तंत्र शिंगाडा उत्पादनाचे...

शिंगाडा लागवड
शिंगाडा लागवड

शिंगाडा हे उपवासाच्या काळात विशेष मागणी असलेले पीक आहे. शिंगाड्याची लागवड प्रामुख्याने उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात तलाव, शेततळे, तसेच भातपिकाच्या खाचरांमध्ये केली जाते. सद्यःस्थितीत ज्या शेतकऱ्यांच्या शेततळ्यात पाणी आहे त्यांना या पिकाची लागवड करता येते. शिंगाड्याच्या फळामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात. फळाची जाडी दोन सेंटिमीटर इतकी असते. फळाचा गर मऊ असतो व चव किंचित गोड असते. शिंगाड्याचे कंद व फळांना उपवासामध्ये विशेष मागणी आहे. शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न देणाऱ्या या पिकाची लागवड फायदेशीर ठरू शकते.

जाती सद्यःस्थितीत हिरव्या, लाल किंवा जांभळ्या रंगांचे टरफल असलेल्या स्थानिक जातींची लागवड केली जाते. कानपुरी, जैनपुरी, देशी छोटे किंवा मोठे असे शिंगाड्याचे काही प्रकार आहेत. पश्‍चिम बंगाल आणि भारताच्या पूर्व भागात या जातींची लागवड केली जाते.

अभिवृद्धी शिंगाड्याची व्यावसायिक पद्धतीने लागवड बियाण्याद्वारे केली जाते. पूर्ण पिकलेले शिंगाड्याचे फळ एका भांड्यामध्ये थोडे पाणी टाकून त्यात उगवण्यासाठी ठेवावे. काही दिवसांनी त्याला कोंब फुटतात. कोंब फुटलेले शिंगाडे वेगळे करून रोपवाटिकेतील पाण्याच्या टाकीत सोडावेत. पावसाळ्याच्या सुरवातीस किंवा इतर वेळेस शेततळे किंवा तलावात पाणी उपलब्ध असल्यास लागवड करावी. लागवडीसाठी तलावात गुडघाभर पाणी पुरेसे होते. रोपांची या गुडघाभर पाण्यात १ × २ मीटर किंवा २ × ३ मीटर अंतरावर लागवड करावी. पूर्ण वाढ झालेल्या वेलांचाही बियाणे म्हणून वापर करता येतो.

हवामान बीज उगवणीसाठी पाण्याचे तापमान १२-१५ अंश सेल्सिअसपर्यंत असावे. पीक फुलोऱ्यात येण्यासाठी २० अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची गरज असते. उन्हाळ्यातील उच्च तापमान तसेच हिवाळ्यातील कमी तापमानातही उत्पादनात चांगली वाढ मिळविता येते.

माती शिंगाडा ही एक पाण्यात वाढणारी वनस्पती आहे. तिच्या वाढीसाठी मातीचे एवढे महत्त्व नसते, मात्र चांगली भुसभुशीत केलेली सुपीक, अन्नद्रव्य असलेली जमीन उत्पन्नवाढीसाठी निश्‍चित उपयुक्त ठरते. अन्नद्रव्य व्यवस्थापन शिंगाडा वाढीसाठी नत्र या अन्नघटकाचीच अधिक गरज असते. रासायनिक खते देताना त्यात काही प्रमाणात कोंबडी खत दिल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळते. शक्यतो लागवडीच्यावेळी युरिया ३० ते ४० किलो अधिक ४  ते ५ किलो कोंबडी खत प्रति एकर या प्रमाणात मिश्रण करून खत द्यावे. लागवडीनंतर २० दिवसांनी पुन्हा प्रतिएकरी ३० ते ४० किलो युरिया द्यावे.

पाणी व्यवस्थापन लागवडीनंतर वाढीच्या काळात तळे नेहमी पाण्याने भरलेले असावे. मातीच्या वर २० ते ४० सें.मी.पर्यंत पाण्याचा थर असावा. पाण्याचे प्रमाण यापेक्षाही जास्त असेल तरी शिंगाड्याची वाढ व्यवस्थित होते. परंतु फळांच्या काढणीच्या वेळी पाण्याचा निचरा करणे आवश्‍यक असते, कारण कमी पाण्यात काढणी सोपी होते. उन्हाळ्यात तलावातील पाणीपातळी घटणार नाही याची काळजी घ्यावी.

अांतरमशागत अांतरमशागतीमध्ये तलावातील तणांचे निर्मूलन आवश्‍यक ठरते. त्यामध्ये हायड्रिला आणि जलकुंभी ही तणे काढणे अत्यंत आवश्‍यक आहे.

फळांची वाढ फळे लागण्यास सुरवात उन्हाळ्यात होते. झाडांच्या खालील बाजूस मुळांच्या वर असलेल्या भागातील फुलांना फळे लागण्यास सुरवात होते. पाण्याचा रंग हिरवापासून जांभळा-तपकिरी रंगाकडे बदलत जातो, तसतसे फळे फुगण्यास सुरवात होते. फळे त्यांच्या काट्याच्या साह्याने गाळाशी अडकतात.

काढणी शिंगाडा हे चार महिन्यांत उत्पादन देणारे पीक अाहे. फेब्रुवारी महिन्यात लागवड केल्यास त्याची काढणी जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू करता येते. कारण उन्हाळ्यातील अधिक तापमान या पिकाला मानवून फळे साडेतीन महिन्यांतच काढणीसाठी तयार होतात. पावसाळ्यात जून महिन्यात लागवड केल्यास फळांची काढणी सप्टेंबर महिन्यात सुरू होते. काढणीसाठी शेतकरी तराफ्याचा वापर करतात. हाताच्या साह्यानेसुद्धा काढणी करता येते. शिंगाड्याचे सरासरी प्रतिहेक्टरी उत्पादन २००-३०० क्विंटल एवढे मिळते.

रोपांचे स्थलांतर करताना घ्यावयाची काळजी रोपवाटिकेमध्ये तयार झालेल्या रोपांच्या वेलांची उंची ३० सें.मी. झाल्यावर (साधारण महिना- दीड महिना) या रोपांचे स्थलांतर करावे. जर उंची जास्त झालेली असेल, तर वेलीला फुटलेले इतर अंकुर काढून टाकावेत. स्थलांतर करताना रोपांमध्ये ओलावा असणे गरजेचे आहे. लावताना रोपे पूर्ण पाण्याखाली राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.

संपर्क  : अनिल तारू, ०७१३२-२२३०१७ (कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर,जि.गडचिरोली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com