वायुविजनानुसार मातीचे गुणधर्म

गादीवाफ्यावर पीकलागवडीमुळे मुळांच्या कक्षेत योग्य वायुविजन व पाण्याचा निचरा होतो.
गादीवाफ्यावर पीकलागवडीमुळे मुळांच्या कक्षेत योग्य वायुविजन व पाण्याचा निचरा होतो.

अधिक उत्पादन मिळविण्यासाठी पिकांना सिंचनाची आवश्‍यकता असते. मात्र शेतकऱ्यांकडून शास्त्रीय पद्धतीने सिंचन केले जात नाही. पाणी देताना जमिनीच्या वरील स्तरातील हवा व पाणी यांचे योग्य प्रमाण राखले जाण्याची आवश्‍यकता असते. मुळांच्या कक्षेत जास्त पाणी राहिल्यास मुळांना अन्नद्रव्यांचे शोषण करणे अवघड होते. वातावरणामध्ये ज्याप्रमाणे विविध वायू असतात, त्याप्रमाणे मातीमध्येही विविध प्रकारच्या वायूंची उपलब्धता असते. मातीतील वायूंची वातावरणाशी देवाण-घेवाण होत असते. त्यानुसार त्यांचे प्रमाण कमी-जास्त होत असते. मातीतील प्राणवायू, कर्बवायू आणि अन्य वायू यांची उपलब्धता ही जमिनीच्या पर्यायाने पिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असते. मातीतील वायूची वैशिष्ट्ये : मातीतील उपलब्ध पोकळ्या, छिद्रे यांवर मातीतील वायूची वातावरणाशी देवाण-घेवाण ठरते. त्याचप्रमाणे शेतात उभे असलेले पीक व त्याची अवस्था, मातीतील सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता व विघटन, जिवाणूंची संख्या व त्यांच्यातील संबंध अशा विविध परस्परपूरक क्रिया व घटकांवर मातीतील वायूचे प्रमाण व वैशिष्ट्ये अवलंबून असतात. सर्व वायूंपैकी प्राणवायू अाणि कर्बवायू हे जास्त महत्त्वाचे अाहेत.

पाण्यामुळे प्राणवायूचे प्रमाण होते कमी : ज्या वेळी मातीतील छिद्रे ही ८० टक्के पाण्याने भरलेली असतात, त्या वेळी मातीतील प्राणवायूचे प्रमाण जिवाणू व पिकांच्या मुळांच्या चयापचयाच्या विविध क्रियांसाठी अपुरा पडतो. मातीतील छिद्रे १०० टक्के पाण्याने भरल्यानंतर त्यात प्राणवायूच राहत नाही. अशी स्थिती सलग तीन दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास पिकांना प्राणवायूची उपलब्धता होत नाही. परिणामी पिके पिवळी पडू लागतात. पिकांसाठी आत्यंतिक जोखमीची स्थिती निर्माण होते. मातीमध्ये सतत वायूची अदलाबदल चालू असते. पिकांची मुळे व जिवाणू हे कायम कर्बवायू सोडतात व प्राणवायू घेतात. मातीतील पोकळीमध्ये ५० टक्के वायू व ५० टक्के पाणी अशी अवस्था असते, ती पिकांसाठी व जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत उत्तम समजली जाते. जेव्हा वायू उपलब्धता २० टक्के व त्यापेक्षा कमी होत जाते, तेव्हा पीक उत्पादनावर गंभीर परिणाम होतात. पिकाला पाणी देतानाही ही बाब शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.  

पर्यावरणीय परिणाम व मातीतील वायू : मातीमध्ये वायूचे प्रमाण कमी असल्यास विघटनाच्या प्रक्रियेचा दर कमी राहतो. त्यातील प्राणवायूची उपलब्धता ही नत्र, गंधक, लोह व मॅंगेनीज यांसारख्या खनिजांची पिकासाठी उपलब्धता वाढवतात. आवश्यकतेपेक्षा कमी वायू उपलब्ध असल्यास अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते. त्याचप्रमाणे घातक घटक तयार होऊन पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.  

मातीतील वायू अाणि पाणी : पाणथळ जमिनीमध्ये वायूची उपलब्धता फार कमी असते. परिणामी या जमिनीमध्ये पाणी, वायू व पिके यांचे परस्पर संबंध अडचणीत येतात. अशा जमिनीमध्ये ‘अारेनकायमा उती’ असणारी पिके (उदा. भात, कमळ, पाणवनस्पती) येऊ शकतात. कारण ती हवेतून आवश्यक ते वायू शोषून मुळांना देतात.

वातावरणातील अाणि मातीतील तुलनात्मक वायू उपलब्धता

 वायू      वातावरण (टक्के)     माती (टक्के)
 प्राणवायू (O2)     २०.९५ २०.४२
 नत्र (N2)     ७८.०८     ७८.०८ 
 अरगाॅन (Ar)       ०.९३४      ०.९३४  
 कर्बवायू (CO2)     ०.०३५     ०.५६०
 इतर वायू    ०.००१    ०.००१  

मातीतील वायूवर परिणाम करणारे घटक

  • जमिनीची निचरा क्षमता
  • मोठ्या छिद्रांची संख्या
  • मातीतील श्‍वसन दर
  • जमिनीची (मातीची) खोली
  • मातीतील मशागतीमुळे होणारा बदल
  • पिकाचे प्रकार व अवस्था
  • संपर्क :  डॉ. मेहराज अजीज शेख, ९९७०३८७२०४ (मृदाशास्त्रज्ञ, परभणी)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com