सोयाबीनमधील तेजीला लगाम

सोयाबीनमधील तेजीला लगाम
सोयाबीनमधील तेजीला लगाम

पुणे : सोयापेंड निर्यातीला मर्यादा आल्यामुळे सोयाबीनच्या दरातील तेजीला लगाम बसला आहे. सध्या सोयाबीनला सरासरी ३७०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून येत्या काळात सोयाबीनचे दर चार हजार रुपयांच्या वर जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३८०० ते ३९०० रुपयांच्या भावपातळीवर लक्ष ठेऊन सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यावा, असे अभ्यासक व विश्लेषकांचे म्हणणे आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनचे दर किमान आधारभूत किंमतीच्याही खाली गेले होते. त्या वेळी २७०० रुपये क्विंटल भाव मिळत होता. परंतु, मध्य प्रदेशमध्ये बाजारभाव आणि हमीभाव यातील फरक थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याच्या भावांतर योजनेची डिसेंबरमध्ये सांगता झाली. त्यामुळे बाजारातील आवक मंदावली. तसेच देशात २०१७-१८ या हंगामात सोयाबीनचे लागवड क्षेत्र १० टक्के कमी झाले. तसेच उत्पादनात १५ ते २० टक्के घट होऊन ते ७८ ते ८० लाख टन राहण्याचा सुधारित अंदाज आला. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्जेंटिना या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशामध्ये खराब हवामानामुळे पेरा मंदावला. या तीन प्रमुख कारणांमुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरांनी उसळी घेतली. सोयाबीनचे दर सुरवातीला ३००० रुपये आणि नंतर ३९०० रुपयांपर्यंत वाढले.    सोयाबीनच्या दरात तेजी आल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतातील सोयापेंड महाग पडत आहे आणि त्यामुळे निर्यातीला लगाम बसला आहे. बांगलादेश व इतर पारंपरिक खरेदीदार देशांनी हात आखडता घेतल्यामुळे निर्यात मंदावली आहे. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सोपा)चे अध्यक्ष डॉ. दाविश जैन यांनी निर्यातीवर परिणाम झाल्याची बाब मान्य केली. ते म्हणाले, ``पारंपरिक खरेदीदार देशांना होणारी निर्यात जवळपास थंडावली आहे. युरोपसारख्या बिगर जीएम सोयाबीनचे मार्केट असणाऱ्या देशांनाच सध्या निर्यात होत आहे. पण त्यांची मागणी तुलनेने कमी असते.`` भारताची सोयापेंड निर्यात एप्रिल-डिसेंबर २०१७ या कालावधीत ९.३७ लाख टन राहिली. त्या आधीच्या वर्षी याच कालावधीत ४.४६ लाख टन निर्यात झाली होती. सोयाबीनच्या आगामी काळातील बाजारभावाबद्दल बोलताना शेतमाल बाजार विश्लेषक सुरेश मंत्री म्हणाले, ‘‘सोयापेंड निर्यात थंडावल्याचा परिणाम म्हणून सोयाबीनच्या दरातील तेजी थांबली आहे. सध्या सोयाबीनला ३७०० ते ३८०० रुपये दर मिळत आहे. मंदी आल्यास ३४०० रुपये आणि तेजी आल्यास जास्तीत जास्त चार हजार रुपये इतकी दरपातळी राहील.

राज्यातील ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांना सुरवातीच्या टप्प्यात हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन विकावा लागला. परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांनी दर वाढतील या आशेने सोयाबीनचा साठा करून ठेवला आहे. ``मार्च-एप्रिल महिन्यात आगामी मॉन्सूनबद्दल अंदाज वर्तवणे सुरू होईल. पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असला तर सोयाबीनच्या दरात आणखी तेजी येईल. परंतु पाऊस समाधानकारक राहण्याची चिन्हे असल्यास सोयाबीनचे दर वाढणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३८०० ते ३९०० रुपयांची दर पातळी ध्यानात घेऊन निम्मा माल विकून टाकणे योग्य ठरेल,`` असे मत शेतमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. सोयाबीनचे गाळप केल्यानंतर सोयातेल व सोयापेंड ही उत्पादने मिळतात. या उत्पादनांची मागणी आणि दर किती आहे त्यावर सोयाबीनचे दर ठरतात. सध्याच्या भावपातळीला सोयापेंड निर्यातीला उठाव मिळू शकत नाही. त्यामुळे येत्या काळात सोयाबीनचे दर चार हजार रुपयांच्या वर जाण्याची शक्यता नाही -  सुरेश मंत्री, शेतमाल बाजार विश्लेषक  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com