तंत्र चिकू लागवडीचे...

चिकू कलमाचा जोड जमिनीच्यावर राहील या पद्धतीने लागवड करावी.
चिकू कलमाचा जोड जमिनीच्यावर राहील या पद्धतीने लागवड करावी.

चिकू कलम लागवड करताना प्रत्येक खड्ड्यात मध्यभागी कलमाचा जोड जमिनीच्या वर राहील, याची काळजी घ्यावी. कलमाला काठीचा आधार द्यावा. चिकूचे झाड सावकाश वाढणारे असल्यामुळे त्यामध्ये पहिल्या सहा वर्षांच्या काळात आंतरपिके घ्यावीत.

चिकू लागवडीसाठी पोयट्याची काळी कसदार जमीन निवडावी. काळ्या व भारी जमिनीत निचऱ्यासाठी चर खणून लागवड करावी. पाण्याचा योग्य निचरा होत नसलेल्या, चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत चिकूची लागवड करू नये.

अभिवृद्धी चिकूची अभिवृद्धी भेट कलमाद्वारे केली जाते. चिकूची कलमे बांधण्यासाठी खिरणी खुंटाचा उपयोग करतात.

लागवड तंत्र लागवड जुलै-ऑगस्ट महिन्यात करावी. नवीन बागेची लागवड करण्यापूर्वी जमिनीची नांगरणी व कुळवणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. १० बाय १० मीटर अंतरावर एक मीटर बाय एक मीटर बाय एक मीटर आकाराचे खड्डे करावे. पोयटा माती, २ ते ३ घमेले शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट, निंबोळी पावडर २०० ग्रॅम या मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात मध्यभागी कलमाचा जोड जमिनीच्या वर राहील या पद्धतीने  कलम लावावे.  कलमाला काठीचा आधार द्यावा. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे.

वळण आणि छाटणी झाडाची नियमित छाटणी करावी लागत नाही. मात्र सुरवातीच्या काळात खिरणी खुंटावर येणारी फूट तसेच झाडाच्या खोडावर जमिनीपासून ५० सें.मी. उंचीपर्यंत येणारी नवीन फूट वेळोवेळी काढून टाकावी. झाडाला योग्य आकार देण्यासाठी आवश्‍यकतेनुसार छाटणी करावी.

खते आणि पाणी व्यवस्थापन

  • झाडाची जलद वाढ होण्यासाठी खताच्या मात्रा दोन समान हप्त्यात सप्टेंबर आणि जून या महिन्यांत विभागून द्याव्यात. पूर्ण वाढ झालेल्या झाडांना १०० किलो शेणखत, तीन किलो नत्र, दोन किलो स्फुरद व दोन किलो पालाश  द्यावे.
  • झाडाची चांगली वाढ आणि त्यापासून भरपूर उत्पादन मिळविण्यासाठी पाण्याच्या नियमित पाळ्या द्याव्यात.
  • फुलोरा धरण्याच्या काळात तसेच फलधारणेच्या अवस्थेत चिकूच्या झाडाला पाण्याचा ताण पडल्यास फळांचा आकार लहान राहतो.
  • आंतरपिके

  • चिकूचे झाड सावकाश वाढणारे असल्यामुळे त्यामध्ये पहिले ५ ते ६ वर्षांच्या काळात आंतरपिके घ्यावीत.
  • टोमॅटो, कोबी, वांगी, मिरची, लिली, निशिगंध या आंतरपिकांची लागवड फायदेशीर ठरते.
  • फळांचे उत्पादन फुलांचा पहिला बहार सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये येतो. फुलांचा दुसरा बहार फेब्रुवारी-मार्च मध्ये येतो. साधारणपणे फुले आल्यानंतर फळधारणा होवून फळे पक्व होण्यासाठी २४० ते २७० दिवसांचा कालावधी लागतो.

    जाती

  • कालीपत्ती, क्रिकेट बॉल, किर्ती-भारती, को-१, पिलीपत्ती, बारमाशी, पीकेएम-७, पीकेएम-२
  • कालीपत्ती ही लोकप्रिय जात आहे. कालीपत्तीची झाडे मोठी, विस्तारित असतात. पाने गर्द हिरवी असतात. फळे मोठी अंडाकृती आहेत. गर गोड आहे. पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून दरवर्षी ३००० ते ४००० फळे मिळतात.
  • संपर्क : अमोल  क्षीरसागर ९८२२९९१४९५ (कनिष्ठ संशोधन सहायक, उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com