकर्षक फळांना अधिक मागणी असते. एका झाडावर अधिक फळे घेतल्यास, ती कमी पोसल्यामुळे लहान राहतात. विरळणी करून फळांची संख्या कमी ठेवल्यास फळांची गुणवत्ता चांगली मिळू शकते. तसेच पुढील वर्षी फळधारणा चांगली होण्यास मदत होते.
  • पाण्याचे व्यस्थापन : फळबाग फुलोऱ्यामध्ये किंवा सेटिंगमध्ये असताना जमिनीतील ओलावा संतुलित प्रमाणामध्ये असावा. त्यामुळे झाडांच्या सर्व प्रक्रिया योग्य प्रकारे होऊन फळधारणा चांगली होते. जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी किंवा अधिक झाल्यास फळगळ होण्याची शक्यता वाढते.
  • अन्नद्रव्ये : फळबागेला योग्य व समतोल प्रमाणात अन्नद्रव्ये पुरवावीत. बागेमध्ये खताची शिफारशीत मात्रा बहर येण्यापूर्वी द्यावी. उत्तम फुलोरा येण्यासोबतच फळ सेटिंग चांगले होते. कमतरता असलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा जमिनीतून किंवा फवारणीद्वारे द्यावी.उदा. द्राक्ष व संत्रा या फळपिकामध्ये फुलोऱ्यात येण्यापूर्वी जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते.
  • नत्रयुक्त खत फळबागेसाठी शेंड्याकडील नवीन डोळा तयार झाल्यानंतर द्यावे. यामुळे फुलामधील गर्भकोष चांगल्या प्रकारे तयार होतो. परिणामी अशा फळझाडामध्ये फळधारणा चांगली होते. रासायनिक खतांचा वापर असंतुलितपणे केल्यास फुलांच्या निर्मितीमध्ये बाधा येऊ शकते.
  • संपर्क : सतीश फाळके, ८००७१४०२४४ (अखिल भारतीय समन्वित द्राक्ष संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com